नैसर्गिक तेच वैज्ञानिक!
निसर्ग व देव, भौतिक व आध्यात्मिक, विज्ञान व धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास केल्याने खूप काही शिकायला मिळते. लोक म्हणतात तुलना करू नये. पण मी या विचाराच्या विरूद्ध आहे. माझ्या मते तुलना केल्याशिवाय फरकच कळत नाही. जगातल्या कोणत्याच गोष्टी सारख्या नाहीत व सारख्या नसल्याने त्या समान नाहीत. अशा असमान गोष्टींची तुलना करून त्यांच्यात असलेला मूलभूत फरक शोधून काढल्याशिवाय त्या गोष्टींचे ज्ञान होत नाही. तसेच असमान असूनही या गोष्टी एकत्र कशा राहतात हे कळत नाही म्हणजे त्यांना एकत्र ठेवणारा समान धागा सापडत नाही. याच उत्सुकतेने मी कायद्याचे शिक्षण घेत असतानाच नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागलो. मानव समाज हा निसर्गाचाच एक भाग तरीही तो भाग विशेष म्हणून त्या भागाचे कायदेही विशेष हे मला हा तुलनात्मक अभ्यास करताना कळले. आता कोरोना विषाणूचेच घ्या! अनेक कोरोना विषाणूंचा एक विशेष वर्ग, पण त्यातही वेगवेगळे प्रकार. सद्या जगाला सतावणारा कोविड-१९ हा या एकाच कोरोना वर्गातून निघालेला नवीन प्रकार. या एकाच वर्गातील वेगवेगळ्या कोरोना विषाणूंचा तुम्ही तुलनात्मक अभ्यास केल्याशिवाय कोविड-१९ वर तुम्हाला ठराविक औषध किंवा लस कशी सापडणार? म्हणजे निसर्गात विषाणूंचे वर्ग, त्या वर्गातील जाती, पोट जाती असतात का? हा सर्व नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा यांच्यातील तुलनात्मक अभ्यासाचाच भाग आहे. या तुलनात्मक अभ्यासाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. अशाच उत्सुकतेपोटी मी निसर्ग व देव, भौतिक व आध्यात्मिक, विज्ञान व धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागलो. माझ्या या अभ्यासात मूलभूत मुद्दा हाच आहे की आईबाप असल्याशिवाय मुले होत नाहीत. तो जो काही टेस्ट ट्यूब बेबीचा कृत्रिम गर्भधारणेचा प्रकार आहे ना त्यातही परीक्षा नलिकेत मूल तयार होण्यासाठी स्त्री बीज व पुरूष बीज यांचे मिलन व फलन घडवून आणावे लागते. मग माझ्या डोक्यात हाच विचार कायम चालू आहे की आईबापाशिवाय मूल नाही तर निसर्गाचा कोणी आईबापच नाही का? म्हणजे निसर्ग नावाच्या भल्यामोठ्या अवाढव्य पसरलेल्या झाडाला त्या झाडाचे मूळच नाही, त्याला बूडच नाही? म्हणजे खाली पाया नसताना निसर्गाची इमारत उभी? हे कसे शक्य आहे? हे माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला पटत नाही आणि म्हणून मग देव ही संकल्पना मला सोडत नाही. मग मी निसर्गाचे मूळ किंवा बूड म्हणजे देव या संकल्पनेला घट्ट पकडून ठेवतो व त्यामुळे आस्तिक होतो. मी वनस्पती शास्त्रात हेच वाचले आहे व नंतरही प्रत्यक्षात हेच पाहिले आहे की झाडाचा वरचा भाग म्हणजे त्याचा शेंडा व त्याच्या फांद्या. पण त्याच्या तळाच्या भागाला खोड किंवा खुंट म्हणतात आणि या खोडाची मुळे आत जमिनीत खोलवर व सर्वदूर पसरलेली असतात. शेंडा नाही ना बुडखा नाही असे झाड कोणी बघितलेय काय? माझ्या मते आपण निसर्गाचा फक्त वरचा भाग विज्ञानाच्या माध्यमातून अभ्यासत आहोत व याच वरवरच्या अभ्यासावर आपले तंत्रज्ञान उभे आहे. आपले विज्ञान अजूनही निसर्गाच्या बुडाशी किंवा मुळाशी पोहचलेले नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. पण मग हे मूळ कसे असावे? या प्रश्नातूनच मग तर्कवितर्क सुरू होतात. मी सद्या तरी निसर्गाचे मूळ किंवा बूड म्हणजे निसर्गाची अलौकिक शक्ती असे धरून चाललोय. ही मूळ अलौकिक शक्ती म्हणजेच देव अशी माझी स्वतःपुरती मर्यादित असलेली आस्तिक धारणा किंवा संकल्पना आहे. पण मला जर कोणी नास्तिकाने सांगितले की "चल, तू मानतो ना देवाला मग तो देव किंवा त्याची ती अलौकिक शक्ती पुराव्यानिशी सिद्ध करून दाखव"! तर मी निसर्गाच्या बुडाशी मानलेले देवाचे मूळ सिद्ध करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग नास्तिकांशी वादविवाद सुरू होतात. मग मी म्हणतो की जगात वासने बरोबर प्रेमही आहे. वासना ही लैंगिक क्रियेने सिद्ध करून दाखवता येईल पण प्रेमाचा पुरावा कसा देता येणार? पण तरीही प्रेम हे सत्य आहे की नाही? सर्वच नैसर्गिक गोष्टी सिद्ध करता येतात का? म्हणून निसर्गाचे मूळ असलेला देव ही पण नैसर्गिक गोष्ट असूनही ती सिद्ध करता येत नाही, वगैरे वगैरे. मग पुढे वासना व प्रेम या दोन्हीही नैसर्गिक म्हणजे निसर्गातून निर्माण झालेल्या गोष्टींची अनुक्रमे भौतिक व आध्यात्मिक अशी विभागणी केली जाते. मग पुढे वासना भौतिक म्हणून वासनेचे भौतिक विज्ञान पुढे येते तर प्रेम आध्यात्मिक म्हणून प्रेमाचा आध्यात्मिक धर्म पुढे येतो. ही विभागणी फक्त आपल्या बुद्धीला या दोन गोष्टींतला तुलनात्मक फरक कळावा यासाठीच आहे हे लक्षात घ्यायला हवे. पण मूलतः वासना व प्रेम या दोन्ही गोष्टी नैसर्गिक आहेत आणि म्हणूनच नैसर्गिक सत्य या अर्थाने त्या वैज्ञानिक आहेत. याच भूमिकेतून माझ्या मते निसर्ग व देव या दोन गोष्टी वरवर वेगळ्या भासत असल्या तरी मूलतः त्या नैसर्गिक व म्हणूनच वैज्ञानिक आहेत. नैसर्गिक तेच वैज्ञानिक हेच मला म्हणायचे आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा