https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

सहानुभूती नको, हक्क हवाय!

सहानुभूती नको, हक्क हवाय!

(१) या स्वार्थी जगात कोणाला सहानुभूतीची मेहरबानी नकोय, तर प्रत्येकाला त्याच्या कायदेशीर हक्काचा वाटा हवाय. या नैसर्गिक मागणीत काहीही वावगे नाही.

(२) आईवडीलांनी त्यांच्या हयातीतच मुलांच्या नावे स्वतःची स्वकष्टार्जित मिळकत हस्तांतरीत करायची आणी मग वृध्दापकाळी मुलांच्या सहानुभूतीची अपेक्षा करीत बसायचे. बहिणींनी पण पुढचा मागचा विचार न करता आईवडीलांच्या संपत्तीतला त्यांचा हक्क समाजाने निर्माण केलेल्या कालबाह्य परंपरेला कवटाळून हक्कसोड पत्राने भावांच्या नावे हस्तांतरीत करुन टाकायचा आणि मग भावांच्या सहानुभूतीची वाट बघत जगायचे. 

(३) आईवडीलांनी मुलांना जन्म दिल्यानंतर शक्य असेल तेवढया ताकदीने त्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे करणे हे आईवडीलांचे नैसर्गिक कर्तव्य असते आणि असे कर्तव्य पार पाडल्यानंतर आईवडीलांच्या पाठिंब्याने मोठ्या झालेल्या मुलांनीही आईवडीलांच्या वृध्दापकाळी त्यांच्या थकल्या भागल्या शरीर व मनाला सशक्त आधार देणे हे त्यांचे नैसर्गिक कर्तव्य असते. 

(४) निसर्गाने या सर्व गोष्टी इतक्या सोप्या पध्दतीने स्पष्ट केल्यानंतर सुद्धा काही माणसे मूर्खपणाने का वागतात हेच कळत नाही. काही मूर्ख माणसे त्यांची कर्तव्ये पार पाडतात, पण त्यांचे हक्क वसूल करण्यात टाळाटाळ करुन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात. या उलट, काही मूर्ख माणसे मोठ्या जोशात स्वतःच्या हक्कांची मागणी करतात, पण स्वतःची कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करुन स्वतःच भ्रष्टाचार करतात.

(५) अशी भ्रष्टाचारी माणसे स्वतःच्या चूका झाकून कायद्याच्या नावे सारखी बोटे मोडत असतात. हो, हेही खरेच की मूर्खांना कायदा काय कळणार? हक्कापेक्षा जास्त घेणे व कर्तव्यापेक्षा जास्त देणे यालाच तर भ्रष्टाचार म्हणतात. एवढी साधी सरळ गोष्ट या मूर्खांना कळत नाही. निसर्ग की देव सुद्धा असल्या मूर्खपणाला वैतागल्याशिवाय रहाणार नाही. मूर्खपणातून भ्रष्टाचार करणारी अशी माणसेच देवापुढे नवस करीत रडत बसतात. अशा मूर्ख माणसांची कीव करावी तितकी थोडीच आहे.

(६) निसर्गाने की देवाने, हे जग  स्वार्थीच बनविले आहे. त्यामुळे नैसर्गिक स्वार्थाविषयी सतत जागृत असणाऱ्या, त्यासाठी प्रसंगी धूर्तपणे वागणाऱ्या लोकांचे आचरण मला कायदेशीर दृष्टिकोनातून योग्यच वाटते. वास्तविक पहाता, जगात मूर्ख माणसांबरोबर रहाण्याची व निसर्गाने दिलेल्या कायद्यानुसार त्यांच्याबरोबर देवाणघेवाण करण्याची परिस्थिती निर्माण होणे व सतत समोर येत रहाणे यापेक्षा अधिक त्रासदायक, संतापजनक, क्लेशकारक व ताण देणारी दूसरी गोष्ट नाही. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा