https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २२ मे, २०२५

माझी मेंदू पाटी आता कोरी कर!

माझी मेंदू पाटी आता कोरी कर!

हे निसर्गा, तूच माझा बाप,
तूच माझी आई, तूच माझा गुरू,
आयुष्यभर पळवलंस मला तू,
तुझ्या मागे तुरूतुरू!

जन्मताना होती माझी मेंदू पाटी कोरी,
माझंच मला भान नव्हतं,
जगाची जाण कशी असेल खरी?
तूच ठरवलेल्या माझ्या जन्मदात्या
आईबापाचं नाव तूच भरलंस,
माझ्या कोऱ्या मेंदू पाटीवर
आणि हीच जगाची पहिली ओळख ठरली खरी!

मग माझी मेंदू पाटी,
माझ्या ‘मी’ पणाने तू भरत गेलास,
माझे शिक्षक, माझ्या भाऊ-बहिणी,
माझे नातेवाईक, माझा धर्म, माझी जात, माझा समाज, माझी भाषा, माझा देश अशा ‘माझेपणाच्या’ ओळखी वाढवत गेलास!

मग माझ्या मेंदू पाटीवर
तुझे विज्ञान, तंत्रज्ञान, लोकांचे तत्वज्ञान कोरत गेलास,
माझ्या इच्छा-आकांक्षा वाढवत गेलास,
माझी मेंदू पाटी भरत
मला तुझ्या खेळात खेळवत गेलास!

आता बस्स झालं हे सगळं,
कंटाळा आला माणसांच्या ओळखीचा आणि तुझ्या खेळाचा,
मला नाही राहिला रस
आता आणखी कशाचा,
विसर पडू दे मला
माझ्या आयुष्यात तू आणलेल्या
माझ्याच माणसांचा!

आता एकच मेहरबानी कर निसर्गा,
माझ्या स्वतःच्या ओळखीला
माझ्यापासून दूर कर,
माझी मेंदू पाटी जन्माच्या वेळी जशी कोरी होती तशीच आता कोरी कर!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा