https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ४ जून, २०२०

गंमतीदार स्वप्न!

स्वप्नांना काय रोखणार, त्यांचीही गंमत असते!

(१) लॉकडाऊनचा काळ म्हणजे कोरोनाच्या भीतीने गांगरून, घाबरून जायचा काळ! या काळात झोपेत पडणारी स्वप्नेही तशीच हवीत ना! पण तसे होत नाही. काल रात्री झोपेत मला एक गंमतीदार स्वप्न पडले. पडले म्हणण्यापेक्षा माझ्या मेंदूने ते माझ्यावर लादले असेच म्हणावे लागेल.

(२) या स्वप्नात माझी कंबर दुखत होती म्हणून तिचा व एकूणच लॉकडाऊन मुळे आंबलेल्या माझ्या शरीराचा मसाज करण्यासाठी मी एका मसाज पार्लर मध्ये गेलो. सुरूवातीलाच मी काऊंटर वर मसाज फी म्हणून ५०० रूपये दिले. ती फी दिल्यावर मला पोहे व चहा देऊन  माझे स्वागत करण्यात आले. मसाज पार्लर व पोहे व चहाचा नाष्टा, हा प्रकारच माझ्या डोक्यावरून गेला. पण मी त्या नाष्ट्याची मजा घेतली. त्या पार्लर मध्ये मसाज करून घेणाऱ्या पुरूषांची रांग लागली होती. मी पण त्या रांगेत जाऊन बसलो. आत असलेल्या एका खोलीत एकेकाला घेऊन त्याचा मसाज केला जात होता.

(३) शेवटी माझा नंबर आला. मग मी त्या आतल्या खोलीत गेलो. तिथे डॉक्टरच्या दवाखान्यात असतो तसा गादीचा बाकडा होता. त्या खोलीत बिग बॉस सारखा कोठून तरी आवाज आला व मला त्या बाकड्यावर झोपा असे सांगण्यात आले. मी बाकड्यावर झोपल्यावर साधारण ७० वयाची एक म्हातारी आली. तिने मला तुमची बेंबी उघडी करा असे सांगितले. मी तसे केले. मग तिने माझ्या बेंबीवर नरसाळे धरून बेंबीत कसले तरी तेल ओतले व तेल बेंबीत चांगले जिरल्यावर आता चला अशी म्हणाली. मी त्या म्हातारीला म्हणालो "अहो, मी इथे मसाज करायला आलोय आणि तुम्ही हे काय केले"? तर ती मला म्हणाली की, यालाच मसाज म्हणतात. मी डोक्यावर हात मारून त्या मसाज पार्लरच्या बाहेर पडलो.

(४) तुम्हाला वाटेल की हे स्वप्न उगाच माझ्या कल्पनेने रंगवून सांगतोय. पण खरं सांगतोय की, हे स्वप्न अगदी असेच पडले. तुम्ही म्हणाल की, मग स्वप्नात म्हातारीच का आली, म्हातारा का आला नाही? तर याला माझ्याकडे उत्तर नाही. मीही ६३ वर्षाचा म्हातारा आहे, मग ७० वर्षाची म्हातारी का आली, यालाही माझ्याकडे उत्तर नाही. खरंच सांगतो की झोपी गेल्यावर आपला मेंदू आपला पूर्ण ताबा घेतो व त्याला हवी तशी स्वप्ने आपल्यावर लादतो. अशा स्वप्नांना रोखणे आपल्या नियंत्रणात नसते.

-ॲड.बी.एस.मोरे©४.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा