https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

*MARATHI ARTICLE ON MUMBAI'S FAMOUS TEXTILE STRIKE*

*MARATHI ARTICLE ON MUMBAI'S FAMOUS TEXTILE STRIKE*

*डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला आज १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.*

ट्रॅजेडीतला नायक नियतीच्या संकेतांनुसार स्वत:च्या पावलांनी आत्मनाशाकडे चालत जातो. ८२ सालात निर्माण झालेल्या परिस्थितीला नियती म्हणायचं असेल तर गिरणी कामगार हा धीरोदात्त नायकाप्रमाणे आपली शोकांतिका रचत गेला असं म्हणावं लागेल.

डॉ. दत्ता सामंतांचा संप म्हणून जो जगाच्या इतिहासात नोंदला गेला तो ६५ गिरण्यांमधल्या अडीच लाख कामगारांचा अभूतपूर्व संप १८ जानेवारीपासून सुरू झाला तरी त्याची बीजं त्याआधी तीन महिने दिवाळी बोनसच्या निमित्तानेच पडली होती. गिरणी कामगारांची अधिकृत युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणजेच आरएमएमएसने कामगारांना २० टक्के बोनस द्यायला लावू असं आश्वासन देऊन आयत्यावेळेला ८.३३ ते १७.३३ टक्के बोनसवर मालकांशी तडजोड केल्याने कामगारांत विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. निषेध म्हणून १५ गिरण्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. दुसऱ्या दिवशी त्यातल्या सात गिरण्यांचे कामगार कामावर परतले तरी हिंदुस्थान मिलच्या ४ गिरण्या स्टॅण्डर्ड,श्रीनिवास, प्रकाश कॉटन आणि मधुसूदन मिलमध्ये संप सुरूच राहिला. २२ ऑक्टोबर रोजी स्टॅण्डर्डचे कामगार अरविंद साळसकरांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपरच्या ऑफिसवर मोर्चाने गेले. त्यांनी सामंतांना नेतृत्व स्वीकारायची गळ घातली आणि डॉक्टरांनी त्यांना तेव्हा चक्क नकार दिला होता. डॉक्टर म्हणत होते , ' संपाच्या भानगडीत पडू नका. वेळवखत बरोबर नाही , गोदामात कापडाचे तागे पडून आहेत , मालकांना कामगार कपात हवी आहे , तशात लढायला कामगारांची तयारीही झालेली नाही. ' पण कामगार पेटलेले होते. म्हणाले , आम्हाला लढायचं आहे , तुम्ही नेतृत्व करा , बास! सामंत समजावू लागले तेव्हा त्यांनी सामंतांचीच निर्र्भत्सना केली. तुम्ही ' हो ' म्हणत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही , आम्ही घेराव घालू , असं म्हणाले. त्यांचा निर्धार पाहून अखेरीस डॉक्टर तयार झाले. तिथून हा मोर्चा ' डॉ. दत्ता सामंत की जय ' असं ओरडत मध्यरात्री गिरणगावात शिरला तेव्हा सगळा परिसर जागा होता. वाऱ्याने वणवा पेटत जावा तशी ही ठिणगी सगळ्या गिरण्यांमध्ये पसरत गेली आणि सगळीकडे मेसेज गेला , डॉक्टर गिरणीच्या लढ्यात उतरतायत आणि एकदम वीज संचारल्यासारखं झालं सर्वांना.

तरीही एक मोठा गट शिवसेनेकडे आशेने बघत होता. कारण कामगार विभागात सेनेचं वर्चस्व मोठं. एक नोव्हेंबरला बाळासाहेबांनी एक दिवसाच्या बंदचा कॉल दिला होता तो प्रचंड यशस्वी ठरला होता. बाळासाहेब म्हणाले , कामगारांना २०० रुपये पगारवाढ दिली नाही तर १५ नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील. पण काय कांडी फिरली कुणास ठाऊक , कामगार मैदानावरच्या कामगार सेनेच्या भव्य मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बंदचा कॉल देणार म्हणून मोठ्या आशेने कामगार जमले असता खुद्द बाळासाहेबांचा पत्ता नव्हता. वामनराव महाडिक , नवलकर आदी नेते भाषणातून वेळ काढत होते. कामगार बाळासाहेबांची वाट बघत होते. मुख्यमंत्री अंतुलेंची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे आले आणि म्हणाले , आपण संप करत नाही आहोत...सेटिंग झाली होती..बघता बघता कामगार उठून उभे राहिले, बाळासाहेबांच्या दिशेने चपला आणि खुर्च्या भिरकावल्या गेल्या आणि जथ्याजथ्याने कामगार बाहेर पडले. मैदान रिकामं झालं. कामगार उठले ते सरळ सामंतांकडे गेले. त्याआधी सामंतांनी एम्पायर डाइंग मिलच्या कामगारांना २०० रुपये पगारवाढ त्यांच्या युनियनला मान्यता नसताना मिळवून दिली होती. कामगारांना खात्री पटली , आता आपला तारणहार एकच. डॉ. दत्ता सामंत!

१८ जानेवारीच्या आदल्या रात्री संपूर्ण गिरणगावात उत्साह सळसळत होता. चाळींच्या पटांगणांत दिवे पेटले होते पण त्याहून हजारो व्होल्टचे दिवे तिथे जमलेल्या कामगारांच्या तनामनात पेटलेले होते. मुलंबाळं रस्त्यावर उतरून मोठ्यांच्या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होती. बायका हिरीरीने आपली मतं मांडत होत्या. मध्येच कुठल्यातरी गल्लीतून ' डॉ. दत्ता सामंत झिंदाबाद! ' ' कोण म्हणतो देणार नाय , घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाय ' अशा घोषणा देत मोर्चा निघून जाई आणि वातावरण पुन्हा तापे. दुसऱ्या दिवशी कामावर जायचंच नाही , या कल्पनेने कामगार त्या रात्री झोपलेच नाहीत.

गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. ६५ गिरण्यांमध्ये एकदम शुकशुकाट पसरला. भोंगे थांबले. लूम्स , स्पिंडल्स थंड झाले. आणि तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री अंतुले यांच्या राजीनाम्याची बातमी आली. अंतुलेंनी तोडगा काढण्यासाठी त्रिपक्ष समिती नेमली होती. तिने १५०० रुपये पगारवाढ सुचवली होती. समितीचे एक सदस्य श्रीकांत जिचकार यांनी म्हणे मिल मालकांची बनावट खाती , गैरव्यवस्थापन यांचे पुरावे गोळा केले होते. पण सुगावा लागताच मिल मालक दिल्लीला जाऊन अर्थमंत्री प्रणब मुखजीर् यांना भेटले. मग सगळी चक्रं उलटी फिरली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदी आले. संपापूर्वी केंदातून वाणिज्यमंत्री बुटासिंगही येऊन गेले होते. त्यांना कामगारांची बाजू पूर्ण पटली. ते म्हणाले , ' १५० ते २०० रु. वाढ देणारच. लगेच फैसला होईल. दिल्लीला जातो. बाईंशी बोलतो आणि फोन करतो. ' बुटासिंग गेले पण त्यांचा फोन काही आला नाही. पुढे बाबासाहेब भोसलेंनी कामगारांना ३० रु. अंतरिम वाढ आणि ६५० रु. अॅडव्हान्स देऊ केला , पण सामंतांशी बोलणी न करताच. कामगारांनी ही ऑफर धुडकावली. त्याआधी व्ही. पी. सिंग येऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांना म्हणाले , सामंतांना बोलवून घ्या. कामगारांत आनंदाची लहर पसरली. आपण जिंकणार! त्यांनी गुलालाची पोती आणली. पण याखेपेस आरएमएमसचे वसंतराव होशिंग , भाई भोसले दिल्लीला इंदिरा गांधींना भेटले. बोलणी व्हायची असतील तर आमच्याशीच झाली पाहिजेत , म्हणाले. पुन्हा सूत्रं फिरली आणि दिल्लीला गेलेले व्ही. पी. परतलेच नाहीत.

डॉक्टर सामंतांची मागणी होती १५० ते २०० रुपये पगार वाढीची , अन्य सुविधांची. मान्यताप्राप्त युनियनशीच वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा ही प्रमुख मागणी होती पण त्यांच्या संपाचा कणा ठरली ती बदली कामगारांच्या प्रश्नाची मागणी. गिरण्यांत ४० टक्के बदली कामगार होते आणि त्यांना महिन्याचे केवळ ४ ते १५ दिवस काम मिळायचं. वर्षानुवर्षं ते परमनंट होत नव्हते. तशात त्यांना रजा आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी २४० दिवस भरण्याची सक्ती होती. आठ-आठ वर्षं बदलीत घालवलेले हजारो तरूण तडफडत होते. ते सगळे रस्त्यावर उतरले. गिरण्यागिरण्यांमधून कमिट्या स्थापन झाल्या. त्यांच्या गेटवर मिटिंगा होऊ लागल्या. गेटवर कामगार पहाऱ्याला बसले. सहा गिरण्यांचा एक झोन करून त्याची एक कमिटी करण्यात आली. या कमिट्या सामंतांच्या संपर्कात राहात आणि पुढची दिशा ठरवत. घाटकोपरचं कार्यालय रात्रंदिन गजबजलेलं असे. पुढे पुढे काहीच तोडगा निघण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कामगारांना डॉक्टर म्हणायचे , बघा , हे असं आहे. काय करायचं ? कामगार म्हणायचे , तुम्ही जे ठरवाल ते आम्ही मानू. आणि निघून जायचे.

ही रग कुठून आली ? ४९ साली अमलात आलेलं पगाराचं स्टॅण्डर्ड ८२ सालातही बदललेलं नव्हतं. इतर उद्योगधंद्यातले कामगार कितीतरी पुढे गेले , पण गिरणी कामगार वर्षाला चार रुपये पगार वाढ घेत खुरडत राहिला. ७४चा डांगेंचा ४२ दिवसांचा संप ४ रुपये पगारवाढीवर मागे घेण्याची नामुष्की ओढवली. जनता पाटीर्च्या काळात पुलोद सरकार आल्यावर आशा पालवल्या. पण शरद पवार-जॉर्ज फर्नांडिस यांनी अवघी ४२ रुपये पगारवाढ केली. आरएमएमएसने तर कायम मालकधाजिर्णे निर्णय घेतले. कामगारांना कोणीच वाली उरला नव्हता. ज्याच्या घामातून हे शहर उभं राहिलं तो इथला मूळ कामगार सतत अपयशाचा धनी होत धुमसत राहिला होता आणि त्यामुळेच निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला होता.

संप फुटण्याची चिन्हं दिसत नव्हती. अशावेळी इंदिरा गांधींनी मिसाखाली अटक केलेल्या बाबू रेशीम , बाब्या खोपडे आदी गँगस्टर्सना सोडलं. मिलमध्ये माणसं घुसवायची कामगिरी त्यांच्यावर होती. कमिटीच्या माणसांवर केसेस घालण्यात आल्या. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. जे होते त्यांना पोलीस अपरात्री उचलू लागले. आरएमएमएसच्या( राष्ट्रीय मिल मजदूर संघ) कार्यर्कत्यांनीही याद्या बनवायला सुरुवात केली. मिलमध्ये जाण्यासाठी आमिषं दाखवली जाऊ लागली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं प्राबल्य असलेल्या गिरण्या आधी निवडल्या गेल्या. टेक्निकल स्टाफ आणि ऑफिसर्स यांच्यावर मिलमध्ये जाण्याची सक्ती करण्यात आली. एनटीसीच्या मिल्समधल्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देऊन आत घुसवण्यात आलं. बाहेर कामगार अन्नाला मोताद झाले होते आणि आत घुसणाऱ्यांसाठी श्री खंड-पुरी , मटण सागुतीच्या जेवणावळी झडत होत्या. अधिकारी मग साचे साफ करू लागले. रा.मि.म.संघाचे कामगार येऊ लागले. घरी बसलेल्या कामगारांत चलबिचल सुरू झाली.

तरीही अनेकांची गिरणीत घुसण्याची छाती होत नव्हती. अनेकजण आशाळभूतपणे गेटवर जाऊन उभे राहात. पण सामंतांचे कार्यकर्ते तिथे असत. एका भागातला कामगार दुसऱ्या टोकाच्या मिलमध्ये कामासाठी नेण्याची स्ट्रॅटेजी होती. कमिटीचे लोक त्यांना ओळखत नसत. मग पिकेटिंग सुरू झालं. संपाच्या बाजूने असलेले संप फोडणाऱ्यांना ट्रेनमध्ये गाठत आणि धुलाई करत. अनेकांचा पाठलाग होई. प्रभादेवीच्या क्राऊन मिलमध्ये कामासाठी वडिलांबरोबर जाणारा सतरा वर्षांचा अनिल साखळकर हा तरूण असाच जिवे मारला गेला. तो काही कोणाचा कार्यकर्ता नव्हता. पोट भरण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या हौतात्म्याची आज संप फोडू पाहणाऱ्यांना याद नाही.

वातावरण चोवीस तास पेटलेलं असे. मोर्चे तर रोजच निघत. आज सेंच्युरी आणि मातुल्य , उद्या रुबी आणि इंदू , परवा मोरारजी आणि मफतलाल अशा गिरण्या ठरवून संपकरी निदर्शनं करीत , अटक करवून घेत. ८ हजार महिलांनी ८ जुलैला रा.मि.म.संघाच्या कचेरीवर मोर्चा नेला. कायदा मंत्री भगवंतराव गायकवाड म्हणाले , कामगारांना आधी कामावर जायला सांगा , मग बोलतो. १६ तारखेला १८०० कामगारांच्या मुलांनी ' आमच्या बाबांचा पगार द्या. आम्हाला शिकू द्या ' म्हणत मंत्रालयावर मोर्चा काढला. कामाठीपुऱ्यात ७०० कामगारांनी घंटानाद केला. टी. एस. बोराडेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी इंदिरा कॉंग्रेसच्या आमदारांच्या घरांवर निदर्शनं केली. महापौर प्रभाकर पै यांनी ७५ नगरसेवकांचा मंत्रालयावर मोर्चा नेला. रा.मि.म.संघाचे भाई भोसले , होशिंग यांच्या घरांवर हल्ले झाले. जेलभरो आंदोलनं झाली. तुरुंग अपुरे पडू लागले. १६ सप्टेंबरला सामंतांनी विधान भवनावर दीडलाख कामगारांचा प्रचंड मोठा मोर्चा नेला. त्यादिवशी धरण फुटून सर्वत्र पाणी व्हावं तसा जिकडे तिकडे कामगार दिसत होता.

पण या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. या लढ्यापेक्षा जुलै महिन्यात अमिताभ बच्चन अपघातात जखमी होऊन ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला , ही बातमी मोठी झाली होती. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अमिताभला पाहायला मुंबईला आले पण ते कामगारांना भेटले नाहीत. रामराव आदिकांनी संपात तोडगा काढला होता पण त्यांना केंद सरकारने गप्प बसवलं. काहीही करून सामंतांशी बोलायचंच नाही , हा केंदाचा एक कलमी अजेंडा होता. यात भरडला तो निरपराध गिरणी कामगार.

अनेक उत्तरप्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिनेच विकले नाहीत तर स्वत:च्या राहत्या जागा विकल्या. अनेक घरांत फुटके टोप आणि स्टोव्हही राहिले नाहीत. बायकांच्या गळ्यात खोट्या मण्यांची मंगळसूत्रं आली. बाबा मिटिंगवरून येताना काय बातमी आणतात याकडे मुलं आशेने भिरभिरी बघत जागत बसायची आणि उपाशी झोपायची. वह्या-पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम अनेक झाले , कामगारांना कपडे आणि धान्य वाटप झालं. पण आभाळच फाटलं होतं , तिथे ठिगळ कुठवर लावणार ? कामगार मिळेल ती कामं करू लागले. भाजी विकू लागले , बिगारी कामाची भीक मागू लागले. या संपाने एक झालं , लोकांना भीक मागायचीही लाज वाटेनाशी झाली. त्यांचा ताठ कणा पुरता मोडून गेला. स्वाभिमान ठेचला गेला. ते खुरडत , लाचार होत मिलच्या दारात काम मागायला आले. मालकांनी आणि रा.मि.म. संघवाल्यांनी त्यांच्याकडून शरणपत्रं लिहून घेतली , त्यात भविष्यात कधीही संप न करण्याची , मिळेल ते काम निमूट करण्याची हमी घेतली होती. ज्यादा काम लादलं होतं. अडीच लाख कामगार होते , परतले तेव्हा लाखच होते. दीड लाख कुठे कुठे गेले.

आजच्या पिढीला हा इतिहास पुन: पुन्हा सांगावा लागेल. इतिहासात फक्त जेत्यांच नाव राहत. कदाचित गिरणी कामगारही मुंबईच्या नकाशावरून साफ पुसला जाईल. कदाचित नवं नगर उभं करताना त्याचा नरबळी अपरिहार्य असेल. पण त्याची जिगर , त्याचा लढाऊ बाणा , त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली गिरणगाव संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. राज्यर्कत्यांच्या क्रूर उदासीनतेमुळे , कामगार संघटनांच्या मतलबी राजकारणामुळे आणि कामगारांच्या मुळावर येणाऱ्या तत्कालीन औद्योगिक परिस्थितीमुळे आज त्याची कबर खणली जाते आहे. हे अख्खच्या अख्खं ' मोहोंनजोदडो' काळाच्या उदरात गडप होत असताना त्या १८ जानेवारीची पुन्हा याद येते आहे. आज त्या खच्चीकरणाच्या प्रक्रियेला पंचवीस वर्षं होताहेत म्हणे!

*जयंत पवार*

(Sent by WhatsApp)

*Great article by Jayant Pawar. As a son of textile mill worker and myself as textile mill costing clerk, I am a live witness and sufferer of Mumbai's famous textile strike. Adv.B.S.More*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा