https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १६ जून, २०२०

तृप्ती व समाधान

तृप्ती व समाधान यात फरक काय?

(१) मराठी शब्दकोश चाळला तर तृप्ती व समाधान हे समानार्थी शब्द दिसतात. तृप्ती किंवा समाधान म्हणजे मनाची शांती, संतोष हाच समान अर्थ दोन्ही शब्दांचा दिलेला आहे. पण माझ्या मते या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. माझ्या मते सुरूवातीला असमाधान, मग समाधान (इंग्रजीत कम्फर्ट) व समाधानाच्या पुढे जो चैनीचा (इंग्रजीत लक्झरी) प्रवास सुरू होतो त्या चैनीचा कळस (इंग्रजीत क्लाइमॕक्स) म्हणजे तृप्ती!

(२) तृप्तीच्या मागे धावणारा माणूस हावरट, लोभी (इंग्रजीत ग्रीडि) असतो. लोभी माणूस एखाद्या गोष्टीची तृप्ती करण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो. त्या गोष्टीने तो पछाडला, घेरला (इंग्रजीत अॉब्सेशन) जाऊन त्याला त्या गोष्टीचा मंत्रचळ (इंग्रजीत अॉब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसअॉर्डर) लागतो.

(३) पण निसर्ग व्यवस्था अशी आहे की निसर्ग कोणालाच असा तृप्तीचा कळस किंवा बिंदू गाठू देत नाही आणि बळेच गाठला तरी त्या कळसावर जास्त काळ राहू देत नाही. असा कळस गाठणे म्हणजे हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर गाठण्यासारखे असते. पण एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलेला गिर्यारोहक त्या उंच शिखरावर किती काळ राहू शकतो? निसर्ग त्याला तिथे जास्त काळ राहूच देणार नाही. कारण निसर्गाची व्यवस्थाच तशी आहे.

(४) तृप्तीचा कळस किंवा सर्वोच्च बिंदू म्हणजे उदासीनतेचा, विरक्तीचा बिंदू! तिथे माणूस हा माणूसच राहत नाही. त्या बिंदूवर तो पूर्णपणे विरघळून जाऊन त्याचे पाणी पाणी (इंग्रजीत सॕच्युरेशन) होते. मग एव्हरेस्ट शिखर जिंकून उपयोग काय? तिथे पुढे काय हा प्रश्न निर्माण होतो कारण तृप्तीच्या त्या कळसावर पुढे काहीच राहत नाही.

(५) माझ्या मते जीवनात तृप्ती पेक्षा समाधान हीच महत्वाची गोष्ट आहे. समाधानाची भावना म्हणजे सुख व शांती या दोन्ही गोष्टींची मध्यम भावना! ही भावनाच जीवनाचा निर्मळ आनंद देते. गडगंज पैसा व संपत्तीच्या मागे लागलेली माणसे कधीच समाधानी राहू शकत नाहीत. कारण त्यांना तृप्तीचे वेड लागलेले असते.

(६) समाधानी माणसाची चाल व तृप्तीच्या मागे लागलेल्या माणसाची चाल नीट बघा. समाधानी माणूस हत्तीच्या पावलांनी डुलत डुलत चालतो तर तृप्तीच्या मागे लागलेला माणूस सारखा कुत्र्यासारखा धावत असतो. जगातील मोठी अर्थसत्ता बळकावून बसलेली मूठभर श्रीमंत माणसे एवढा पैसा, संपत्ती जवळ असूनही आणखी श्रीमंत होण्यासाठी कुत्र्यासारखी धावत असतात. स्वतः तर तशी धावतातच पण गरीब कष्टकरी कामगारांनाही त्यांच्या पाठीमागे धावायला भाग पाडतात. मला या अतीश्रीमंत माणसांची खरंच कीव येते!

(७) अतीश्रीमंत माणसांना अर्थशास्त्राचा "कमी होणारी सीमांत उपयोगिता" हा प्रसिद्ध नैसर्गिक कायदा (इंग्रजीत ज्याला लॉ अॉफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतात) लागू नसतो काय? तो नक्कीच असतो! पण ही माणसे अनैसर्गिक वागतात व जगात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी जास्तीत जास्त वाढवून एक अनैसर्गिक पोकळी निर्माण करतात.

(८) देव कधी कोणाला दिसला नाही, दिसणार नाही! आपणच निसर्गातील देवाला समजून घ्यावे लागते. याबाबतीतले कल्पनारंजन ठीक नव्हे. तुम्ही देवळात जाऊन देवाच्या मूर्तीपुढे एकटक किती बघत रहाल? असे सारखे एकटक बघत राहिल्याने तुम्ही आध्यात्मिक तृप्ती गाठू शकाल का? बिलकुल नाही! मग काय करायचे तर देवाचे थोडे ध्यान करायचे व ध्यान धारणेतून तृप्तीच्या नादी न लागता थोडेसे आध्यात्मिक समाधान मिळाले की मग देवाची ध्यान धारणा सोडून द्यायची. नाहीतर देवाचा मंत्रचळ होऊन वेड लागायची पाळी येते. नास्तिक लोक या आध्यात्मिक प्रश्नापासून मुक्त असतात. पण ते इतर गोष्टींत तृप्ती मिळविण्यासाठी धडपडू लागले तर तेही वेडे होऊन जातात.

(९) जीवनात समाधान महत्वाचे, तृप्ती नव्हे! याच समाधानी भावनेने मी जगलो. पोटापुरता पैसा मिळविला व नेटका संसारही केला. आता माझ्या बँकेत शिल्लक नाही म्हणून मी दुःखी नाही कारण मी माझी बौद्धिक शक्ती व माझे ज्ञान भांडवल थोडे जरी इकडेतिकडे वळवले तरी वृध्दावस्थेतही मला कसलेही पेन्शन वगैरे नसताना माझ्या पोटापुरता पैसा मला जरूर मिळणार याची पूर्ण खात्री आहे.

(१०) कोरोनाच्या व रूग्णालयीन खर्चाच्या  भीतीने लोक गांगरून गेले असताना मी मात्र निर्धास्त आहे. आजच बायकोला सांगून टाकलेय की "हे बघ, तुला किंवा मला किंवा दोघांनाही तो कोरोना विषाणू चिकटला तर मुलीला व जावयाला खर्चात टाकायचे नाही, सरळ पालिकेच्या किंवा सरकारी रूग्णालयात जायचे व तिथे त्यांनी अॕडमिट करून घेतले नाही तर तिथेच गेटवर तडफडून मरायचे पण लाखो रूपयांची बिले आकारणाऱ्या खाजगी रूग्णालयात जायचे नाही व कोणाला खर्चात पाडायचे नाही, तू साठीला आलीस व मी साठी पार केलीय म्हणजे आपण भरपूर जगलोय, देवाचे आभार मान व मरतानाही देवाविषयी कृतज्ञता व्यक्त कर"! मी हा असा समाधानी भावनेने जगलोय, जगतोय व त्याच समाधानी भावनेने मरणार! माझे आईवडील हे याच भावनेने जगले व मेले व मीही तसाच जगलो, जगतोय आणि मरणार. बायकोनेही माझे हे असे जगणे स्वीकारले आहे व आत्मसात केले आहे हे विशेष!

(११) माणसाने समाधानी भावनेने जगावे व कायम अतृप्त राहून मरावे अशीच देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची म्हणा रचना आहे. अतृप्त आत्मा म्हणे भूत होतो. असल्या थोतांडावर मी कधीही विश्वास ठेवला नाही व ठेवणारही नाही. तृप्ती व समाधान यातील फरक शोधता शोधता हा लेख एवढा कसा वाढला हे कळलेच नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.६.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा