https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २ एप्रिल, २०१७

मानवी मेंदूची एकाग्रता व कणखरता एक यक्ष प्रश्न!

मानवी मेंदूची एकाग्रता व कणखरता एक यक्ष प्रश्न!

विविधतेने नटलेल्या अगाध विश्वाचे बहुरंगी, बहुढंगी असे असंख्य विषय आणि त्या विषयांभोवती फिरणारे मानवी मन असा एकंदरीत मानवी जीवनाचा प्रवास आहे. मानवी मेंदूच्या औपचारिक ज्ञानग्रहणाची सुरूवात बालवाडीपासून होते. वयानुसार जसजसा शिक्षणातून  विश्वाच्या ज्ञानाचा आवाका वाढत जातो तसतशी मानवी मेंदूच्या अर्थात मानवी मनाच्या एकाग्रतेची व कणखरपणाची परीक्षा सुरू होते. अनेक विषयांची रेलचेल मेंदूत वाढत जाते. त्यातून अनेक विषयवासना, आकर्षणे, आशाआकांक्षा मेंदूच्या मनात तयार होतात. 

अशाप्रकारे वयाने परिपक्व व ज्ञानाने परिपूर्ण झालेला मानवी मेंदू जणू काही सा-या विश्वाचे ओझेच डोक्यात घेऊन वावरु लागतो. त्यातूनच मानवी मेंदू चौकस झाल्याने त्याला अनेक प्रश्न पडतात. अशा प्रश्नकर्त्या मेंदूला त्याच्या प्रश्नांची नीट उत्तरे मिळाली नाहीत तर तो बैचेन होतो. असंख्य प्रश्नांची असंख्य उत्तरे शोधता शोधता मेंदूची दमछाक होते. त्यातच जगण्यासाठी मेंदूच्या पुढे अनेक आव्हाने उभी राहतात. मग मनाची एकाग्रता आणि कणखरता यांचा खेळ मानवी मेंदूत सुरू होतो. मानसशास्त्रज्ञ त्यावर काही उपाय सुचवतात. काहीजण मनाच्या एकाग्रतेसाठी योगाचा उपाय सुचवतात. पण जिथे रोजच्या दिनचर्येत क्षणाक्षणाला मानवी मेंदूच्या एकाग्रतेची व कणखरतेची परीक्षा होत असते तिथे हे उपाय किती पुरे पडू शकतात हा पण एक अभ्यासाचाच विषय आहे. आता तर काय मानवी मेंदू माहितीच्या स्फोटात पुरता अडकला आहे. त्यातच फेसबुक, वॉटसअप सारख्या समाजमाध्यमांनी धमाल उडवून दिली आहे. त्यामुळे  मानवी मेंदूच्या एकाग्रतेची परीक्षा आणखी कठीण झाली आहे. महाभारतात अर्जुन, एकलव्य, कर्ण यांच्या धनुष्यबाणातील कौशल्याच्या व एकाग्रतेच्या कथा आहेत. या सर्व असामान्य पराक्रमी शूरवीरांच्या एकाग्रतेची व कणखरतेची आजच्या काळात खरी परीक्षा झाली तर ते त्यातही उत्तीर्ण होतील. कारण या व्यक्ती असामान्य होत्या व कायम असामान्य राहतील. पण सामान्य माणसाचे काय? तो निसर्ग की परमेश्वर सामान्य माणसाचीही असली कठीण परीक्षा दररोज क्षणाक्षणाला घेतच असतो. तो निसर्ग पण अजब, त्याचे विश्व पण अजब आणि त्या विश्वातील मानवी मेंदू पण अजब! सारेच अजब गजब! -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा