https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

प्रेम थोडे, युद्ध फार!

प्रेम थोडे, युद्ध फार!

(१) जसजसे आम्ही अधिकाधिक कृत्रिम होत जाऊ तसतसे आम्ही जास्त घाबरट होत जाऊ. उघड्यावर चाळीत राहणाऱ्या  मी ने जेंव्हापासून फ्लॅट रूपी काडेपेटीत स्वतःला बंदिस्त करुन घेतले तेंव्हापासून माझा मी घाबरट झाला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत दगडाने अंग घासीत उघड्यावर अंघोळ करणारा माझा मी जेंव्हापासून फ्लॅट मधील छोट्याशा बाथरूम मध्ये बादलीतल्या एवढयाशा पाण्यात अंगाला साबण लावून अंघोळ करू लागला तेंव्हा पासून नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून मरेल या भीतीने घाबरट झाला.

(२) या अनावश्यक भीतीला, ज्याला इंग्रजीत फोबिया म्हणतात, आमचा कृत्रिमपणाच कारणीभूत आहे हे मला कळून चुकलेय. आम्ही आमचे मूळ नैसर्गिकत्व विसरून जाऊन अनावश्यक कृत्रिमपणाची चादर अंगावर ओढून घेतलीय. म्हणूनच ही अनावश्यक भीती. जीवंतपणी अंगाभोवती सगळ्या कृत्रिम तारा आणि मरताना नाकातोंडात सगळ्या कृत्रिम नळ्या. 

(३) खरं तर, निसर्ग आपणाला असे अगतिक, शरणागत बनवित नाही. निसर्ग जन्मापासून सर्वच जीवसृष्टीत वीर रस चेतवतो आणि जगण्याच्या वाटेत मुद्दामच खाचखळगे, अडथळे निर्माण करून लढत लढत जगायला शिकवतो. तळ्याच्या जवळ उभे रहावे तर मगरीचे आव्हान, जंगलातून फिरावे तर वाघ, सिंह, लांडगे, साप यांचे आव्हान. हे सर्व  क्रूर प्राणी माणसाचे कायमचे शत्रू. आणि माणूस तरी माणसाचा कायम मित्र आहे का? स्वार्थासाठी एक माणूस दुसऱ्या माणसाला कधी दगा देईल याचा नेम नाही. आणि तरीही आम्ही प्रेमावर खूप गप्पा मारीत असतो. नव-यांनो तुमची बायको गृहिणी असेल तर तिला बाहेरून पैसे कमवून घर चालवायला पैसे देण्याचे बंद करा आणि मग बघा ती किती तुमच्या नवरेपणावर प्रेम करते ते! घरातच ही परिस्थिती, मग बाहेर काय याचा थोडा शहाण्यासारखा विचार करा. 

(४) जगात कायम शत्रूत्व हे पूर्ण सत्य आहे, तर कायम मैत्री हे अर्धसत्य आहे. याचे कारण म्हणजे निसर्गात वीर रस जास्त व प्रेम रस कमी आहे. अनुभव घ्या आणि मग बोला. अनुभवाशिवाय विचार करून लोकांना वेडे करणाऱ्या तथाकथित विचारवंतांचे काय जातेय?

(५) मला उगाचच बाथरूम फोबियाने ग्रासले होते. डोक्याला आणि तोंडाला साबण लावला की, गुदमरून जायचो आणि कधी एकदाचा डोक्यावर पाणी घेऊन मोकळा होईल असे वाटायचे. काय विचित्र फोबिया! बायका  एवढे मोठे केस डोक्यावर घेऊन कशा अंघोळ करतात याचे खूपच आश्चर्य वाटायचे. मग एके दिवशी आपण बाथरूम मध्ये नाही तर पंढरपूरच्या नदी काठी फक्त अंडरवेयर ठेवून उघड्याने अंघोळ करतोय अशी कल्पना केली आणि तो बाथरूम फोबिया कमी झाला.

(६) अर्थात ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दामच करावी. पण त्यापूर्वी त्या गोष्टींचा नीट अभ्यास करून अंदाज घ्यावा. वाघाच्या ताकदीचा व सवयीचा नीट अभ्यास व अंदाज न करता त्याच्या तोंडात बोट घालण्याचे भलतेच धाडस केले तर काय होईल? या जगात पदोपदी शत्रू उभे आहेत. मित्र थोडे आणि शत्रू फार अशी जीवनाची अवस्था आहे. अशावेळी संत तुकारामांचे "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" हे वाक्य आठवावे व इतिहासातील वीर पुरूष व वीर स्त्रिया यांचे स्मरण करून वीर रस जागवावा. त्यासाठी हातात तलवार किंवा बंदूक घेऊन फिरायची गरज नाही. कारण साध्या साध्या गोष्टींबरोबर पण युध्द करावे लागते. तेंव्हा प्रेमाच्या मृगजळामागे धावण्याऐवजी युद्धाची तयारी ठेवा आणि  आव्हानांना सामोरे जा. कारण निसर्ग शरणागताला जगण्यासाठी संधी फारच कमी देतो आणि लढवय्या शूर वीराला अशी संधी जास्त देतो. प्रेम थोडे, युद्ध फार हेच जीवनाचे सत्य आहे. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा