कुटुंब व्यवस्था हाच खरा भारतीय संस्कृतीचा पाया!
विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर रशिया, अमेरिका सारखे प्रगत देश अंतराळ क्षेत्रात झेपावले असले तरी शेवटी त्या क्षेत्रात मानवी वस्ती प्रस्थापित करणे कठीण आहे. त्यामुळे पृथ्वीवर स्वर्ग कसा निर्माण करता येईल हा विचार पृथ्वी विज्ञान व तंत्रज्ञानात महत्वाचा. त्यासाठी भौतिकता व आध्यात्मिकता किंवा ज्यांना चैतन्य शक्ती परमेश्वर मान्य नाही त्यांच्या साठी भौतिकता व नैतिकता यात संतुलन साधणारी संस्कृती जगभर निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या मते कुटुंब व्यवस्था हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. सर्व जगात दीर्घकाळ टिकणारी भारतीय कुटुंब व्यवस्था नांदावी असे मला वाटते. यासाठी मी भारतीय संस्कृती नुसार दीर्घकाळ टिकणाऱ्या कुटुंब व्यवस्थेचा सार असलेल्या "वसुधैव कुटुंबकम" या भारतीय सांस्कृतिक वाक्यप्रचाराकडे बघतो. हे वाक्य केवळ मानवाशी संबंधित नसून सर्व जीवसृष्टींचा यात समावेश आहे. हा परस्परसंबंध सीमा किंवा सीमांद्वारे मर्यादित नाही. ते संपूर्ण विश्व व्यापते. हे वाक्य संपूर्ण मानवता हे एक कुटुंब आहे याची समज वाढवण्याचा प्रयत्न करते. हे वाक्य सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे असलेल्या वैश्विक मूल्यांवर जोर देते. हे वाक्य सहानुभूती, परस्पर विश्वास आणि आदर यांना प्रोत्साहन देते. हा संस्कृत वाक्प्रचार महाउपनिषद सारख्या हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो, ज्याचा अर्थ, "जग एक कुटुंब आहे" असा आहे. "वसुधैव कुटुम्बकम्' या कल्पनेचा पहिला उल्लेख महा उपनिषदात येतो. वसुधा अर्थात पृथ्वी, इव म्हणजे ही, कुटुम्बकम् अर्थात कुटुम्ब. संपूर्ण पृथ्वी ही एकच कुटुंब आहे.
अलिकडच्या काळात भारतीय तरूण तरूणींचा ओढा भारतीय संस्कृतीचे महत्व न ओळखता पाश्चात्त्य संस्कृती कडे जास्त वाढत चाललाय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर भौतिक प्रगती कितीही केली तरी पाश्चात्त्य संस्कृतीचा ओढा हा अधोगतीकडे नेणारा आहे हे निश्चित!
-©ॲड.बी.एस.मोरे, २६.३.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा