https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*निसर्गाशी मैत्री, देवाशी मैत्री*!

*निसर्गाशी मैत्री, देवाशी मैत्री*!

(१) समाजाने मला तसे भरपूर दिले. नाही असे नाही. मला शिक्षणाची संधी दिली. थोडा का असेना पण जगण्यासाठी आवश्यक तेवढा आर्थिक आधार दिला. साधारण का असेना पण मानसन्मान दिला. एकदम फेकून दिले नाही. पण मी पण शिक्षणाच्या संधीचे सोने केले. स्वकष्टाने भरभरून ज्ञान मिळविले आणि त्या ज्ञानाच्या जोरावर समाजाच्या उपकाराची भरपूर परतफेड केली. आता समाजाला ती परतफेड दिसत नसेल तर त्याला मी तरी काय करणार?

(२) पण आता स्वार्थी माणसांबरोबर स्वतःचे पांडित्य गाजवित स्वार्थी व्यवहारांचा खेळ खेळण्याचा खूप कंटाळा आला. मनुष्य किती ढोंगी आणि किती स्वार्थी असू शकतो याचे सखोल ज्ञान वकिली व्यवसायातून मिळाले. त्यामुळे या महान व्यवसायाचे आभार मानावे तितके थोडेच! आता पुन्हा  पुन्हा त्याच त्याच स्वार्थी व्यवहारांची उजळणी करीत रटाळ जीवन जगण्याचा खूप कंटाळा आला. 

(३) निसर्गाने माणसाचा खेळ केलेला नाही, तर माणसानेच निसर्गाचा खूप खेळ केला आहे. कोणत्याही तिर्थक्षेत्री असलेल्या देवालयात जाऊन तिथल्या देवाचे नीट दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा तर माणसांच्या गर्दीमुळे मेंढरासारखे बाजूला करून फेकले जाते. माणसांनी देवालयांचे कोंडवाडे केले आहेत. मुक्त देवाला तिथे बंदिस्त करून टाकले आहे. इतके बंदिस्त की, देवाला माणसांपासूनच भीती निर्माण होऊन त्याच्या रक्षणासाठी माणसांचीच सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागतेय. मग अशा ठिकाणी आध्यात्मिक ध्यान व शांती कशी लाभणार?

(४) आता पटलेय की, देवाचे वास्तव्य निसर्गात मुक्त आहे. त्याला कुठेच बंदिस्त करून ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या मुक्त देवाबरोबर मुक्त निसर्गात मिसळून जाण्याची ओढ लागलीय. 

(५) आता वाटतेय की, मरण्यापूर्वी निदान थोडे दिवस तरी निसर्गात मुक्त फिरावे. रात्री आकाशातील चांदण्याच्या सौंदर्याचे दर्शन घेत शांत झोपी जावे. दिवसा हिरव्यागार झाडाच्या सावलीत पक्षांची किलबिल ऐकत बसावे. जमलेच तर स्वच्छ नदीच्या स्वच्छ पाण्यात जाऊन मुक्त अंघोळ करावी. तसे आणखी खूप काही  करावेसे वाटतेय. उंच डोंगर चढून  जाऊन डोंगर माथ्यावर शांत बसावे. पण पायांत आता तशी ताकद राहिली नाही. असेही वाटते की, समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन खालीवर झोके घ्यावे. पण साधे विहिरीत, नदीत पोहता येत नाही आणि समुद्राच्या  लाटांवर काय आरूढ होणार? पण जमेल तेवढे निसर्गाशी समरस होत निसर्गाशी अर्थात देवाशीच मी गुपचूप संवाद साधणार आहे आणि निसर्गाशी अर्थात देवाशीच मैत्री करणार आहे. कोणाला खरे वाटो किंवा खोटे वाटो! *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा