बुद्धीच्या मर्यादा!
मनुष्याला निसर्गाकडून मिळालेली बुद्धी हे माणसाला मिळालेले खूप शक्तिशाली शस्त्र आहे पण या निसर्ग निर्मित शस्त्राला त्याच्या मर्यादा आहेत. बुद्धी नावाच्या नैसर्गिक शस्त्राला धारदार बनविण्यासाठी चांगले आरोग्य, ज्ञान व त्यासोबत संयम, धैर्य, धाडस हे गुण आवश्यक असतात. पण या सर्वांबरोबर पैसा व सत्ता या दोन प्रबळ शक्तींची साथ मिळाली तर दुधात साखर. बुद्धीचे शस्त्र हळव्या भावनांनी धारदार होण्याऐवजी कमकुवत होते हे खरे आहे. त्यामुळे सतत परीक्षा घेणाऱ्या मानवी जीवनाचे युद्ध जर बुद्धी शस्त्राच्या जोरावर लढायचे असेल तर या युद्धात अडसर ठरणाऱ्या मनुष्याच्या हळव्या भावना बाजूला ठेवाव्या लागतात. युद्ध भूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद् गीतेतून हाच संदेश दिला आहे व तो संपूर्ण मानव जीवनाला लागू आहे.
पण या बुद्धी शस्त्राच्या ताकदीचे गुणगाण गाताना या शस्त्राच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. आता त्यासाठी काही उदाहरणे सांगतो. व्यायामाचे महत्व खुलवून सांगणाऱ्या एखाद्या व्यायामपटूचे निधन धावण्याचा व्यायाम करताना हार्ट अटॕकने होते तेव्हा त्याची बुद्धी कुठे जाते? हजारो हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या एखाद्या प्रसिद्ध हार्ट सर्जनचा मृत्यू हार्ट अटॕकनेच येतो तेव्हा त्याची बुद्धी कुठे जाते? मेंदूच्या शस्त्रक्रिया सलग यशस्वीपणे पार पाडणारा एखादा प्रसिद्ध न्यूरोसर्जन मानसिक संतुलन बिघडल्याने किंवा कोणत्या तरी मानसिक दबावाखाली आत्महत्या करतो तेव्हा त्याची बुद्धी कुठे जाते? देव अध्यात्मावर लोकांना प्रवचने देणारा एखादा प्रसिद्ध कीर्तनकार त्याचा एखादा वैयक्तिक प्रश्न सोडवायला अध्यात्मातला तो देव धावून येत नाही हे कळल्यावर निराश होऊन आत्महत्या करतो तेव्हा त्याची बुद्धी कुठे जाते?
भौतिक निसर्गात आध्यात्मिक देव (परमेश्वर) आहे असे पुराव्याने नव्हे तर केवळ तर्काने मानले तरी त्याचे भक्तीमय अध्यात्म आशा, निराशेचा वरखाली करणारा मृगजळी खेळ आहे हे लक्षात येते. परमेश्वराच्या अध्यात्मातून हाती काहीही ठोस लागत नाही. त्यामुळे परमेश्वरावर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. जो परमेश्वरावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून देवावर पूर्ण विश्वास टाकून निर्धास्त राहणे चुकीचे आहे. मनःशांती, थोड्याफार मानसिक समाधानासाठी थोडा देवधर्म करणे ठीक. पण त्याचा अतिरेक नको. अती देवभोळेपणा माणसाला या स्वार्थी, कठोर दुनियेत खड्ड्यात घालू शकतो.
देवाला सोडून नास्तिक बनून नुसत्या निसर्गाला धरावे तर तो तरी कुठे स्थिर, निश्चित आहे? अधूनमधून हा निसर्ग त्याचा लहरीपणा दाखवतच असतो. मानवी स्वभाव हा निसर्गाचा भाग असल्याने तोही लहरीच आहे. मानवी स्वभावाची शास्वती देता येत नाही. तो स्वार्थी व संधीसाधू असतो व त्यामुळे बाहेरच्या काय आपल्याच जवळच्या माणसांवर पूर्ण विश्वास टाकता येत नाही. एखाद्याची गरिबी, कमकुवत परिस्थिती बघून माणसे त्याच्या गरिबीचा, त्याच्या कमकुवत परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला टपलेलीच असतात. कोणावरही पूर्ण भरवसा टाकता येत नाही. विज्ञानाने सांगितलेल्या निसर्ग नियमांचे काय? ते तरी कुठे धड आहेत. ते बहुतांशी कठोर आहेत व काही अंशी मवाळ आहेत. गुलाब फूल सुंदर, सुगंधी व मोहक वाटते पण त्याला काटेच फार अशी विविधतेने नटलेल्या निसर्गाची स्थिती आहे. यात कुठेतरी स्थिरता आणावी म्हणून माणसांनी मानवी बुद्धीच्या जोरावर निसर्ग विज्ञानातून दोन गोष्टी बाहेर काढल्या. एक गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान व दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक कायदा. देव अध्यात्म ही तिसरी गोष्ट असली तरी ती किती बेभरोसे आहे हे मी वर सांगितलेलेच आहे.
पण तंत्रज्ञानाने मानवी जीवनात काय केले तर सुख सुविधांच्या नावाने चंगळवाद आणला. आणि सामाजिक कायदा तरी काय करतोय? तो वेळ, काळ, परिस्थिती नुसार सारखा बदलतच आहे. तो न्यायाची शास्वती (गॕरंटी) देऊ शकत नाही. कायद्याची केस घेताना वकील अशिलांना हेच सांगतात ना! मग या केसेस पोलीस स्टेशन, प्रशासन व शेवटी न्यायालय यांच्या चक्रात वर्षानुवर्षे कशा फिरत राहतात हे काय सांगायला हवे. धूर्त व पैसा, सत्तेने शक्तिशाली असलेली काही मूठभर माणसे कायद्याला त्यांच्या सोयीनुसार कशी वाकवतात हे जगजाहीर आहे. कसला न्याय आणि कोणाकडून मागायचा? देव, निसर्ग की मानव समाज? सगळे सँडविच झालेय मानवी जीवनाचे. आणि म्हणे या जन्मावर, जगण्यावर शतदा प्रेम करावे? अशा चक्रव्यूही परिस्थितीत माणसाला शेवटी आधार कोणाचा? स्वतःकडे अंगभूत असलेल्या बुद्धीचाच ना! पण शेवटी या बुद्धीला सुद्धा तिच्या कोणत्या मर्यादा आहेत हे मी वर सांगितलेलेच आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.४.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा