एक होती मावशी!
(१) एक होती मावशी, कृष्णाबाई माणिक भोसले तिचे संपूर्ण नाव, पण सगळ्यांची ती किसाबाई! या मावशीचा नवरा अकाली वारला आणि कोणाचाही आधार नसलेल्या माझ्या या मावशीने आसरा घेतला तो वरळीच्या आमच्या घराचा! तान्ह्या बाळाला घेऊन ही मावशी आमच्या वरळीच्या घरी रहायला आली. ते तान्हे बाळ म्हणजे माझी मावस बहीण, माझी ताई! मावशीला तिच्या सख्ख्या बहिणीचा म्हणजे माझ्या आईचा आधार वाटला याचे कारण म्हणजे दोघीही बहिणी बहिणी त्यांच्या आईवडिलांच्या जीव की प्राण होत्या. त्यांना भाऊ झालाच नाही. मग या दोन बहिणीच माझ्या आजोबा व आजीची दोन मुले झाली. माझ्या मावशीचे नाव होते कृष्णाबाई तर माझ्या आईचे नाव चंद्रभागा! पण या मुलींनाच माझ्या आजोबांनी मुले मानली व त्यांची लाडाने टोपण नावे ठेवली ती मुलांचीच. मावशी कृष्णाबाईचे नाव झाले किशाबापू तर आई चंद्रभागेचे नाव झाले चंदाबापू! त्या स्वातंत्र्यपूर्व काळात माझे आजोबा अशिक्षित असले तरी मनाने असे आधुनिक विचाराचे होते.
(२) सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्टेशनच्या अलिकडे व केम स्टेशनच्या पलिकडे असलेले ढवळस गाव हे माझे आजोळ! त्या गावच्या छोट्या डोंगरावर असलेली अंबाबाई हे तिथले ग्रामदैवत! या देवीच्या कुशीतच माझी मावशी व माझी आई या बहिणी वाढल्या. त्या एकत्र वाढल्या आणि म्हणूनच आयुष्यभराच्या कायम मैत्रिणी राहिल्या. माझ्या मावशीने म्हणूनच धाकट्या बहिणीच्या म्हणजे माझ्या आईच्या घराला आधार मानला. मी माझ्या आईचा थोरला मुलगा त्यामुळे धाकटे असण्याचा आनंद मला दिला तो माझ्या ताईने! हिराताई ही माझी मावस बहीण पण आमच्या घरात तिला थोरली मुलगी म्हणूनच वाढवले गेले. माझी ताई खूप गोड व शांत स्वभावाची जशी माझी मावशी! ही ताई माझी मावस बहीण, पण सख्ख्या बहिणी पेक्षाही जास्त ती माझ्या जवळची होती.
(३) माझी ही मावशी व माझी आई या दोघींनी आमच्या वरळीच्या घरात गिरणी कामगार व वरळी पोलीस यांच्यासाठी खाणावळ घातली होती. खूप कष्ट घेतले दोघी बहिणींनी त्या खाणावळीत. पण खाणावळ नुकसानीत गेली व मावशीसह आमची रवानगी माझ्या वडिलांनी पंढरपूरला केली. साधारण १९६३ चा तो काळ होता. मी त्यावेळी सहा वर्षाचा होतो. सांगोला रोडवरील संतपेठेतील पंढरपूर पालिकेच्या ९ नंबर शाळेत इयत्ता पहिलीत मला प्रवेश देण्यात आला. त्या ९ नंबर शाळेची धमाल वेगळीच होती. पण माझ्या खोडकरपणाचा माझ्या मावशीला व आईला पंढरपूरच्या त्या पाच सहा वर्षांच्या काळात (१९६३ ते १९६८) खूप त्रास झाला हे विशेष.
(४) माझ्या मावशीला स्वच्छतेची खूप सवय! मी बाहेरून उनाडक्या करून यायचो व मग माझी मावशी मला ओढतच आम्ही पंढरपूरला ज्या हनिफ शेखच्या वाड्यात भाड्याने रहायचो त्या वाड्यातील कॉमन मोरीत न्यायची. तिथे मला ती साबण लावून अंघोळ घालायची. पण मला तिचा सगळ्यात मोठा राग यायचा तो म्हणजे दगडाने ती माझे पाय जोरात घासून माझ्या पायांचा मळ काढायची त्या गोष्टीचा! पाय घासताना मी मोठ्याने बोंब मारायचो पण त्या वाड्यातील साराप्पा वगैरे सगळी मंडळी माझ्या मावशीलाच पाठिंबा द्यायचे व म्हणायचे "मावशी, घासा या काळ्याचे पाय चांगलेच, गावभर हिंडून आलाय मोठा"!
(५) माझी मावशी अधूनमधून मला सांगोला रोडवरील दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करताना घेऊन जायची. तिथे भर ऊनात ती भाजी खुरपायची. मी लांब झाडाखाली सावलीला बसलेलो असायचो. मग मध्येच मला माझ्या मावशीची दया यायची. मग मी त्या शेतमजूर बायकांच्या घोळक्यात जाऊन खुरपे घेऊन मावशीला शेतातून भाजी काढण्यासाठी पुढे व्हायचो. पण थोडे काम केले की माझे गुडघे ऊनाने तापायचे व मला त्रास व्हायचा. ते बघून माझी मावशी मला पुन्हा त्या झाडाखाली सावलीला जाऊन बस म्हणायची. संध्याकाळ झाली की तो शेतमालक मावशीला कामाची मजूरी द्यायचा व सोबत सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे मोठे पेंडके द्यायचा. मग हनिफ शेख वाड्यात त्या पालेभाज्यांचे फुकट वाटप व्हायचे व राहिलेली भाजी आम्ही जेवणात वापरायचो. इतकी पालेभाजी दररोज बघून मला पालेभाजी खाण्याचा जाम वैताग यायचा. पण मावशी म्हणायची "गप्प गुमाने खा, भाज्या तब्बेतीला चांगल्या असतात"!
(६) साधारण १९६९ च्या दरम्यान आम्ही सर्व मुंबईला परत आलो. मग सहावी व सातवी इयत्ता मी वरळीच्या आंबेडकर म्युनिसिपल शाळेत पूर्ण केल्या. त्यावेळी माझ्या मावशीचे व माझ्या आईचे घरात कशावरून भांडण झाले हे माहित नाही. पण मी शाळेतून घरी आलो तर आईकडून कळले की मावशी घर सोडून गेली. मला मावशीचा खूप लळा होता. मी आईवर ओरडत रडू लागलो. "माझी मावशी कुठाय, मला मावशी पाहिजे" म्हणून आरडाओरड करू लागलो. मग आईच म्हणाली, "जा शोध तिला आणि परत घरी घेऊन ये, तिकडे जांबोरी मैदानावर रडत बसली असेल"! मग मी माझे दफ्तर तसेच घरात फेकून दिले व जांबोरी मैदानाकडे धावत सुटलो. त्या मैदानात मावशी दिसलीच नाही. मग तिथल्या चाळी चाळीतून तिचा शोध घेऊ लागलो. अचानक १८ व १९ नंबर चाळींच्या जवळील ओट्यावर मावशी तिचे छोटे बोचके घेऊन रडत बसलेली दिसली. मी पटकन तिला मागून पकडले व म्हंटले "आता कुठे जाशील माझ्या तावडीतून, चल पटकन घरी, मी शाळेतून तसाच इकडे आलोय न जेवता, चल दोघे मिळून जेवण करू"! पण मावशी घरी यायलाच तयार होईना. मग मीही तिला म्हणालो "तू येत नाही तोपर्यंत मी पण इथेच बसून राहणार, आईला बसूदे तिकडे एकटीच काळजी करीत"! मग मात्र मावशी माझ्याबरोबर निघाली व घरी परत आली. तेंव्हा त्या मजल्यावरील शेजाऱ्यांना "बघा, मी कसा मावशीला परत घेऊन आलो" म्हणत रूबाबात घरात प्रवेश केला.
(७) त्यावेळी काँग्रेस सरकारने संजय गांधी निराधार योजना आणली होती. त्या योजने अंतर्गत प्रत्येक निराधार व्यक्तीला दरमहा १०० रूपये (रक्कम नीट आठवत नाही) निराधार भत्ता मिळायचा. एकदा मावशी मला एकांतात म्हणाली "बाळू, तू एवढे शिक्षण घेतोस, मग माझी त्या संजय गांधी योजनेत निराधार म्हणून नोंद कर ना, तेवढेच जवळ थोडे पैसे राहतील माझ्या"! पण अशी का म्हणालीस म्हणून मीच मावशीवर रागावलो. "मी तुझा मुलगा असताना तू स्वतःला अशी निराधार का समजतेस"? ते ऐकून मावशी काहीच बोलली नाही. पण तिचे ते तसे गप्प बसणे माझ्या मनाला चटका लावून गेले.
(८) अशी ही माझी मावशी ताईच्या लग्नानंतर तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी गोव्याला व नंतर पुण्याला जावयाच्या (म्हणजे माझ्या भाऊजीच्या) घरी रहायला गेली. माझी ताई अधूनमधून आजारी असायची. त्यामुळे तिच्या चारही मुलांना (दोन मुली व दोन मुले) माझ्या मावशीनेच लहानाचे मोठे केले हे ती मुलेही मान्य करतील. मावशीने सगळीकडेच कष्ट उपसले, आमच्या घरीही आणि ताईच्या घरीही! ही मावशी गोवा व पुणे येथील भाऊजीच्या घरी असल्याने मी बिनधास्त शाळा, कॉलेजच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला व नंतर पुण्याला जायचो. तिथे माझ्या अंघोळीपासून माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था मावशीच करायची. तिथे सुध्दा तिची ती स्वच्छतेची सवय पदोपदी दिसायची.
(९) अशी ही मावशी पुण्याच्या घरी वृध्दावस्थेत पोटाच्या विकाराने हे जग सोडून कायमची निघून गेली. ती गेल्याचा मला पुण्याहून फोन आला. पण मला कळून चुकले होते की मी कितीही ठरवले तरी तिला लहानपणी जसे घरी परत घेऊन आलो होतो तसे आता तिला परत घेऊन येणे मला शक्य होणार नाही. मी पहाटे पुण्याला पोहोचलो पण त्याअगोदरच मावशीचा मृत देह स्मशानात अग्निच्या स्वाधीन झाला होतो. एवढे मोठे आयुष्य, एवढा मोठा सहवास एका क्षणात संपला होता. तिथे जमा झालेल्या नातेवाईकांबरोबर मावशीच्या काही आठवणी शेअर केल्या. पण ही मावशी माझ्यासाठी काय होती हे मी इतरांना काय आणि किती सांगणार. या मावशीचा माझ्याकडे फोटो सुध्दा नाही. पण तिचा निरागस, भोळा चेहरा मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. म्हणतात ना "आई मरावी आणि मावशी उरावी"! अगदी तशीच होती माझी ही मावशी. पण ही मावशी अगोदर गेली व माझी आई नंतर गेली. हे वयानुसार झाले असावे. कारण दोन बहिणीत मावशी थोरली तर आई धाकटी होती. माझ्या या मावशीचा ना जन्मदिन मला आठवत ना मृत्यूदिन. माझ्यासाठी तर सगळेच दिवस तिचे स्मृतिदिन!
-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा