https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे!

जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे!

(१) देशात जुन्या नव्या नोटांचा चलन संघर्ष चालू असताना, माझा स्वतः बरोबरच शारीरिक चलनवलन संघर्ष चालू आहे. आता साठीच्या वयात झोपेतून उठून पटकन दैनिक नित्यकर्म उरकणे सुद्धा कठीण होऊ लागलेय. पूर्वी तरुण  वयात सकाळची नित्यकर्मे पटापट उरकून सकाळच्या कॉलेजात व त्यानंतर दिवसाच्या नोकरीला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडायचो. त्यानंतर मध्यम वयात सुद्धा तितकासा शारीरिक त्रास जाणवला नाही. पण हल्ली ही धावणारी गाडी बिघडल्या सारखी वाटतेय. झोपेच्या बाबतीत तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस झालाय. डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाल्यानंतर आता अंगावरील इतर केसही पांढरे होऊ लागलेत. चेहऱ्यावरील चकाकी कमी होऊ लागलीय.

(२) एवढे शारीरिक बदल झाल्यानंतर सुद्धा मन मात्र अजूनही तरुणासारखे धावू पहातेय. पण शरीर त्या उडत्या मनाची साथ संगत सोडत चालल्याची जाणीव होतेय. पूर्वी मनाचा निश्चय झाला की, तो काहीही करुन तडीस न्यायचो. पण आता तसे होत नाही.

(३) माझे आता हयात नसलेले आईवडील त्यांच्या वृध्दापकाळी हळूहळू याच परिस्थितीतून जात असताना मी मात्र त्यांच्या वेदनांपासून अलिप्तच होतो. मी आईला औषधे आणून द्यायचो. माझे स्वाभिमानी वडील मात्र स्वतःच के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची औषधे घेऊन यायचे. दोघांची मी मायेने विचारपूस करायचो. पण त्यांच्या वेदनांचा त्रास जास्त आरडाओरडा न करता तेच सहन करीत होते. शेवटी दोघांचाही शेवट सर्वसामान्य गरीबांप्रमाणे शासकीय रुग्णालयांतच झाला. वडील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये गेले आणि आई जे.जे. हॉस्पिटलमध्ये गेली. मुलांना आर्थिक भार नको म्हणून हृदयविकार असूनही वडिलांनी त्यांचे अॉपरेशन शेवटपर्यंत टाळले. फक्त रक्त पातळ होणाऱ्या के.ई.एम. हॉस्पिटलच्या गोळ्या शेवटपर्यंत घेत राहिले.

(४) माझे आईवडील त्यावेळी किती यातना भोगत असतील याची जाणीव आता स्वतःच्या अनुभवातून हळूहळू होऊ लागलीय. आपण ब-याच वेळी इतरांच्या अनुभवातून न जाता स्वतःचे मतप्रदर्शन करीत असतो. पण तसे मतप्रदर्शन चूकीचे असू शकते. म्हणूनच संतांनी म्हटले आहे की, जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे! -बी.एस.मोरे, वकील 

टिपः मनुष्य जीवनाचे अनेक पैलू आहेत. माझ्या अनुभवांतून यातील काही पैलूंना स्पर्श करीत मानवी जीवनाचे सत्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा