https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ४ मे, २०२५

वृद्धापकाळ कोणाला सुखाचा तर कोणाला दुःखाचा!

वृद्धापकाळ कोणाला सुखाचा तर कोणाला दुःखाचा!

(१) सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेणाऱ्या किंवा बँकेत स्वतःसाठी चांगली रक्कम शिल्लक ठेवणाऱ्या काही लोकांसाठी व पिढीजात श्रीमंत लोकांसाठी वृद्धापकाळ तसा आजारपणातही सुखावह असतो कारण दैनंदिन जेवणखाण व हॉस्पिटल, औषध पाण्याची काळजी नसते. मरेपर्यंत त्यांचे जीवन तसे सुरक्षित असते.

(२) गरीब कुटुंबात जन्मून छोटासा धंदा, व्यवसाय करून पोटावर जगणाऱ्या लोकांना शरीर धडधाकट असताना जे पैसे मिळतात ते सर्व संसारावर खर्च करावे लागल्याने वृद्धापकाळात त्यांची बँकेत काही शिल्लक नसते. अशा लोकांसाठी त्यांचा वृद्धापकाळ हा अतिशय दयनीय असतो.

(३) जवळ पेन्शनची सोय नसलेली किंवा बँकेत काही शिल्लक नसलेली गरीब माणसे त्यांच्या मुलांसाठी उपकारापुरती उरतात. कष्टकरी आई बापांचे उपकार जाणणारी मुले आई वडिलांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडत नाहीत पण काही मुले निर्दय पणे म्हाताऱ्या आईबापांचा आपल्या संसारात त्रास नको म्हणून सरळ त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. खूप दयनीय अवस्था असते अशा गरीब म्हाताऱ्या आईबापांची. पण बाहेर दोघेही कामाला जाणारी काही उच्च शिक्षित, नवश्रीमंत हुशार व स्वार्थी मुले व सूना किंवा मुली व जावई गरीब म्हाताऱ्या आईला त्यांच्या लहान मुलांना त्यांच्या घरात नीट सांभाळण्यासाठी स्वतःजवळ ठेवून घेतात व कटकट करणारा म्हातारा बाप/सासरा जवळ नको म्हणून त्याची रवानगी त्याच्याच बायकोच्या परवानगीने वृद्धाश्रमात करतात. जगण्याच्या स्वार्थासाठी अशा वृद्ध पुरूषाची बायकोही अशा तडजोडीला तयार होते.

(४) गरीब माणसाचा वृद्धापकाळ हा अशाप्रकारे भिकार काळ असतो. सहन होत नाही व सांगताही येत नाही असा हा काळ असतो.

(५) अशा भिकार अवस्थेत बाहेर कुठे माणसांतील माणुसकी शोधणे, समाज कायद्यातील न्यायाच्या पाठीमागे लागणे किंवा अध्यात्मात परमेश्वराचा आधार शोधणे हे केवळ मृगजळ असते. परमेश्वर तरी अशा किती गरीब, असहाय्य म्हाताऱ्यांना पुढे होऊन मदत करणार? काही म्हातारे सुखी तर काही म्हातारे दुःखी हा तर त्या परमेश्वराचाच अनाकलनीय खेळ असतो ज्या अनाकलनीय खेळाला काही लोक प्रारब्ध, नशीब, नियती वगैरे म्हणून मोकळे होतात व दुःखी म्हाताऱ्या लोकांना परमेश्वराची जपमाळ ओढत बसा म्हणून फुकटचा सल्ला देऊन मोकळे होतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.४.२०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा