https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

स्वार्थ तुम्हाला किती वापरून घेतोय यापासून सावधान!

स्वार्थ तुम्हाला किती वापरून घेतोय यापासून सावधान!

(१) ख-या अर्थाने आपली महानता सिद्ध केलेल्या व्यक्तींच्या जीवनातून बोध घेण्यासारखे खूप काही असते. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही अशीच दोन महान व्यक्तीमत्वे! महात्मा गांधीनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले व डॉ. आंबेडकरांनी समाजातील शोषित वर्गासाठी आपले आयुष्य वेचले. दोघांनीही देश व समाजासाठी आपल्या संसाराकडे, मुलांकडे तसे दुर्लक्षच केले. अशी निःस्वार्थी वृत्ती किती जणांकडे असते?

(२) आता बोध घेऊया. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महात्मा गांधी  लोकांच्या डोळ्यात खुपले नाहीत. पण स्वातंत्र्य मिळाले आणि महात्मा गांधी यांचा  स्वातंत्र्य स्वार्थासाठी आवश्यक असणारा वापर लोकांसाठी  निकालात निघाला. काही लोकांना त्यांच्यातील दोष खूप ठळकपणे दिसू लागले आणि महात्मा गांधी नकोसे झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर एकाच वर्षात अहिंसक मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या महात्म्याचा हिंसेनाच काटा काढण्यात आला. केवढा विरोधाभास! यातून काय बोध घ्यायचा? बोध हाच की,  जोपर्यंत तुमचा स्वार्थासाठी वापर शक्य होतोय तोपर्यंत लोक तुमच्या दोषांकडे दुर्लक्ष करून तुमच्या गुणांचे गोडवे गाणार आणि एकदा का तुमचा वापर संपला की मग तुमच्या दोषांवर बोट ठेऊन तुम्हाला आयुष्यातून उठवणार. तेंव्हा समाजसेवेचे व्रत घेणाऱ्यांनो थोडे सावधान!

(३) समाजकारणाचे राजकारणात रूपांतर का व कसे झाले? जरा खोलाशी जाऊन विचार करा. समाजहितासाठी पुढाकार घेऊन पुढे येणाऱ्या पुढाऱ्यांना लोक त्यांच्या स्वार्थासाठी वापरून घेऊ लागले. हे जेंव्हा चाणाक्ष पुढाऱ्यांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनीही मग लोकांना वापरून घेण्याचे ठरविले. या स्वार्थी वापर प्रक्रियेतून पुढे समाजकारणाचे राजकारणात रूपांतर झाले. यात राजकीय पुढाऱ्यांचे काय चुकले? स्वार्थाचा काटा स्वार्थानेच काढावा लागतो. बावळटपणाने नव्हे!

(४) आम्हाला बदल हवाय म्हणे! कसला बदल? आम्ही आमचा स्वार्थ सोडणार आहोत का? मग कसला बदल होणार? आमच्यात आम्ही बदल करून घेऊ शकत नाही. मग हा बदल निसर्गावर सोपवून गप्प बसावे का? पण निसर्गही मोठा खोडकर आहे. याचे एक उदाहरण सांगतो. अचानक एके दिवशी एका श्रीमंताच्या कार समोर गयावया करीत एक भिकारी मुलगा येतो. त्या श्रीमंताला अचानक त्याची खूप दया येते. मग तो श्रीमंत त्या मुलाला घरी घेऊन जाऊन त्याला कायदेशीर दत्तक घेतो. त्याला चांगले शिकवून काही संपत्ती त्याच्या नावे करून त्याचे श्रीमंती थाटामाटात लग्न लावून देतो. आता तो मुलगा इंग्रजी फाडफाड बोलतो आणि महागड्या कार सफाईदारपणे चालवतो. त्याच्या कार समोर आता कितीतरी भिकारी मुले व मुली गयावया करीत येतात. पण मुळात भिकारी असलेल्या या तरूण मुलाला आता या भिकारी मुलांमुलींची बिलकूल दयामाया येत नाही. सगळे काही असे अचानक होते. याला निसर्गाचा बदल म्हणावे काय?

(५) बदल घडविणारी निसर्गाची उत्क्रांती आणि मानवाची क्रांती, दोन्हीही गोष्टी अचंबीत करून टाकणा-या! मी मात्र यातून खूप काही बोध घेतो. गौतम बुध्दांना वंदन करतो. स्वार्थ हे जगातील सर्व वाईटाचे व दुःखाचे मूळ आहे, हे त्यांचे वाक्य सतत लक्षात ठेवतो. जगातील स्वार्थाचे स्वतःला कधीही विस्मरण होऊ देत नाही आणि समाजकारण व राजकारण या दोन समांतर गोष्टींपासून स्वतःला सतत सावध ठेवतो. जगातील स्वार्थ मला किती वापरून घेत आहे, यावर बारीक लक्ष ठेवतो व स्वतःला स्वार्थापासून सावधान करतो. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा