https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

*मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार*!

*मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार*!

(१) काय केले नाही या जगात स्वतःला यशस्वी सिद्ध करण्यासाठी? लवकर उठून शाळा कॉलेजात गेलो. रात्रंदिवस  घासून अभ्यास केला आणि उच्च शिक्षण प्राप्त केले. वेळेवर अॉफीस गाठून काही काळ इमानेइतबारे नोकरी केली. पण कायद्याची पदवी जवळ असल्याने नोकरीत गुलाम होऊन राहण्यापेक्षा स्वतंत्र बाण्याने वकिली व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण ते धाडस अंगाशी आले. या व्यवसायातील व्यवहार अज्ञानाने मला अगदी तोंडघशी पाडले. कुटुंबात सगळेच अशिक्षित. कामगार म्हणून नोकरी करण्याची पार्श्वभूमी असलेले आईवडीलांचे कुटुंब. तशात लग्न केले ते अर्धवट शिकलेल्या मुलीशी. एका वर्षात मूल पण जन्माला घातले. पण वकिलीत नाव करण्याची हौस भारी. त्या हौसेनेच घात केला. सगळा खेळखंडोबा केला.

(२) मोठ्या दिमाखात काळा कोट अंगावर चढवून सकाळी लवकर उठून कोर्टात जाऊन बसू लागलो.  पण हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागले. कोणाची वकिली करायची, हाच मुलभूत प्रश्न आ वासून समोर उभा राहिला. जगण्यासाठी पैसा तर आवश्यकच! मग तो  कोणाकडून मिळवायचा? गरीबांकडून? पोटापाण्यासाठी मरमर राबून वणवण भटकणा-या गरीबांची प्रामाणिकपणे वकिली करायची तर मला व माझ्या कुटुंबाला उपाशी मरावे लागणार हे सरळस्पष्ट दिसत होते.

(३) शेवटी गरीबाने मोठ्या कष्टाने मिळविलेल्या ज्ञानाला पैसा कोठून मिळणार? पिढीजात श्रीमंतांकडूनच ना! कारण शेवटी पैसा त्यांच्याच ताब्यात.  गरीबाच्या ज्ञानाला प्रतिष्ठा कोण देणार? शेवटी सत्ताधारीच ना! पण शेवटी सत्ता कोणाच्या ताब्यात राहिलीय? ज्ञानी माणसांच्या? अशा कात्रीत सापडलेल्या माझ्या सारख्या माणसाने वकिली कशी करावी?

(४) जंग जंग पछाडले स्वतःला यशस्वी वकील म्हणून सिद्ध करण्यासाठी. पण शेवटी काय मिळाले? ज्यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतला, त्यांनी माझ्यापुढे त्यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करीत कष्टाने मिळविलेल्या माझ्या ज्ञानाला कस्पटासमान लेखून क्षूद्र किंमत दिली आणि मला अधिकाधिक गरीब केले. आणि ज्यांनी मला न जमणा-या ना ना क्लृप्त्या करून सत्ता प्राप्त केली त्या सत्ताधा-यांनी माझ्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. मग त्यांच्याकडून माझ्या ज्ञानाला प्रतिष्ठा मिळण्याची गोष्टच वेगळी!

(५) उच्च ज्ञान मिळवून खालच्या पातळीवरील अतीसामान्य जीवन जगण्याची कसरत करण्याचे आव्हान पेलत पेलत आयुष्य कधी संपले हे कळलेच नाही. आता प्रश्न हा उरतो की, एखाद्या चांगल्या गायकाला प्रसिध्द संगीतकारांकडून स्विकारले गेले नाही म्हणून त्या गायकाने सर्वसामान्यांच्या फुकटच्या टाळ्यांवर समाधान मानीत गल्लोगल्लीतल्या उत्सवांत उसने अवसान आणून फुकट गात फिरावे का? स्वार्थी व व्यवहारी जगात फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहाण्याचे तत्त्वज्ञान मी कधीच गुंडाळून ठेवले आहे. ज्या गोष्टीचे फलित नाही ती गोष्ट करीत राहण्यात अर्थ नाही. निरर्थक व व्यर्थ गोष्टी टाळण्याचा शहाणपणा उशिरा का होईना पण मला आला आहे. व्यवहारी जगात राहताना ज्ञानी माणसाने चाणाक्ष सुध्दा रहायलाच हवे, हे मला उशिरा का होईना पण कळून चुकले आहे. 

(६) पण मी नाउमेद होणार नाही. श्रीमंतांनो व सत्ताधा-यांनो, माझ्या ज्ञानाला तुमच्या प्रशस्तीपत्रकाची बिलकूल आवश्यकता नाही. नव्हे, तुम्ही तसे प्रशस्तीपत्रक देणारच नाही याची मला आता पुरेपूर खात्री झाली आहे. एकतर तुम्हाला माझ्या ज्ञानातील अक्षरही समजत नसावे किंवा तुम्ही माझ्या ज्ञानावर जळत असणार अथवा घाबरत तरी असणार. काय अपेक्षा करणार मी तुमच्याकडून? पण लक्षात ठेवा! माझ्याकडे स्वतःची कार नसली तरी रिक्षात बसताना सुध्दा मी राजासारखाच बसणार. माझ्या साध्या घराला मी बंगलाच समजणार. मी तुमच्याकडे पाठ फिरवून निघून जाणार नाही. तुमच्या समोर ताठ मानेने मरेपर्यंत बिनधास्त उभा राहणार हे निश्चित! कष्टाने मिळविलेल्या  माझ्या ज्ञानाच्या जोरावर मी स्वतःला असामान्य समजतच जीवन जगणार आणि तसाच मरणार. त्यापासून तुम्ही मला रोखू शकणार नाहीत! कारण मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार झालोय! *बी.एस.मोरे, वकील*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा