https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १४ जून, २०२०

वासनांध, भावनांध

वासना ही बलात्कारी, खूनी तर भावना ही आत्मघातकी!

(१) वासनेचा अतिरेक माणसाला जंगली बनवून बलात्कार, खून करायला भाग पाडू शकतो. लैंगिकतेचे शमन करायला नकार दिला म्हणून वासनांध माणसे बलात्कार करून नंतर पुरावा नको म्हणून पिडितेचा खून करण्यास मागेपुढे पहात नाहीत. तर मालमत्तेच्या वादातून भाऊ भावाचा खून करायला धजावतो. मुलीने पळून जाऊन परधर्मातल्या/परजातीतल्या मुलाशी लग्न करून आपली सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळविली याचा राग येऊन एखादा बाप मुलीचा खून करायला मागेपुढे पहात नाही. ही झाली वासनेच्या अतिरेकाची उदाहरणे! वासना म्हणजे फक्त लैंगिक वासना नव्हे. मालमत्तेची हाव, सत्तेची हाव या सुध्दा वासनाच होत. म्हणजे वासनेचा अतिरेक माणसाला बलात्कारी, खूनी बनवू शकतो.

(२) याउलट भावनेचे आहे. माया, प्रेम, करूणा तसेच परोपकार यासारख्या मानवी मनाच्या  भावना चांगल्या आहेत. पण या चांगल्या भावनांचा अतिरेकही वाईट असतो. असा भावनिक अतिरेक किंवा अशी भावना विवशता माणसाला आत्मघातकी बनवते म्हणजे स्वतः स्वतःचीच आत्महत्या करायला भाग पाडते. प्रेमभंग झाला म्हणून भावनाविवश होत माणूस आत्महत्या करतो. आपले विवाहबाह्य संबंध उघडकीस आले आता जोडीदाराला तोंड कसे दाखवू या लज्जेच्या भावनेतून आत्महत्या करण्यास व्यक्ती उद्युक्त होते. कर्जबाजारी झाल्यावर जगाला तोंड कसे दाखवायचे या लज्जेच्या भावनेतून कर्जबाजारी व्यक्ती आत्महत्या करण्यास धजावते. ही सर्व झाली भावनेच्या अतिरेकाची किंवा भावना विवशतेची उदाहरणे! म्हणजे भावनेचा अतिरेक माणसाला आत्मघातकी बनवू शकतो.

(३) वासना व भावना या मानसिक असतात. परंतु वासनेचा संबंध शारीरिक भूकेशी जास्त असतो. भावनेचे तसे नसते. भावना ही मानवी मनाची उच्च पातळी आहे. म्हणून मी वासनेला भौतिक वासना व भावनेला आध्यात्मिक भावना असे संबोधतो. आध्यात्मिक म्हणजे फक्त देवधर्माच्या भावना नव्हेत. तर माया, प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या मानवी मनाच्या चांगल्या भावना यांना सुध्दा मी आध्यात्मिक भावना असे संबोधतो. देवाच्या आध्यात्मिक भावनेचा अतिरेक झाला की मनुष्य देवभोळा होतो व भौतिक व्यवहार करताना व्यावहारिक शहाणपण विसरतो. व्यावहारिक आत्मघातकी पणाचेच हे लक्षण! तसेच माया, प्रेमाच्या भावनेचा अतिरेक झाल्यावर सुद्धा मनुष्य भावनांध होऊन स्वतःच्या मूलभूत स्वार्थावर पाणी सोडतो आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. उदाहरणार्थ, आईवडील मुलांच्या प्रेमापोटी आपली संपत्ती जिवंतपणीच मुलांच्या नावावर करून मोकळे होतात व नंतर त्यांना मुलांपुढेच भीक मागायची वेळ येते. आत्मघातकीपणाचेच हे लक्षण होय!  कारण जिवंत असूनही मेल्याहून मेल्यासारखे जीवन स्वतःहून करून घेण्याचाच हा प्रकार!

(४) काहीवेळा शारीरिक व्याधी खूप भयंकर वेदना देतात. उदाहरणार्थ कर्करोगात माणूस वेदनेने अक्षरशः तडफडतो. असा माणूस अशा शारीरिक वेदना असह्य झाल्याने आत्महत्येचा निर्णय घेतो. तडफदार आय.पी.एस. अधिकारी श्री. हिमांशु रॉय यांनी कर्करोगाच्या वेदना असह्य झाल्याने स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हाॕल्वर ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना तशी अगदी अलिकडची! शारीरिक वेदनेमुळे स्वतःचा अंत करून घेण्याच्या कायदेशीर हक्काला स्वेच्छामरण हक्क म्हणतात. असे स्वेच्छामरण कायदेशीर करण्यासाठी याचिकांद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत प्रयत्न चालू आहेत. असे स्वेच्छामरण व भावनेचा अतिरेक करून केलेली आत्महत्या यात नक्कीच फरक आहे. पण अजूनही कायद्यात दोन्ही गोष्टींना आत्महत्याच म्हणतात.

(५) माझा हा लेख वासना व भावना या दोन गोष्टींचा सखोल विचार करणारा आहे. वासनेचा अतिरेक करून म्हणजे वासनांध होऊन बलात्कार, खून करणे जसे वाईट तसेच भावनेचा अतिरेक करून म्हणजे भावनांध होऊन आत्महत्या करणे वाईट! मानवी बुद्धीचा तो पराभव आहे. वासना व भावना यांच्यावर विवेकी बुद्धीचे सतत नियंत्रण असले पाहिजे. ते नियंत्रण सुटले की माणूस वासनांध होऊन बलात्कारी, खूनी होतो व भावनांध होऊन आत्मघातकी होतो.

ओम् शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा