https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*व्यभिचार व समाजस्वास्थ्य*

*व्यभिचार व समाजस्वास्थ्य*

(१) रविवार, दिनांक १९ मार्च २०१७ च्या लोकसत्ताच्या अंकातील नाट्यरंग या सदरात रवींद्र पाथरे यांची समाजस्वास्थ्य या नाटकावरील समीक्षा व सुमारे १०० वर्षांपूर्वी प्रो. र. धो. कर्वे या समाजसुधारकाने व विचारवंताने लिहिलेल्या "व्यभिचाराचा प्रश्न" या लेखावरील त्यांचे स्पष्टीकरण वाचले व त्यावर एक वकील या नात्याने ही प्रतिक्रिया देण्याचे मनात आले.

(२) वास्तविक व्यभिचार हा मनुष्याच्या कामवासनेशी व समाजस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून मनुष्यानेच निर्माण केलेल्या विवाह संस्थेशी निगडीत आहे. मानव संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत मनुष्याचे जीवन हे कोणत्याही बाबतीत स्थिर नव्हते, मग ती बाब अन्नासाठी शिकार करण्याची असो वा स्त्री पुरूषातील समागमाची असो. असा हा भटका मनुष्य शेतीचा शोध लागल्यानंतर हळूहळू जीवनात स्थिर होऊ लागला व मग पुढे अशी जीवन स्थिरता केवळ कामवासनेच्या समाधानातच नव्हे तर स्त्री पुरूष समागमातून निर्माण होणाऱ्या अपत्यांच्या जीवनातही व  मालमत्तेच्या योग्य वाटपातही यावी या बौध्दिक विचारातूनच मनुष्याकडून विवाहसंस्थेची निर्मिती करण्यात आली.

(३) भटक्या टोळी अवस्थेतून स्थिर समाजाची पहिली पायरी म्हणजेच विवाह संस्थेतून निर्माण होणारी कुटुंब व्यवस्था. समविचारी व समसंस्कारी अशा अनेक कुटुंबाच्या एकतेतूनच एकसंघ देशाची निर्मिती होते. कुटुंब भावनेतून पुढे देश भावना ही मानव संस्कृतीची उच्च पातळी व पायरी. अर्थात अन्नपाणी, समागम यासारख्या मुलभूत नैसर्गिक वासना व मानवी मेंदूच्या उच्च बौध्दिक विचारांतून हळूहळू उत्क्रांत झालेल्या आधुनिक, सुशिक्षित व सुसंस्कृत सामाजिक भावना यांत फरक आहे. पण नैसर्गिक वासना व सामाजिक भावना यामध्ये संतुलन साधल्याशिवाय आधुनिक मनुष्य जीवनात स्थिरता येऊच शकत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी उगाळण्यात काही अर्थ नाही.

(४) विवाह ही केवळ स्त्री पुरूष समागमासाठी समाजमान्य अशी सोय आहे, हा विचारच बिलकूल पटत नाही. विवाहाचा एवढाच मर्यादित अर्थ नाही. कौटुंबिक प्रेम भावना, कौटुंबिक सहजीवनातून येणारी जीवन स्थिरता, शरीर व मनाने एकत्र होऊन करावयाचे अपत्य संगोपन, कुटुंब मालमत्ता अशी बरीच कारणे कुटुंब व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी मजबूत आहेत.

(५) आता वर उल्लेखित लेखात असे लिहिले गेले आहे की, शारीरिक किंवा मानसिक गुणांमुळे परस्परांकडे आकर्षण उत्पन्न झाल्यासच व्यभिचार शक्य होतो आणि त्यामुळे व्यभिचारी समागम नेहमीच उच्च दर्जाचा असतो. वा! फारच छान! म्हणजे विविध अन्नपदार्थांच्या आकर्षणांतून आपण जशी निरनिराळ्या हॉटेलांत खवय्येगिरी करतो तसेच झाले हे. मग लग्नाचा जोडीदार निवडतानाही केवळ या आकर्षणाचाच विचार करा आणि मग पुढे हे आकर्षण संपले की पहिला जोडीदार सोडून दूसरा पकडा. अरे मग त्यासाठी विवाहबंधनात कशाला पडता? लिव्ह इन रिलेशनशिप, कम्प्यानियनशिप वगैरे सोयी आहेतच ना त्यासाठी. विवाहबंधनात राहून व्यभिचाराची हौस भागवू पहाणा-या महाभागांनी किंवा महाभागिनींनी विवाह बंधनातून मुक्त होऊन असली लफडी बिनधास्त करावीत. झेपत नाही तर घ्यायचे कशाला विवाहबंधनाचे ओझे डोक्यावर? विवाहसंबंधातून निर्माण झालेल्या पोराबाळांच्या डोक्याला उगाचच ताप! *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा