https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २८ जून, २०२०

नवोदित वकील संघटना

फक्त कोर्टात बसून वकिली चालते काय?

(१) माझ्या फेसबुक खात्यावर बरीच वकील मंडळी आहेत. काही ज्येष्ठ वकील आहेत तर काही कनिष्ठ! आजची पोस्ट ज्येष्ठ वकिलांसाठी नाही तर कनिष्ठ वकिलांसाठी आहे. मी १९८८ साली मार्च महिन्यात जेंव्हा वकिली सुरू केली तो काळ व आताचा काळ यात खूप फरक पडला आहे. माझ्या काळात आजच्या सारखी अॉनलाईन वकिली नव्हती. त्यामुळे आजच्या तरूण वकिलांबरोबर मी माझा जुना अनुभव शेअर करावा की नको या विचारात होतो. कारण न्यायदानातही आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर सुरू झाल्याने जुने ते आता सोने राहिले नाही. जुनी गोष्ट म्हणजे कालबाह्य झालेली भंगार गोष्ट असा प्रकार झालाय.

(२)  नवोदित वकील माझ्या बाबतीत काय विचार करतील याचा नीट अंदाज न घेता मी हा लेख लिहित आहे. नवोदित वकील म्हणजे वकील किंवा न्यायाधीश घराण्यातून आलेली तरूण वकील मंडळी नव्हेत. त्यांना वकिलीचे बाळकडू घरातूनच मिळालेले असते. माझा रोख आहे तो म्हणजे माझ्यासारख्या गरीब कष्टकरी कुटुंबात जन्म घेऊन मोठ्या मेहनतीने वकील झालेल्या नवोदित वकिलांकडे. अशा गरीब घराण्यातील नवोदित वकिलांची आज परिस्थिती काय आहे याची मला नीट माहिती नाही. ती परिस्थिती बदललेली आहे की ती माझ्या काळासारखीच आजही तशीच आहे हे मला माहित नाही. मी वकील होऊन जवळच्या कोर्टात पहिल्या दिवशी गेलो तेंव्हा वकिलीचा कसलाच प्रत्यक्ष अनुभव नसलेला मी पार भांबावून गेलो होतो. डोक्यात कायद्याचे ज्ञान ताजेतवाने होते. पण मला कोर्टात कोणीही ओळखत नव्हते. बायकोने व मी दोघांनी मिळून खरेदी केलेला नवीन काळा कोट जुन्या बॕगेत घालून मी त्या कोर्टात गेलो व कोर्टाच्या दारातच कायद्याची पुस्तके विकणाऱ्याकडून वकिलाची ती पांढरी गळपट्टी विकत घेतली. मग बार रूमच्या एका कोपऱ्यात एक मोठा आरसा होता त्याच्यासमोर उभा राहून मी ती गळपट्टी कशीबशी गळ्याला बांधली व पांढऱ्या शर्टावर काळा कोट चढवून हळूच एका कोपऱ्यात जाऊन बसलो. माझ्याकडे बघून तिथली वकील मंडळी हा कोणीतरी नवखा वकील दिसतोय याचा अंदाज बांधून माझ्याकडे बघत होती. त्यावेळी मला मराठी चित्रपटातले "कुण्या गावाचं आलं पाखरू" हे गाणं आठवलं आणि मी आणखीनच घाबरून गेलो.

(३) सांगायचे काय की, मी कोर्टात दररोज बाररूममध्ये बसत होतो व न्यायदान कसे चालते हे बघण्यासाठी प्रत्यक्ष कोर्टातही बसत होतो. पण मला कायद्याची कामे मिळत नव्हती व एक पैसाही मिळत नव्हता. दररोज रूबाबात कोर्टात जायचो व हात हलवीत परत यायचो. असे आठ दिवस चालले. मग हळूहळू काही तरूण वकिलांबरोबर बोलून माहिती घ्यायला सुरूवात केली तर कळले की माझ्यासारखे कोर्टात येऊन संध्याकाळी हात हलवीत घरी परत जाणारे बरेच गरीब वकील तिथे आहेत. त्यांना विचारले की, ते दुसरे काही तरूण वकील कसे बिझी दिसतात तर कळले की ती मोठ्यांची पोरं होती. चांगले बस्तान बसलेली सिनियर वकील मंडळी मात्र जाडजूड ब्रिफ्स घेऊन कामात छान बिझी होती.

(४) एके दिवशी हिंमत करून एका सिनियर वकिलाला गाठून विचारले की, "सर मी खूप गरिबीतून वकील झालोय, पण इथे दररोज येऊन मला कसले काम नाही की पैसा नाही, घरी बायको गृहिणी आहे व मुलीला ज्यूनियर के.जी. शाळेत घातलेय, माझे कसे व्हायचे, मी तुमची पुस्तके उचलीन, तुमचे डिक्टेशन घेईन, कोर्टातल्या तारखा घेईन, तुम्ही मला महिन्याचा पगार नाही पण माझ्या कामाचा काही मोबदला पैशात द्याल का"? त्या सिनियर वकिलांना माझी काय दया आली कोण जाणे पण त्यांनी मला दरमहा ५०० रू. मोबदला देऊ केला. तुम्हीच हिशोब करा की १९८८ सालचे ५०० रू. म्हणजे आता २०२० सालचे किती होतील? अशाप्रकारे दरमहा ५०० रूपयावर माझी वकिली सुरू झाली. इतर नवीन वकील मंडळी मात्र त्या दिवसापासून माझ्यावर जळू लागली. हा मागून आला आणि त्या फटकळ सिनियर वकिलाला याने पटवलेच कसे याचे कदाचित त्यांना आश्चर्य वाटले असावे.

(५) आता मी माझ्या वकिलीचा पूर्ण इतिहास इथे सांगत बसत नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, कोर्ट सुरू होण्यापूर्वी सकाळचे दोन तास त्या सिनियर वकिलांच्या अॉफीसमध्ये काम करायचे, मग कोर्टात जवळजवळ सात तास त्या सिनियरच्या तारखा घेत फिरायचे व मग कोर्ट सुटल्यावर त्या सिनियरच्या अॉफिस मध्ये पुन्हा तीन तास काम करायचे, म्हणजे दररोज बारा तास काम करायचे. शनिवारी तर ते अॉफिस चालू असायचेच पण रविवारी सुध्दा ते सिनियर वकील मला सकाळी तीन तास त्यांच्या अॉफिसात बोलवायचे. एवढी प्रचंड मेहनत करून महिन्याच्या शेवटी ते सिनियर वकील माझ्या हातात ५०० रूपये टेकवायचे. ती तसली कंबरडे मोडणारी मेहनत मी नेटाने तीन महिने केली. त्या तीन महिन्याची कमाई १५०० रूपये. ते सर्व पैसे घरखर्चात संपलेच पण वर बायकोने १००० रूपये कर्ज करून ठेवले. काय करणार होती ती बिच्चारी तेवढ्या तुटपुंज्या उत्पन्नात?

(६) मला कळून चुकले की, ही असली वकिली नक्कीच आपल्याला भिकेला लावेल. मग मात्र  मी ठरवले की नुसते कोर्टात येऊन, सिनियर वकिलाची तळी उचलून काही आपले पोट भरणार नाही व संसारही चालणार नाही. मी बिनधास्त त्या सिनियर वकिलांना रामराम केला व कोर्टाच्या बाहेर जे मोठे जग आहे त्या जगात उडी घेऊन त्या तीन महिन्याच्या माझ्या वकिली प्रॕक्टिसचे सोने केले. निरनिराळ्या सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यांच्या प्रमुखांची मी धाडस करून प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनाही त्या सिनियर वकिलांना जसे खरे सांगितले तशीच   खरी परिस्थिती सांगितली आणि तिथून सुरू झाली माझी स्वतःची स्वतंत्र वकिली. कोणाचे कसलेही पाठबळ नाही, वकिलीतले मार्गदर्शन नाही, पण तरीही वकील म्हणून मी माझे उत्पन्न थोडे थोडे का असेना पण विविध ठिकाणाहून सुरू केले आणि माझे उत्पन्न दरमहा १५०० रूपये केले आणि तेही कोणत्याही सिनियर वकिलाची हाजी हाजी न करता. मी नुसता कोर्टातच जाऊन बसलो असतो तर मी माझा संसार करीत माझ्या मुलीला एम.बी.ए. पर्यंत शिकवू शकलो असतो का याबद्दल मी साशंक आहे.

(७) मी त्यावेळी लॉयर्स कलेक्टिव्ह कडून प्रेरणा घेऊन ज्यूनियर वकिलांची एक संघटना काढली होती व बार कौन्सिलला पत्र लिहून  प्रत्येक कंपनीत लिगल अॉडिट अनिवार्य करा, मग तिथे ज्यूनियर वकिलांना काम मिळेल वगैरे मागण्या केल्या होत्या. पण बार कौन्सिल कडून मला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. माझे तर आजही असे म्हणणे आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला २४ तास पोलीसांचे स्थानिक  कायदेशीर सल्लागार म्हणून वकिलांची नेमणूक करायला हवी म्हणजे केसला कलमे कोणती लावायची इथून सुरूवात होईल. वकिलांएवढे कायद्याचे सखोल ज्ञान पोलीसांना असू शकत नाही. आय.पी.एस. परीक्षा काय किंवा राज्य पोलीस परीक्षा काय ती म्हणजे एलएल. बी. ची पदवी नव्हे. सरकारी वकील (पी.पी.) कोर्टाचे कामकाज पाहतील व प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगळे वकील पोलीसांचे दैनंदिन कायदेशीर सल्लागार राहतील. ही सूचना चुकीची कशी यावर आजच्या सक्रिय वकिलांनी मार्गदर्शन करावे.

(८) आणखी एक सूचना मी मागे जाहीरपणे केली होती की, सार्वजनिक रूग्णालये २४ तास चालू असतात, पोलीस स्टेशन्स २४ तास चालू असतात, मग सार्वजनिक न्याय देणारी कोर्टस २४ तास का चालू ठेवीत नाहीत? साठलेल्या केसेसचा भराभर निपटारा होईल, तारीख पे तारीख ही गोष्ट कालबाह्य होईल व सगळ्या वकिलांनाही २४ तास काम मिळेल. पण माझी ही सूचना सरकारच्या पचनी पडेल काय?

(९) आता शेवटचा मुद्दा हा की, सार्वजनिक रूग्णालयातील शिकाऊ डॉक्टर्सना काहीतरी स्टायपेंड मिळतेय की नाही की ते डॉक्टर्स जनतेची फुकट सेवा करतात? मग न्यायदान ही सुध्दा वैद्यकीय सेवेइतकीच उदात्त सेवा आहे हे मान्य करून नवोदित वकिलांना न्यायालयाचे मदतनीस अशी नेमणूक करून त्यांना दरमहा स्टायपेंड देण्यात काय गैर आहे? ही योजना फक्त गरीब कुटुंबातून मोठ्या कष्टाने वकील झालेल्या नवोदित वकिलांसाठीच असावी. आजच्या नवोदित वकील मित्रांनो तुम्ही अॉनलॉईन वकिलीचे मास्टर्स होऊन छान कमाई करीत असाल तर माझ्या या सूचना केराच्या टोपलीत टाका. पण जर तुमची आर्थिक परिस्थिती माझ्या त्याच सुरूवातीच्या काळासारखी आजही असेल तर मग नवोदित वकिलांची स्वतंत्र संघटना निर्माण करून माझ्या या लेखातील सूचनांचा बार कौन्सिल, कायदा मंत्रालय, मुख्यमंत्री व आपले पंतप्रधान या सर्वांकडे नेटाने पाठपुरावा करा. मला त्याकाळी जे जमले नाही ते तुम्ही आता साध्य करून दाखवा.

(१०) पाच वर्षाखालील प्रॕक्टिस असलेल्या नवोदित वकिलांनी राज्य स्तरावरच नव्हे तर देशपातळीवर अशी स्वतंत्र संघटना बांधावी कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांनी तसे करू नये असे जर प्रत्येक कोर्टाच्या बार असोसिएशला वाटत असेल तर सर्व बार असोसिएशनचे राज्य व देश पातळीवर एक फेडरेशन निर्माण व्हावे व या फेडरेशनने नवोदित वकिलांचा प्रश्न हातात घेऊन तो तातडीने सोडवावा. माझा हा लेख जर तुम्हा वकिलांना आवडला असेल तर या लेखाची छायाचित्रे घेऊन किंवा छापील प्रती काढून तुम्ही तुमच्या लेटरहेड वरून त्या प्रती बार कौन्सिल व सरकारकडे पाठवू शकता.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा