राजसाहेबांचा वाढदिवस आणि माझे मनोगत!
(१) १४ जून हा मा. राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजे दरवर्षी येणारा वाढदिवस! आज १४ जून २०२० हा दिवस बरोबर रविवारी आलाय. मी मनात विचार करतोय की कोरोना विषाणूने सद्या जी भीती निर्माण केलीय ती जर नसती तर मनसैनिकांचा केवढा मोठा जनसागर कृष्णकुंज या राजसाहेबांच्या निवासस्थानी धडकला असता. पण राजसाहेबांनी स्वतःच्या सहीचे परिपत्रक काढून मला शुभेच्छा द्यायला आज कोणीही येऊ नये असे सगळ्यांनाच बजावलेय. त्यातूनही न रहावून कोणी तिथे पोहोचलाच तर राजसाहेब त्याची चांगली खरडपट्टी काढल्याशिवाय राहणार नाहीत. मग त्याची दया माया नाही. आदेश म्हणजे आदेश! हा असाच आदेशाचा दरारा मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होता. साहेबांचा आदेश म्हणजे आदेश!
(२) बाळासाहेबानंतर आदेशाचा असा दरारा महाराष्ट्रात कोणाचा असेल तर तो राजसाहेब ठाकरे यांचाच! खरं तर, साहेब म्हणून आता महाराष्ट्रात कोण तर राजसाहेबच! अशा मा. राजसाहेबांची व माझी प्रत्यक्ष भेट डोंबिवली जिमखाना येथे आयोजित केलेल्या वरिष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात आयुष्यात फक्त एकदाच झाली आणि त्या भेटीने एका दिवसात मी चमकलो. त्या मेळाव्यात मी फक्त काही मोजकी वाक्येच राजसाहेबांच्या नजरेला नजर देऊन बोललो. त्यांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले व मला जवळ बोलवून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांच्या बरोबर मला मनसोक्त फोटो काढू दिले. ती भेट मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्या एकाच भेटीने मी एकाच दिवसात प्रसिद्ध झालो आणि मनसैनिकांचा काका झालो. याचे एकच कारण म्हणजे मा. राजसाहेबांचा करिष्मा! राजकारणापासून अलिप्त राहिलेला मी या आगळ्या वेगळ्या भेटीनंतरही राजकारणापासून तसा अलिप्तच राहिलो. पण मनसैनिकांची काका ही हाक मात्र माझा सतत पाठलाग करीतच राहिली.
(३) हे एक वेगळेच नाते आहे. आता राजकारण जराही नकोच म्हणून मी पूर्वीचे फेसबुक खाते या कोरोना लॉकडाऊनच्या काळात बंद करून टाकले व एक महिना विश्रांती घेऊन नवीन खाते उघडले व त्यावर मी माझा राजकारण संन्यास जाहीर केला. तरीही मनसैनिकांनी काका म्हणून मला शोधून काढलेच व मला सरळ सांगून टाकले की "राजकारण संन्यास हा तुमचा निर्णय आहे, पण तुम्ही आमचे काका आहात याचा राजकारणाशी काही संबंध नाही"! असे प्रेम, असा आदर मला ज्यांच्याकडून मिळतो त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टस पुन्हा नव्याने स्वीकारण्याशिवाय माझ्यापुढे मग पर्यायच उरला नाही. फार थोड्या मनसैनिक मित्रांना मी जुने फेसबुक अकाऊंट बंद करून आता नवीन उघडलेय हे माहित आहे. त्यामुळे गेल्या महिना भरात नव्याने झालेले मनसैनिक मित्र तसे संख्येने कमी असले तरी पुढील काळात हळूहळू काकाला शोधत ही संख्या आणखी वाढणार हे नक्की! तरीही नव्याने मित्र स्वीकृती झाल्यावर मी प्रत्येक मनसैनिकाला इनबॉक्स मध्ये जाऊन मी राजकारण संन्यास घेतल्याची आठवण करून देतो. पण ते नाराज होत नाहीत कारण त्या सगळ्यांना माहित आहे की काही झाले तरी मी राजसाहेबांचा मोठा चाहता आहे.
(४) एक चाहता म्हणून राजसाहेबांत मी दोन गोष्टी पाहतो. पहिली गोष्ट ही की राजसाहेब म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि दुसरी गोष्ट ही की राजसाहेब हे मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब! या दोन्हीही गोष्टी ज्या नेत्यात एकवटल्या आहेत तो एकमेव नेता म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्राचा बुलंद आवाज या वाक्यात येतो तो मराठी माणूस आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब या वाक्यात येते ते हिंदुत्व! माझे हे विश्लेषण कोणाला पटेल अगर न पटेल मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मला या दोन्ही गोष्टी राजसाहेब ठाकरे यांच्यात एकत्र दिसतात हे खरे आहे. उद्या काही लोक राजसाहेबांबद्दल मला जो आदर आहे त्यावरही टीका करतील. पण अशा टीकेला मी महत्त्व देत नाही. राजकारण संन्यास घेऊनही मी राजसाहेबांचा चाहता व मनसेचा मतदार आहे व राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
(५) एकाच भेटीने एवढा मोठा परिणाम व तोही दीर्घकाळ टिकणारा होऊ शकतो हे राजसाहेब यांच्या उदाहरणाने निदान माझ्या बाबतीत तरी सिद्ध झालेय. मग काही लोक असेही म्हणतील की राजसाहेब ठाकरे यांच्याकडे संमोहन विद्या असावी आणि त्याचाच हा परिणाम असावा. कोण असेही म्हणतील की मी मूर्ख आहे व मला राजकारणच कळत नाही. कोणी माझी राजसाहेबांचा अंधभक्त अशीही संभावना करतील. कोणी काही का म्हणेना, मला काय त्याचे! बोलणारे बोलत राहतील. त्यांच्या नादी लागत बसलो तर माझा अमूल्य वेळ व शक्ती वाया जाईल. आपल्याला राजसाहेबांनी एका दिवसात प्रसिद्ध केले (थोडक्यात चमकवले) म्हणून मी राजसाहेबांविषयी कायम कृतज्ञ राहणार. कारण वकील होऊनही मला कोणी नीट ओळख दिली नव्हती. आता थोडा भाव खातोय ना तो राजसाहेबांच्या करिष्म्याच्या जोरावर! तुम्ही मला ओळख दिली नाही ती मला मा. राजसाहेब ठाकरे यांनी दिली. मग मी तुम्हाला मानणार की राजसाहेब ठाकरे यांना मानणार? हिशोब सरळ आहे! समझनेवालेको काफी इशारा!
(६) राजसाहेबांविषयी वरीलप्रमाणे कृतज्ञता व आदर व्यक्त करून मी आज १४ जून, २०२० रोजी महाराष्ट्राचा बुलंद आवाज व मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब मा. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनसे शुभेच्छा देतो व माझे हे मनोगत संपवतो.
-ॲड.बी.एस.मोरे©१४.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा