https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २ एप्रिल, २०१७

शांत व सुखी जीवन हा केवळ कायद्याचा खडतर प्रवास!

शांत व सुखी जीवन हा केवळ कायद्याचा खडतर प्रवास!

निसर्गाचे वास्तव सुंदर आहे, तसे ते भयाण ही आहे. निसर्गातील सुंदरता कशी वाढविता येईल आणि निसर्गातील भयाणता कशी कमी करता येईल, या दोन मूलभूत विचारांतून मानवी बुद्धीने नैसर्गिक शिस्तीवर आधारित नैसर्गिक कायद्याचा अर्थात नैसर्गिक  विज्ञानाचा/निसर्गशास्त्राचा व सामाजिक शिस्तीवर आधारित सामाजिक कायद्याचा अर्थात सामाजिक विज्ञानाचा/समाजशास्त्राचा शोध घेतला. निसर्गशास्त्राचा मानवी बुद्धीकडून केला जाणारा कुशल वापर म्हणजेच नैसर्गिक तंत्रज्ञान आणि समाजशास्त्राचा मानवी बुद्धीकडून केला जाणारा कुशल वापर म्हणजेच सामाजिक तंत्रज्ञान. परंतू सामाजिक तंत्रज्ञान हा शब्दप्रयोग वापरात नाही. कारण सामाजिक विज्ञानाला विज्ञान म्हणायचे का या प्रश्नाचे ठोस उत्तर मानवी बुद्धीला नीट मिळाले नाही असेच दिसते. म्हणूनच मानवी बुद्धी नैसर्गिक दृष्ट्या सुशिक्षित झाली तरी सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत झाल्याचे स्पष्ट दिसत नाही.  

कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी ते वाकडे ते वाकडेच रहाते. त्याचप्रमाणे सामाजिक सुसंस्कृतपणाच्या बाबतीत मानवी बुद्धीला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या  बाबतीत ती वाकडी ती वाकडीच रहाते. म्हणूनच दिवाणी कायदा असो वा फौजदारी कायदा असो, मानवी बुद्धीवर या कायद्यांचे किती नियंत्रण आहे हा प्रश्नच वादग्रस्त आहे. म्हणूनच शांत व सुखी मानवी जीवन हे केवळ या कायद्यांचा खडतर प्रवास आहे, असेच म्हणावे लागेल. -बी.एस.मोरे,वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा