https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

विचारांच्या मर्यादा!

विचारांच्या मर्यादा!

(१) वाईटाचा नाश बॉम्ब गोळ्यांनी शक्य आहे की ज्ञान गोळ्यांनी शक्य आहे, हा वादाचा मुद्दा असला तरी मानवाची प्रगती ज्ञान गोळ्यांनीच शक्य आहे यात शंका नसावी. पण प्रत्यक्षात मात्र ज्ञान गोळ्यांपेक्षा बॉम्ब गोळेच लोकांना जास्त आकर्षित करतात हे दिसून येते. मानवी मन आभासी दुनियेत जास्त रमते आणि मृगजळाच्या पाठीमागे जास्त धावते, हेच खरे. 

(२) समाजमनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या विचारवंत, लेखकांच्या प्रयत्नांना खूपच मर्यादा असतात. त्यांचे ज्ञान गोळे इकडे तिकडे भरकटत राहून शेवटी फुसके बार ठरतात. याला काही अपवाद ठरले तरी सर्वसाधारणपणे पॉवरफुल विचारांचे बार सुद्धा फुसके ठरतात याचा अनुभव बहुतेक सर्वच विचारवंत, लेखक घेत असतात.

(३) समाजमाध्यमातून विचार प्रकट करणाऱ्या लेखकांचा आवाका तर फारच मर्यादित असतो. वृत्तपत्रे, दूरदर्शन या प्रस्थापित माध्यमांत सगळ्यांचीच डाळ शिजत नाही. काहीजण ओळखीपाळखी काढून किंवा इतर मार्गाने त्या माध्यमांपर्यंत पोहोचले तरी त्यांच्या विचार प्रभुत्वालाही मर्यादा असतात. या सर्व अडचणींवर मात करुन समाजमनावर राज्य करण्यासाठी पुढे येणारा एकच पॉवरफुल वर्ग असतो आणि तो म्हणजे राजकारणी मंडळीचा वर्ग. ही मंडळी कोणता मुद्दा कधी बाहेर काढतील आणि समाजमनाला आभासी क्रांतीच्या जंजाळात कधी घेतील आणि समाजमनाला पेटवून देऊन स्वतःची पोळी कशी भाजतील, याचा नेम नाही. समाजमनही अशाच गोष्टींकडे जास्त आकर्षित होते. तेंव्हा विचारवंत, लेखकांनो आपल्या मर्यादा लक्षात घ्या. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा