राज्य करावे तर निसर्गाप्रमाणे!
(१) लहानपणापासूनच निसर्गाचे मला खूप कुतूहल व आकर्षण! प्राथमिक शाळेपासून सतत पुस्तके वाचतोय, त्यातून या निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करतोय. अनेक शास्त्रज्ञांचे शोध वाचले व अनेक तत्ववेत्त्यांचे तात्विक लिखाण वाचले पण त्यातून माझी तृप्ती झालीच नाही व होतच नाही. माझ्या ज्ञानाचा घडा रिकामा राहिल्यासारखाच वाटत आहे. निसर्गाला मी जाणून घेण्यात खूप कमी पडतोय, म्हणून मी अतृप्त आहे.
(२) म्हणून वाचनाबरोबर मी निसर्गातील भवतालाचे, पर्यावरणीय हालचालीचे खूप जवळून, खूप बारकाईने निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. त्या निरीक्षणातून मला जो निसर्ग कळतो तो मी पुस्तके वाचून मिळविलेल्या ज्ञानापेक्षा खूप मोठा आहे. निसर्गाच्या जास्त जवळ जाण्याने माझ्या जाणिवा प्रगल्भ होतात. त्या प्रगल्भतेतून पुस्तकातील ज्ञानाहून वेगळे असलेले जे ज्ञान मला मिळते त्याचा अंतर्भाव माझ्या लिखाणात असतो. अर्थात माझ्या लिखाणात पुस्तकांतून मिळविलेले ज्ञान व निसर्गाशी मैत्री करीत स्वतःच्या निरीक्षणातून मिळविलेले स्वतंत्र ज्ञान यांचे मिश्रण असते. निसर्गाविषयीचे माझे निरीक्षण व समाजात असणाऱ्या इतर लोकांचे निरीक्षण यात मोठी तफावत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी जे लिहितो ते लोकांना पटण्याची शक्यता तशी कमीच. तरीही वाद टाळीत मी माझे लिखाण चालूच ठेवले आहे.
(३) आजचा विषय राजा म्हणून निसर्ग मला कसा वाटतो हा आहे. जगाच्या पर्यावरणात व जन्म, जीवन व मृत्यू या जीवनचक्रात मला निसर्गाचे बळ जाणवते व त्या बळाचा प्रभाव जाणवतो. निसर्ग त्याच्या बळाचा वापर करतोय व सर्व गोष्टी त्या बळाच्या प्रभावाखाली अगदी अपरिहार्यपणे, अनिवार्यपणे घडवून आणतोय अशी मला जाणीव होतेय. पण जगत असताना आपण करीत असलेल्या गोष्टी आपण बळेच करतोय असे जाणवत नाही. त्या गोष्टी अगदी सहज, नैसर्गिकपणे आपल्याकडून घडतात. त्यात निसर्ग त्याच्या बळाने आपल्यावर त्याची बळजबरी करतोय अशी जाणीव होत नाही.
(४) मनुष्य त्याच्या बुद्धीने निसर्गाच्या राज्य कारभारात ढवळाढवळ करून ज्या कृत्रिम सोयीसुविधा स्वतःच्या सोयीसाठी निर्माण करतोय त्या गोष्टीही अगदी सहज, नैसर्गिकपणे होत आहेत, मग त्यांना कृत्रिम म्हणायचे कसे? त्याही नैसर्गिकच! कारण निसर्गाने त्यासाठी परवानगीच दिली नसती तर मनुष्याला स्वतःची तांत्रिक व सामाजिक प्रगती करताच आली नसती. म्हणून असे वाटते की, जणूकाही निसर्गच मनुष्याकडून या गोष्टी सहजपणे करून घेतोय आणि मनुष्याला मात्र उगाच वाटत राहते की स्वतःच्या बुद्धीने तोच निसर्ग राजावर मात करतोय.
(५) सद्याचा कोरोना विषाणूचा कहर असो नाहीतर चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, निसर्ग आपल्याला यातून घडवतोय, शिकवतोय असेच माझ्या मनाला वाटत राहते. या व अशा सर्वच नैसर्गिक गोष्टींत निसर्गाच्या जुलूम जबरदस्तीचा भागच जाणवत नाही. या सर्व गोष्टींत निसर्गाचे बळ आहे, त्या बळाचा वापर आहे व त्या बळाचा प्रभाव आहे, पण निसर्गाची ती बळजबरी, ती हुकूमशाही मला जाणवतच नाही. सगळं अगदी नैसर्गिकपणे, सहज होतंय!
(६) निसर्गाच्या या आश्चर्यकारक, आगळ्या वेगळ्या राजेशाहीत निसर्गाचाच एक छोटा भाग असलेल्या बुद्धीमान मनुष्याने स्वतःच्या विशेष सोयीसाठी स्वतःची एक स्वतंत्र हुकूमशाही लोकशाहीच्या नावाने सुरू केली आहे. या लोकशाहीत राज्य कारभार करणाऱ्या राज्य कर्त्यांचे हुकूम जनतेला असे वाटले पाहिजेत की जणूकाही त्यात निसर्गाची सहजता आहे. माझे नास्तिकांनाही जाहीर आव्हान आहे की, तुम्ही निसर्गाला देव मानू नका किंवा निसर्गात देवाचे अस्तित्व आहे हे मान्य करू नका, पण तुम्ही निसर्गाला राजा मानणार आहात की नाही? असे तर नाही ना की, तुम्ही शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांना मानणार पण त्या शरीराचा, इंद्रियांचा राजा जो मेंदू आहे त्याला तुम्ही मान्य करणार नाहीत? माझ्या मनाला तरी निसर्ग हा राजा म्हणून खूप भावतो व म्हणून माझे म्हणणे हे आहे की, राज्य करावे तर निसर्गाप्रमाणे!
-ॲड.बी.एस.मोरे©४.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा