https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

प्रेरणा की प्रार्थना?

प्रेरणा की प्रार्थना?

(१) निसर्ग ही एक अजब रासायनिक शक्ती आहे. याच अजब शक्तीने मनुष्य नावाचा अजब बुद्धिमत्तेचा प्राणी बनविला. याच शक्तीने निर्जीव हिरे, माणिकांची निर्मिती करण्याबरोबरच सजीव मानव रूपातील काही असामान्य रत्नांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही अशीच असामान्य रत्ने ज्यांनी मनुष्य समाजाला योग्य दिशा दिली, प्रेरणा दिली.

(२) प्रत्येक काळात व प्रत्येक पिढीत निसर्गाकडून अशा असामान्य रत्नांची निर्मिती केली जाते. निसर्गाची ती गरज आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येईल व अधर्माला माज येईल तेंव्हा तेंव्हा अधर्माचा माज उतरवून धर्माची पुन्हा पुन्हा प्रतिष्ठापणा करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. त्याचा अर्थ तोच घ्यायचा व सद्याच्या आधुनिक काळात सुध्दा प्रतिकूल परिस्थितीत राहून सुद्धा जी माणसे चांगले कार्य करीत आहेत त्यांना सुद्धा निसर्गाच्या अलौकिक शक्ती रूपात पहायचे आणि त्यांच्याकडून मनुष्य जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी प्रेरणा घ्यायची.

(३) आता प्रश्न हा पडतो की, या असामान्य रत्नांना प्रत्यक्ष निसर्गच मानून त्यांना देवत्व बहाल करायचे का? एकदा का या रत्नांनाच देव मानले की, मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुतळे उभारणे आले. मग त्या पुतळ्यांमध्येच संपूर्ण निसर्ग शक्तीला की देवाला कल्पून त्या पुतळ्यांना शरण जाणे, त्यांच्यापुढे प्रार्थना करणे आले. या रत्नांना स्मरूण त्यांच्याकडून प्रेरणा घेणे वेगळे आणि त्या पुतळ्यांनाच देव मानून ती रत्ने पुन्हा जशीच्या तशी त्या पुतळ्यांतून बाहेर येऊन आपले प्रश्न चुटकीसरशी सोडवतील अशा भाबड्या कल्पनेतून त्या पुतळ्यांसमोर प्रार्थना करणे वेगळे. 

(४) माझ्या दृष्टिकोनातून ही श्रध्दा नसून अंधश्रध्दाच आहे. आता या महान व्यक्तीमत्वाच्या पुतळ्यांकडून त्यांच्या जीवनातील महान कार्याची  प्रेरणा घ्यायची की, त्या पुतळ्यांसमोर प्रार्थना करीत राहायचे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अशा अंधश्रध्देस रोखू शकत नाही.
समाज सुधारक फार तर वैज्ञानिक शिक्षणाच्या माध्यमातून अशा अंधश्रध्द व्यक्तींचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रेरणा की प्रार्थना हा महत्त्वाचा प्रश्न आहे, एवढे मात्र निश्चित! -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा