हे परमेश्वरा!
निसर्गात तसे सगळे मुबलक आहे. निसर्गाच्या अवाढव्य पसाऱ्यात निसर्गाचा कायदाही आहे. तरीही आपल्याला राजा लागतो, लोकशाही सरकार लागते. अगदी तसेच आपल्याला देवही लागतो. पण नास्तिक लोक याला अपवाद आहेत. तरीही वयानुसार अवयव गलितगात्र होतात, स्मृती कमकुवत होते त्यामुळे आपणच वाढवलेला भौतिक पसारा आपल्याला कमी करावा लागतो. त्याच न्यायाने आपण आपला आध्यात्मिक पसाराही कमी केला पाहिजे. देवधर्माची कर्मकांडे निदान उतार वयात तरी कमी केली पाहिजेत. उतार वय झाल्यावर तिर्थस्थळांना भेटी देणे, देवाच्या परिक्रमा करणे या गोष्टी तर मला पटतच नाहीत. उतार वयात स्वार्थाला ओहोटी लागलेली असते. मग का उधाण येते अचानक परमार्थाला! याचे कारण बहुतेक हे असावे की वृध्दापकाळी मृत्यूची चाहूल लागलेली असते. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या गोष्टींवर तर माझा बिलकुल विश्वास नाही. वृध्दापकाळी देवाचे प्रेम जास्त वाढते की त्याची भीती जास्त वाढते? तिर्थस्थळांना भेटी किंवा परिक्रमा या गोष्टी मी आयुष्यात कधी केल्या नाहीत. मग आता वृध्दापकाळी या गोष्टी करण्याचा तर प्रश्नच नाही. का, कशासाठी करायच्या या गोष्टी आणि त्याही विशेष करून म्हातारपणी! म्हातारपणी तुमचे शरीरच नीट साथ देईनासे होते. हात, पायच नाहीत तर ओठ, जीभ सुध्दा थरथरते. मग तुम्ही कसली लांबलचक देव प्रार्थना म्हणणार! देवाच्या अगोदर श्री अशी उपाधी लावूनच, ओम् शांती सारखे शब्द उच्चारतच देवाला स्मरले पाहिजे अशी मोठी अपेक्षा उतार वयात गलितगात्र झालेल्या शरीराकडून देव तरी करीत असेल का? कधीकाळी कोणत्या तरी धर्मपंडिताने सांगितले म्हणून तेच करीत बसायचे का? स्वतःला बुद्धी आहे की नाही? खरं म्हणजे मी आस्तिक आहे. पण माझी आस्तिकता ही नैसर्गिक आहे, वैज्ञानिक आहे, व्यावहारिक आहे. ती काल्पनिक किंवा आभासी नाही. निसर्गाचा गाभा, त्याचे मूळ म्हणजे देव अशी माझी कल्पना नव्हे तर ती माझी वैज्ञानिक संकल्पना आहे. कल्पना (imagination) व संकल्पना (concept) यात फरक असतो. त्या निसर्ग मूळाची म्हणजे देवाची प्रार्थना मी "हे परमेश्वरा" एवढेच म्हणून करतो. ख्रिश्चन धर्मीय "ओ गॉड" असे म्हणताना व मुस्लिम धर्मीय "या अल्ला" असे म्हणताना मी पाहतो, ऐकतो. अगदी तसेच हिंदू धर्मीय म्हणून "हे परमेश्वरा" असे मी थोडक्यात त्या देवाला स्मरतो. निसर्गात देव आहे ही संकल्पना जर मनात घट्ट असेल तर मग त्या देवाला सगळे कळते हेही मनाने ठाम स्वीकारले पाहिजे ना! तुम्हाला काय हवे आहे हे जर देवाला कळते तर मग त्याला पुन्हा का मागायचे? म्हणून आता उतार वयात देवाला "हे परमेश्वरा" एवढेच म्हणतो.
-ॲड.बी.एस.मोरे©८.६.२०२०
टीपः या लेखातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. देवाची प्रार्थना कोणी कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी इथे फक्त मी स्वतः देवाची प्रार्थना कशी करतो (खरं तर स्मरण कसे करतो) याविषयी लिहिले आहे. आणि विशेष म्हणजे माझे देवाला असे स्मरणे हे कोणत्याही निकषावर अधार्मिक नाही यावर देवावर श्रध्दा असणाऱ्या जगातील सर्वच धर्मांचे एकमत होईल असा माझा ठाम विश्वास आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©८.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा