https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ मे, २०२५

कौटुंबिक आदर्शवादाचा बळी!

कौटुंबिक आदर्शवादाचा बळी, एक वृद्ध वकील!

स्त्री म्हणे कशाचीही पर्वा न करता संसारात जीव ओतते आणि पुरूष काय करतो? तो संसारात काहीच करीत नाही. गृहलक्ष्मीने (गृहिणीने) घर सांभाळावे व पतीने बाहेर कष्ट करून घर चालवायला पैसा आणत रहावा व दोघांनी मिळून घरसंसार चालवावा अशीच भारतीय समाजात पूर्वापार चालू आलेली परंपरा आहे. पण आता मुलांबरोबर मुलीही उच्च शिक्षण घेऊ लागल्या व घराबाहेर पडून घरात पैसा आणू लागल्या. मग काय दोघांची भरपूर कमाई व तिच्या जिवावर मुंबईत आलिशान फ्लॅट, दोघा नवरा बायकोला स्वतंत्र कार, त्या कारसाठी दोघांनी आपल्या स्वतंत्र कमाईतून ठेवलेले त्यांच्या स्वतंत्र कारचे स्वतंत्र ड्रायव्हर्स. संध्याकाळी कामावरून घरी आले की आलिशान फ्लॅट सोसायटीतील स्विमिंग पूलमध्ये पोहणे, पोहून झाल्यावर अशा सोसायटीच्या क्लब मध्ये आवडीचे खेळ खेळणे व मग सोसायटी गार्डनमधून फेरफटका मारणे. अशी चंगळ असते, असा रूबाब असतो उच्च शिक्षित व चांगला पगार घेणाऱ्या नवरा बायको या दोघांचाही. पण भरपूर वर्षे कुटुंब योजना करून मूल झाले की मग त्याला पारंपरिक पद्धतीने मायाप्रेम मिळते का अशा आईबापांकडून? पैशाच्या जिवावर घरी नोकर चाकर व मूल सांभाळायला एखादी बाई. पाळणाघरे असतातच दिमतीला. असो, यालाच तर आधुनिक प्रगती म्हणतात.

आता एका वृद्ध वकिलाची कहाणी सांगतो. हा वृद्ध वकील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला. आईवडील ज्या छोट्या घरात रहात होते त्या घरात तसे सगळेच अडाणी व वृद्धाचा बाप एकटाच कमवता. त्याच्या वडिलाचा पगार खूपच कमी. तरीही थोड्या पैशात घर चालत होते. मुले आनंदाने चाळीत बागडत होती व सगळी मुले पालिकेच्या शाळेत शिकत होती. पण त्या चौघा मुलांपैकी एकाच मुलाने म्हणजे त्या वृद्ध वकिलाने उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन तो जास्त शिकला व नोकऱ्या करीत रस्त्यावर अभ्यास करीत वकील झाला.

इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण आईवडिलांच्या ऐकण्यातल्या असलेल्या त्यांच्या उच्च शिक्षित मुलाने (वृद्ध वकिलाने) गावच्या श्रीमंत व सुशिक्षित घरातील बारावी नापास मुलीशी लग्न करून गृहिणी म्हणून तिला त्या चाळीतील छोट्या घरात आणले आणि तिथूनच त्या वकिलाच्या आयुष्याची कर्म कहाणी सुरू झाली. वेगळेच रहायचे म्हणून त्या बायकोला घेऊन तो गरीब वृद्ध वकील मुंबईबाहेरील एका दूरच्या ठिकाणी राहू लागला. वकिलीत मार्गदर्शन नाही, कोणाचा पाठिंबा नाही, उलट गरीब माणसाने वकिली करू नये, नोकरी करावी म्हणून हिणवणारे बायको कडील काही नातेवाईक या चक्रात सापडलेला तो वकील वकिलीत एकटाच संघर्ष करीत होता. त्याची वकिलीतील आर्थिक कमाई खूपच कमी होती. त्यात त्यांना मुलगी झाली. मुलगी हुशार म्हणून तिलाच शिकवून खूप मोठे करायचे, नवश्रीमंत करायचे या ध्यासाने पछाडलेला तो वकील त्या मुलीला नामांकित शाळेत, कॉलेजात घालून तिथली महागडी फी भरत होता. त्याचा ध्यास एकच होता की आपल्या मुलीने आपल्यापेक्षा खूप मोठे व्हावे. पण या धडपडीत घरी पैसा कमी येत असल्याने त्या नवरा बायकोत कधी हळू तर कधी जोरात भांडणे व्हायची. कधीकधी ही भांडणे खूप विकोपाला जायची. मग बायको तिच्या गावी निघून जायची व प्रकरण घटस्फोटापर्यंत जायचे. मग हाच वकील तिच्या गावी जाऊन तिच्या हातापाया पडून तिला परत घेऊन यायचा.

वृद्ध वकिलाची आराधना पूर्ण झाली व त्यात बायकोनेही गरिबी व त्यातून होणारी भांडणे यांना न कंटाळता वृद्ध वकिलाबरोबर ४० वर्षे संसार केला. दोघांची इच्छा पूर्ण झाली. मुलगी उच्च पदावर चांगला पगार मिळवू लागली. जावईही श्रीमंत व उच्च शिक्षित मिळाला. आणि मग मुलगी व जावई वर वर्णन केलेल्या उदाहरणाप्रमाणे अगदी आलीशान जीवन जगू लागले.

इथपर्यंत ठीक होते. पण वृद्ध वकील गंभीर आजारपणामुळे शारीरिक हालचाल करण्यास कमकुवत, अपंग झाला. वृद्धावस्थेतही वकिली तून येणारी त्याची थोडीशी कमाई होती ती कायमची बंद झाली. कमाई बंद व गंभीर आजार या कात्रीत सापडलेल्या वृद्ध वकिलाने सरकारी हॉस्पिटल गाठले व तिथेच भडका उडाला. श्रीमंत मुलीला व तिलाच सर्वस्व समजणाऱ्या त्याच्या गृहिणी बायकोला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन, रक्ताच्या पिशव्या चढवणे इ. मुळे त्रास झाला व मग बेडवर असलेल्या वृद्ध वकिलाची हॉस्पिटल बेडवरच त्या दोघींनी खरडपट्टी काढली. त्या वृद्ध वकिलाचे हार्ट आॕपरेशन दोन दिवसांवर व तेही फुकट होणारे असूनही आॕपरेशनच्या अगोदर या दोघी अशा वागतात मग आॕपरेशन नंतर या माझी काय सेवा करणार या भीतीने त्या वृद्ध वकिलाने वैद्यकीय सल्ल्याविरूद्ध जाऊन तिथून त्या सरकारी हॉस्पिटलमधून सरळ पळ काढला.

झाले बायको व मुलगी दोघींही त्यांच्यासाठी त्या वृद्ध वकिलाने केलेले कर्तव्यकर्म विसरल्या व त्या सरकारी हॉस्पिटलचा राग मनात धरून ४० वर्षाच्या संसारात कधी सौम्य तर कधी विस्फोटक झालेली भांडणे या सर्व गोष्टी अशा वाईट प्रसंगात पुन्हा उकरून काढून त्या वृद्ध वकिलाला भयंकर वाईट माणूस ठरवून निघून गेल्या. वृद्ध, आजारी नवऱ्याला एकटे टाकून ती बायको विवाहित मुलीबरोबर आता मजेत तिच्या आलिशान फ्लॅटमध्ये रहात आहे व त्या दोघीही सांसारिक कर्तव्यकर्मामुळे पैशाने कफल्लक, रिकामा झालेल्या त्या आजारी, वृद्ध वकिलाला त्याच्या आयुष्याच्या अंतकाळी एकटे टाकून (वृद्ध वकिलाचे जेवणखाण, औषधपाणी यासाठी त्याला भिकारी करून) आता हट्टाने म्हणत आहेत की, बायको येईल पण आधी त्या वृद्ध वकिलाने त्याचा स्वकष्टार्जित फ्लॅट (जी एकच गोष्ट त्या वृद्ध वकिलाला त्याच्या म्हातारपणी जगण्यासाठी एकमेव आधार आहे) बायकोच्या नावावर करावा व पूर्ण रिकामे व्हावे व वर लेखी लिहून द्यावे की त्या वृद्ध वकिलानेच पूर्वी सौम्य, विस्फोटक भांडणे केली त्याची माफी तो मागत आहे व त्याने आणखी लिहून द्यावे की यापुढे तो कितीही गंभीर आजारी पडला तरी बायकोच्या नावावर केलेल्या त्या घरात तो बिलकुल चिडचिड करणार नाही.

हा वृद्ध वकील कोण हे सांगत नाही पण ही सत्यकथा आहे. आयुष्याच्या अंतकाळी सगळी संसार कर्तव्ये पार पाडून सुद्धा घरातलीच माणसे अशी उलटणार असतील तर माणसाच्या मनाची दबावामुळे तणावग्रस्त व आत्महत्या ग्रस्त मानसिक स्थिती होणार नाही का? आत्महत्येमागे आॕनलाईन जुगार, कर्जबाजारीपणा एवढीच कारणे नसून घरातलीच माणसे कर्त्या माणसाने संसारासाठी केलेली कर्तव्यकर्मे विसरून त्याच्या वृद्धापकाळात त्याच्यावरच उलटणे हेही कारण आहे. अशा परिस्थितीत त्याच्या मानसिक स्वास्थ्याची काय परवड होत असेल याचा समाजानेही थोडे अंतर्मुख होऊन विचार करावा.

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.४.२०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा