https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

सर्वपित्री अमावास्या, एक सत्य!

सर्वपित्री अमावास्या, एक सत्य!

(१) ३० सप्टेंबर, २०१६ पितृपक्षाचा शेवटचा दिवस, अर्थात सर्वपित्री अमावास्या. मला कायमचे सोडून वर गेलेले आईवडील, सासूसासरे आणि धाकटा भाऊ यांचे कपाटात ठेवलेले फोटो बाहेर काढले. त्यांची आम्ही नवरा बायकोने मिळून पूजा केली. त्यांच्यापुढे दोन नैवेद्य ठेवले. दिवसभर त्यांनी जेवण केले असे समजून संध्याकाळी त्यांच्या नावाने एक नैवेद्य गच्चीवर ठेवला. तो कावळ्यांबरोबर कबुतरांनीही खाल्ला. धाकटया भावाला कबुतरांविषयी फार प्रेम होते. त्यामुळे कबुतरांनीही नैवेद्य खाल्ला हे बघून मनाला बरे वाटले. दुसरा नैवेद्य इमारती  खाली जाऊन गाईला खाऊ घातला. तो घास गरीब भुकेल्या माणसाच्या मुखात पण खाऊ घालून वेगळे समाधान मिळविता आले असते. पण मृत माणसांना दाखविलेला नैवेद्य जीवंत माणसांना कसा द्यायचा? त्यापेक्षा जीवंत पशूपक्षांस दिलेला बरा म्हणून त्यांना दिला. आता कोणी म्हणेल पक्षांमध्ये कावळ्यांचीच निवड का आणि पशूंमध्ये गाईचीच निवड का? याला माझ्याकडे शास्त्रीय उत्तर नाही. धार्मिक आहे. मी हिंदू आहे हेच ते उत्तर! इतर दिवशी इतर पशूपक्षी, मनुष्य प्राणीमात्र यांच्या विषयीचे शास्त्रीय सत्कर्म करायला मी मोकळा असतोच आणि संधी मिळेल तिथे ते कर्म मी करीतच असतो.

(२) भूतकाळात रमायचे नसते, हे जरी खरे असले तरी भूतकाळ हाच वर्तमान काळाचा पाया असतो हेही विसरायचे नसते. आपण सर्वच जण निसर्गचक्राच्या दावणीला बांधलेले आहोत. म्हणून तर कायमचे सोडून गेलेल्या आपल्या आप्तेष्टांना रोज आठवत बसून वर्तमान काळाचा विसर पडू द्यायचा नसतो. पण निदान वर्षातून एका दिवशी तरी वर्तमान काळाला काही काळ का असेना पण सोडचिठ्ठी देऊन आपल्या प्रिय आप्तेष्टांच्या आठवणींत रमण्यासाठी मला हिंदू धर्मातील सर्वपित्री अमावास्या भावते. हिंदू धर्मातील इतर सण उत्सव हे सुध्दा भूतकाळातील घटनांना वर्तमान काळातील ठराविक दिवशी उजाळा देण्याचाच एक आनंददायी भाग असतो. मग श्रीकृष्णाची दहीहंडी असो, महादेवाची महाशिवरात्र असो, दुर्गा मातेची नवरात्री असो की, देवांची दिवाळी असो. 

(३) सर्वपित्री अमावास्या संपली आणि नवरात्रीचा पहिला दिवस उगवला. झोपेतून उठल्यावर स्वतःच स्वतःला एक चिमटा काढला आणि जीवंत असल्याची खात्री करुन घेतली. मग पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन चांगला विचार आणि एक नवीन चांगले कार्य सुरू ठेवायला तयार झालो. आता या सर्व खटाटोपीला  कोणी अंधश्रध्दा म्हटले तर मला काही फरक पडत नाही. माझ्या दृष्टिकोनातून हे सर्व सत्य आहे. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा