https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १७ मे, २०२५

वरळी बी.डी.डी. चाळी इतिहासजमा!


वरळी, मुंबईच्या बी.डी.डी. चाळी इतिहास जमा!

मराठा मंदिर वरळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी, वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक १२१ मध्ये राहणारे  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व माझे जवळचे मित्र श्री. सुशिलकुमार वर्मा यांची हल्लीच एक अवघड न्यूरोसर्जरी झाल्याने त्यांना भेटण्यासाठी आज दिनांक १६.५.२०२५ रोजी त्यांच्या वरळीच्या घरी गेलो होतो. आता त्यांची तब्बेत सुधारत आहे.

या भेटीनंतर माझे ज्या चाळीत बालपण व तरूणपण गेले त्या चाळ क्रमांक ८४ मध्ये जाऊन आमच्या पूर्वीच्या ६६ क्रमांक खोलीचे दर्शन घेतले. या खोलीचे दर्शन हे माझ्या हयात नसलेल्या आईवडिलांचे दर्शन होते ज्यांनी याच खोलीत गरिबीत पण नेटका संसार केला व त्यांच्या छत्रछायेखाली याच खोलीत आम्ही चार भावंडे (मी सगळ्यात थोरला) मोठे झालो.

वरळीच्या बी.डी.डी. चाळी पाडून तिथे पुनर्वसित उंच उंच इमारती बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. ज्यांनी या चाळींतील एकदम छोट्या १२० चौ.फुटाच्या खोलीत आयुष्य काढले त्यांना आता ५०० चौ.फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट वरळीत त्याच जागी मिळणार आहे ज्याची किंमत जवळजवळ २ कोटी रूपये आहे. ज्यांनी ही छोटी घरे टिकवली त्यांचे सोने झाले. २००९ साली वडिलांच्या मृत्यूनंतर आम्हा चार भावंडात याच ८४/६६ खोलीच्या वाटण्या झाल्याने आम्हाला ही खोली टिकवता आली नाही. परंतु चार भावंडांच्या वेगळ्या संसाराचा प्रश्न होता त्यामुळे आम्हा चार भांवंडांना हा कटू निर्णय घ्यावा लागला. आम्ही मुंबई बाहेर फेकलो गेलो ते असे.

थोड्यांच दिवसांत या बी.डी.डी. चाळी बिलकुल दिसणार नाहीत. तिथे पुनर्वसित उंच उंच इमारती दिसतील. अशाप्रकारे या चाळी इतिहासजमा होतील. आम्ही जुनी माणसे तो इतिहास आमच्या मृत्यू पर्यंत डोक्यात ठेवू. पुढच्या पिढीला आमच्या त्या चाळ संस्कृतीची मजा कळणार नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.५.२०२५  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा