https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

म्हातारपण देगा देवा!

म्हातारपण देगा देवा!

(१) लग्न झाले की, लोक लाडू वाटून आनंद व्यक्त करतात. लग्नानंतर विवाहित जोडप्याला मूल झाले की, लोक पेढे, बर्फी वाटून आनंद व्यक्त करतात. जन्मलेल्या मूलाचा वाढदिवस आला की, लोक केक कापून आनंद व्यक्त करतात. मग साठी आली आणि ख-या अर्थाने वृध्दापकाळ सुरू झाला की, धमाल पार्टी करून आनंद व्यक्त करण्यास काय हरकत आहे?

(२) कित्येक माणसांचा अकाली मृत्यू होतो. म्हातारपणाचा अनुभव घेणे त्यांच्या भाग्यात नसते. खरं म्हणजे, म्हातारपणाचा अनुभव म्हणजे संपूर्ण परिपक्वतेचा अनुभव! हा अनुभव मिळण्यासाठी सुद्धा भाग्य किंवा निसर्गाचा वरदहस्त लागतो. म्हणूनच निसर्गाने की देवाने संपूर्ण परिपक्वतेचा अनुभव घेण्याची संधी तुम्हा वृध्दांना दिली म्हणून त्याचे आभार माना. हळूहळू म्हातारे व्हा आणि हळूहळू मृत्यूचे सर्वोच्च शिखर सर करा. 

(३) जन्मणा-या बाळाला जीवनाचा आनंद कळायला वेळ लागतो. जन्मल्याबरोबर लगेच त्या आनंदाची त्याला कल्पना येत नाही. त्याचा तो आनंद त्याचे आईवडील व जवळचे नातेवाईक साजरा करतात. पण मरणाऱ्या वृध्दाला मृत्यूचा खराखुरा आनंद प्रत्यक्ष घेता येतो.

(४) तेंव्हा वृध्दांनो, म्हातारपण आले म्हणून रडत, कुडत बसू नका. नवा अनुभव घेण्यास तयार रहा. निसर्गाच्या अलौकिक प्रक्रियेचा व दिव्य शक्तीचा मनसोक्त अनुभव, उपभोग  व आनंद घ्या. मात्र या प्रक्रियेतून जात असताना, कृपया निसर्गाचे मूळ व देवाचे कूळ शोधण्याचा प्रयत्न करू नका. ते गूढ आहे आणि गूढच राहू द्या. आता म्हणा, म्हातारपण देगा देवा! -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा