https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

पळती माणसे पाहूया, देवाच्या गावाला जाऊया!

पळती माणसे पाहूया, देवाच्या गावाला जाऊया!

(१) स्वतः भोवती गिरकी घेताना  आणि सूर्याला वळसा घालताना  पृथ्वी क्षणाक्षणाला पुढे सरकत सरकत मनुष्य जीवनाच्या बालपणाला, तरूणपणाला आणि म्हातारपणाला मागे टाकीत प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा शेवट करीत पुढे पुढेच जात असते. असे करताना ती मागे वळून पहात नाही. 

(२) जणू काही आपण सर्वच मनुष्यगण पृथ्वीरूपी फार मोठ्या चक्रात बसून देवाच्या गावाला जाण्याचा प्रवास करीत आहोत. अशा चक्राकार प्रवासात अनेक गंमतीजमतींचा व तसेच काही त्रासदायक गोष्टींचाही अनुभव घेतोय. आपल्या सहप्रवासी लोकांच्या गुणदोषांचे क्षणिक साक्षीदार होतोय. पृथ्वीरूपी रेल्वेतून जीवनाचा प्रवास करताना काही माणसे समोर येऊन क्षणाक्षणाला मागे जात आपल्या समोरून लुप्त होताना पाहतोय. प्रत्येक सहप्रवाशाचे उतरण्याचे व निरोप घेण्याचे स्टेशन वेगळे. निरोप घ्यायचा आणि तोही कायमचा, परत कधीही न भेटण्यासाठी! निरोपाचा हा क्षण मोठ्या  दुःखाचा क्षण!

(३) प्रत्येक जीवन प्रवासी देवाच्या गावचे शेवटचे स्टेशन आले की, आपल्या जीवनाचा प्रवास संपवून क्षणार्धात या जगातून लुप्त होतो. काय विलक्षण प्रवास आहे हा! "पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया" ही शाळेत शिकलेली एक कविता जीवनरूपी प्रवासाचे किती समर्पकपणे स्पष्टीकरण करीत आहे. त्यासाठी शब्दांची थोडी अदलाबदल करावी लागेल. "पळती माणसे पाहूया, देवाच्या गावाला जाऊया!" -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा