https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

*वैज्ञानिक अध्यात्म*!

*वैज्ञानिक अध्यात्म*!

(१) निसर्गशक्तीत देव आणि विज्ञानात अध्यात्म बघण्याची सरळ, स्पष्ट दृष्टी सृष्टीच्या सखोल अभ्यासाने व त्यातून प्राप्त होणाऱ्या सखोल ज्ञानानेच लाभते. पण बहुसंख्य माणसे वरवरच्या अर्धवट ज्ञानानेच फुगून जाऊन त्यांचे तथाकथित  पांडित्य मिरवित वरवरचे जीवन जगत असतात व इतरांनीही तसेच वरवरचे जीवन जगावे, अधिक प्रश्न विचारू नयेत, अधिक चिकित्सा करू नये, या मताशी ठाम राहतात.

(२) सखोल ज्ञानी व्यक्ती हीच पूर्ण ज्ञानी असते व वरवरचे ज्ञान  घेऊन जगणारी व्यक्ती ही अपूर्ण ज्ञानी किंवा अर्धवट ज्ञानी असते. लोकशाही म्हणजे संख्याबळाचा खेळ. एखाद्या राज्यात जर बहुसंख्य लोक अशिक्षित व अर्धवट ज्ञानी असतील, तर अशा राज्यात सुशिक्षित व सखोल ज्ञान घेऊन वावरणा-या अल्पसंख्य लोकांनी लोकशाही नावाच्या संख्याबळाच्या खेळात पडू नये व स्वतःचा शहाणपणा गाजविण्याचा प्रयत्न करू नये. तो शहाणपणा स्वतःजवळच ठेवावा, नाहीतर वरवरचे जीवन जगण्यात आनंद मानणाऱ्या  बहुसंख्य लोकांकडून प्रथम खजील होऊन नंतर मार खाण्यास तयार रहावे. 

(३) सुशिक्षित व सखोल ज्ञानी अल्पसंख्याकांनी अशा विसंगत परिस्थितीत बहुसंख्याकांना घाबरून रहाण्यातच शहाणपणा आहे, नाहीतर सत्य लिहिल्या किंवा बोलल्या बद्दल राज्यद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यात  अटक होऊन फाशीची शिक्षा सुध्दा होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते.

(४) अशा विसंगत परिस्थितीत, सत्याचा असत्याकडून पराजय आणि अल्पसंख्येने असलेल्या सखोल ज्ञानी लोकांचा बहुसंख्येने असलेल्या अर्धवट ज्ञानी लोकांकडून पराभव ही गोष्ट अटळ असते. अशा भीतीदायक वातावरणात, अल्पसंख्येने असलेल्या सखोल ज्ञानी माणसांना सन्मानाने जगण्याच्या संधी खूपच कमी असतात.

(५) तेंव्हा अशा वातावरणात, अर्धवट ज्ञानाच्या जोरावर पांडित्य गाजविणा-या पंडितांना, मक्तेदारीच्या जोरावर आर्थिक शोषण करणाऱ्या श्रीमंतांना व दंडेलशाहीच्या पाशवी बळावर राजसत्ता भोगणा-या राज्यकर्त्यांना कोपरापासून नमस्कार करीत जीवन जगण्यातच ख-या ज्ञानी माणसांचा शहाणपणा असतो. या शहाणपणातच ख-या ज्ञानी माणसांचे धर्मकारण, अर्थकारण व राजकारण दडलेले असते आणि या एकंदर शहाणपणालाच मी "वैज्ञानिक अध्यात्म" असे सोयीस्कर नाव दिले आहे. तरीही एकूण लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोक जेंव्हा सृष्टी विज्ञानाच्या सखोल ज्ञानाने पूर्ण सुशिक्षित होतील तेंव्हा ही भयावह परिस्थिती नक्कीच बदललेली दिसेल यात शंकाच नाही. तोपर्यंत अल्पसंख्येत असलेल्या सद्याच्या पूर्ण सुशिक्षितांनी वैज्ञानिक अध्यात्माचा स्विकार करीत सावध शहाणपणाचे जीवन जगत रहाण्यातच त्यांचे हित आहे. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा