एकाच दगडावर पाय!
अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या बुडाशी किंवा मुळाशी देव आहे याच तार्किक संकल्पनेवर माझी आस्तिकता उभी आहे. पण देवाचे अस्तित्व मानणाऱ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यासारख्या अनेक धर्मात या बुडाविषयी किंवा मुळाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. देवाची प्रार्थना करण्याच्या अनेक धर्माच्या अनेक पद्धती वेगळ्या आहेत. त्यांची तत्वेही वेगळी आहेत. पण प्रत्येक धर्मात काहीना काहीतरी सर्वसमावेशक अशा चांगल्या पद्धती आहेत, चांगली तत्वे आहेत. म्हणूनच माझा जन्मधर्म जरी हिंदू असला तरी इतर धर्माचे मला आवडणारे विचार मी जवळ घेतो. माझे हे असे इतर धर्माना जवळ घेणे त्या धर्मातील काही लोकांना आवडत नाही व हिंदू धर्मातील काही लोकांना पण आवडत नाही. माझ्या या अशा वागण्याची तिकडचे व इकडचे म्हणजे दोन्हीकडचे लोक ढोंगी सर्वधर्मसमभाव म्हणून हेटाळणी करतात. काहीजण तर म्हणतात की, मी एका दगडावर पाय ठेवायचा सोडून दोन नाही तर अनेक दगडांवर पाय ठेवून चाललोय. नास्तिक लोकांशी तर माझे पटणे अशक्यच आहे. कारण ते निसर्गाच्या बुडालाच मानायला तयार नाहीत. मला या लेखातून सर्वांना एवढेच सांगायचे आहे की मी एकाच दगडावर पाय ठेऊन आहे आणि तो म्हणजे निसर्गाचे बूड किंवा मूळ अर्थात देव!
-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा