नवीन पिढी व विवाह संस्था?
सरासरी पंधरा वर्षातच मुलींना मासिक पाळी येते. तेव्हापासून पस्तीस वर्षांपर्यंत म्हणजे पुढे २० वर्षे उच्च शिक्षण, करियरसाठी मुली लग्न करीत नाहीत. मग अशा उपवर मुली असाच एखादा उच्च शिक्षित उपवर मुलगा नवरा म्हणून स्वीकारून ३५ वयात लग्न करतात. मग दोघे उच्च शिक्षित प्रौढ नवरा बायको स्वतंत्र फ्लॅट व करियर मध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत पुढे जवळजवळ पाच वर्षे मूल होऊ देत नाहीत. चाळीशीत झालेले मूल आईवडील साठ वर्षांचे म्हातारे होतात तेव्हा वीस वर्षाचे होते. चाळीस ते साठ या वीस वर्षांत करियर मध्ये बिझी असलेले उच्च शिक्षित आईवडील त्यांच्या मुलाला/मुलांना वाढविण्यासाठी आईवडील म्हणून किती वेळ देतात? मग मूल कसेबसे पाळणाघर वगैरे करीत करीत वाढते व वीस वर्षाचे होते तेव्हा आईवडील ६० वर्षांचे म्हातारे झालेले असतात. आता काही लोक साठ वय म्हणजे तरूणपणाचे वय म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच. शिक्षण व करियर यांना महत्व दिले पाहिजे. पण त्यासाठी मुलामुलींनी असे अनैसर्गिक वागणे चुकीचे नाही का? पण कृत्रिमतेचे वेड लागलेल्या नवीन पिढीला कोण समजावून सांगणार? हल्ली तर लग्नाशिवाय पस्तीशी (काहीवेळा चाळीशी) गाठलेल्या मुलामुलींना लग्न म्हणजे काय याचे समुपदेशन करणे गरजेचे झाले आहे. विवाह संस्थेचा व कुटुंब व्यवस्थेचा सगळा विचका करून टाकलाय. अशी काही उपवर मुले मुली काही वर्षे अगदी बिनधास्त लिव इन रिलेशनशिप मध्ये राहतात व काही कारणांमुळे एकमेकांशी पटेनासे झाले की सरळ लिव इन रिलेशनशिप करार मोडीस काढून मोकळे होतात व दुसऱ्या, तिसऱ्या रिलेशनशिपसाठी तयार राहतात. काय चाललंय काय हे? काही वेळा लिव इन रिलेशनशिप ब्रेक झालेली मुले मुली या पूर्वीच्या गोष्टी लपवून वधूवर सूचक मंडळात नावनोंदणी करतात व मग लग्नासाठी उपवर जोडीदार शोधत राहतात. अशा पद्धतीने उपवर मुलामुलींचे लग्न जुळून जरी आले तरी त्यांनी पूर्वीच्या गोष्टी (लिव इन रिलेशनशिप वगैरे) एकमेकांपासून लपवून ठेवलेल्या असल्याने त्यांचा पुढे कधीतरी स्फोट झाल्याने मग प्रकरण टोकाला म्हणजे घटस्फोटापर्यंत जाते. हे सर्व बघवत नाही. कितीही मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे उभी करा जर विवाह संस्था व कुटुंब व्यवस्थाच ढासळली तर असे वरवर देवदेव करून काय उपयोग?
-©ॲड.बी.एस.मोरे, १३.४.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा