https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

*पिकल्या पानाचा देठ का हो हिरवा*!

*पिकल्या पानाचा देठ का हो हिरवा*!

(१) अगदी प्राथमिक शाळेपासून मला तमाशा आणि त्यातल्या लावण्यवतींच्या लावण्या बघण्याची आवड निर्माण झाली. गावातल्या जत्रांमध्ये कुस्त्यांचे सामने व तमाशे ही माझी अत्यंत  आवडती असलेली करमणूकीची साधने. काळू बाळूचा तमाशा बघताना खूप मजा यायची. आईवडीलांनी लाडाने बहाल केलेले माझे नावही बाळूच असल्याने काळू बाळूचा तमाशा बघताना जरा जास्तच गंमत यायची. तसे इतर तमाशे पण मी सोडत नसायचो. तमाशातल्या ढोलकीचा ताल लय भारी. पण जवळ ढोलकी नसल्याने मी दिमडी घेऊन दोन काड्यांनी दिमडी वाजवीत पंढरपूरातील पोरांना स्वतःची कला दाखवायचो.

(२) माझा उनाडपणा बघून वडिलांनी मला पंढरपूर वरून उचलून मुंबईत आणून टाकला. पण तमाशा लय आवडायचा. मुंबईच्या माध्यमिक शाळेत शिकत असताना सुध्दा मी हळूच लालबागला जायचो. आठवी इयत्तेपासून प्रौढ शिक्षण वर्ग घेऊन मिळविलेल्या पैशातले काही पैसे लालबागच्या हनुमान थिएटर मध्ये तमाशाचे तिकीट काढून त्यावर उडवायचो. घरातल्या कोणालाही काही पत्ता लागू द्यायचो नाही. शाळेतील मित्रांना पण सांगत नसायचो. एकटाच तमाशाची मजा घ्यायचो. तसा अजूनही मी एकटाच भ्रमंती करीत असतो.

(३) मला लीला गांधी, उषा चव्हाण व जयश्री गडकर यांचे तमाशा प्रधान चित्रपट खूप आवडायचे. लालबागच्या भारतमाता टॉकीज मध्ये मी या तीन महान स्त्री कलाकारांचे सांगते ऐका, गणगौळण, एक गाव बारा भानगडी यासारखे तमाशा प्रधान चित्रपट खूप वेळा एकट्यानेच पाहिले आहेत. त्यांच्या लावण्या बघताना मन धुंद व्हायचे. तसा हल्लीच्या सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावरही माझ्या ६० वर्षाच्या म्हातारपणाला न जुमानता मी झिंगाट नाचलोय. स्वतःचाच झिंगाट विडीयो बनवून यू ट्यूब वर टाकून दिला. पण जुन्या तमाशातली ती झिंग काही औरच होती.

(४) आता तमाशाचा सगळा खेळखंडोबा झालाय. वाट लागलीय या लोककलेची. आता भलताच तमाशा बघायला मिळतोय. एकदा एका मित्राबरोबर डान्स बार मध्ये गेलो होतो. तिथला बार डान्स बघितल्यानंतर पुन्हा तिकडे कधी गेलो नाही. बाजारातून लीला गांधी, उषा चव्हाण आणि जयश्री गडकर यांच्या तमाशा प्रधान चित्रपटाच्या व्ही.सी.डी, डी.व्ही.डी. घरी घेऊन आलो आणि आता तेच चित्रपट घरी अधूनमधून एकटाच बघत असतो. त्यातल्या लावण्या बघताना पुन्हा गतकाळात जातो. वयानुसार मरगळलेल्या शरीरमनाला त्या लावण्यांमुळे अजूनही झिंग येते आणि मी एकटाच बडबडतो "पिकल्या पानाचा देठ का हो हिरवा"! *बाळू वकील*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा