https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

*सृष्टीचे विज्ञान आणि निसर्गाचा धर्म*!

*सृष्टीचे विज्ञान आणि निसर्गाचा धर्म*!

(१) सृष्टीतील सर्व सजीव, निर्जीव   पदार्थ एकसारखे नाहीत. अर्थात त्यांच्यात विविधता आहे.

(२) सर्व सजीव, निर्जीव पदार्थ एकाच ताकदीचे नाहीत. अर्थात त्यांच्यातील रासायनिक, शारीरिक व बौध्दिक शक्ती कमी जास्त आहे.

(३) सर्व सजीव, निर्जीव पदार्थांना त्यांच्या विशेष गुण वैशिष्ट्यांसह स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपायचे आहे, टिकवायचे आहे. याच मुलभूत नैसर्गिक प्रेरणेस स्वार्थ असे म्हणतात.

(४) परंतू सर्व सजीव, निर्जीव पदार्थांचा स्वार्थ एकमेकांच्या स्वार्थ समाधानानेच पूर्ण होऊ शकतो. अर्थात प्रत्येक पदार्थाचे स्वतंत्र अस्तित्व किंवा स्वतंत्र जीवन एकमेकांच्या सहअस्तित्वावर किंवा सहजीवनावर अवलंबून आहे. 

(५) सृष्टीतील सहअस्तित्वाचे किंवा सहजीवनाचे संतुलन सांभाळीत असताना सर्व पदार्थांना त्यांच्या वैविध्यतेमुळे व कमी जास्त ताकदींमुळे एकमेकांशी नफा तोट्याचे गणित खेळायला आवडते.

(६) जीवनास उपयुक्त असणाऱ्या गोष्टींना जवळ करायचे आणि जीवनास उपद्रवी असणाऱ्या गोष्टींना दूर लोटायचे, या नफ्या तोट्याच्या गणिती व स्पर्धायुक्त उद्योगातच स्वार्थी मनुष्य अखंड बुडालेला आहे आणि हाच स्वार्थी मनुष्याचा कर्मयोग आहे.

(७) विविध सजीव, निर्जीव पदार्थांनी संपन्न असलेल्या  सृष्टीची अदभुत रचना व तिचे पध्दतशीर कार्य याविषयीच्या ज्ञानालाच विज्ञान म्हणतात. परंतू  सृष्टीच्या या आश्चर्यकारक रचनेमागे व कार्यामागे प्रचंड ताकदीची गूढ नैसर्गिक शक्ती असावी की नसावी याविषयी मानवी मनाला नेहमीच कोडे पडलेले आहे आणि त्या गूढ शक्ती विषयी नेहमीच कुतूहल वाटत राहीले आहे.

(८) मानवी मनाच्या कल्पना आविष्कारातून गूढ नैसर्गिक शक्तीला देवत्व बहाल केले गेले आणि त्या नैसर्गिक शक्तीचे अर्थात निसर्गाचे रूपांतर देवात झाले. पण वेगवेगळ्या मानव समूहांच्या देवाविषयीच्या कल्पना सुध्दा वेगवेगळ्या राहिल्याने त्यातून वेगवेगळे धर्म निर्माण झाले. काही धर्मांनी सृष्टीच्या विविधतेनुसार देवाची वेगवेगळी प्रतिके निर्माण केली. 

(९) देवांच्या प्रतिकांमध्ये मानवी मनाने श्रध्दारूपी भावना ओतल्याने त्या प्रतिकांच्या पूजाअर्चा सुरू झाल्या. त्यातून धार्मिक कर्मकांडे निर्माण झाली. काही धर्मांना त्यांच्या कल्पनेनुसार मूर्तीपूजा अर्थात प्रतिकांची पूजा मान्य नाही. पण त्या धर्मांतही अनेक कर्मकांडे आहेत. 

(१०) राष्ट्रध्वज हे राष्ट्राचे प्रतिक असते व त्या प्रतिकाला नागरिकांकडून प्रातिनिधीक स्वरूपात वंदन करणे उचित असले तरी शेवटी राष्ट्राच्या नागरिकांचे हित प्रत्यक्षात ज्या गोष्टींत आहे त्या गोष्टींवरच सदासर्वकाळ लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. तीच गोष्ट प्रतिकरूपी किंवा प्रतिके नसलेल्या देवाच्या बाबतीत लागू पडते. नैसर्गिक शक्तीला दररोज वंदन करणे हा औपचारिक सोपस्कार राहता कामा नये. तसेच त्या वंदनाचे सार्वजनिक अवडंबर माजवता कामा नये. गूढ नैसर्गिक शक्तीला वंदन करून तिच्याकडून निर्मिलेल्या सृष्टीकडे व त्या सृष्टीच्या धर्माकडे अर्थात विज्ञानाकडे प्रत्यक्ष लक्ष देणे हीच त्या नैसर्गिक शक्तीला खरी मानवंदना आहे. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा