अडगळ!
बाळा गाऊ कशी अंगाई या १९७७ सालच्या मराठी चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले व आशा काळे यांच्यावर चित्रित झालेले "संसार मांडते मी" हे गाणे मला फार आवडते. लग्न झाल्यावर मग नवरा बायकोचा संसार सुरू होतो व त्यानंतर घर घेण्यापासून त्या घरात संसाराला लागणाऱ्या एकेक वस्तू आणण्यास सुरूवात होते. त्या संसारोपयोगी वस्तू खरेदी करून घरात आणताना नवरा व बायकोची एकमेकांबरोबर भावनिक जवळीक निर्माण होत असताना त्या वस्तूंबरोबर सुध्दा भावनिक जवळीक निर्माण होत असते. त्या वस्तूंची घरात योग्य ठिकाणी नीट मांडणी करीत असताना नवऱ्यापेक्षा बायकोची लगबग खूप मोठी असते. नवरा बायकोचे वय वाढत जाते तसे त्यांच्या संसाराचेही वय वाढत जाते. मग हळूहळू सुरूवातीला हौसेने आणलेल्या घरातील संसारोपयोगी वस्तू जुन्या होत जातात. पण वय वाढल्याने जशी नवरा बायकोतील भावनिक जवळीक घट्ट होत जाते तशी त्या दोघांची संसारासाठी दोघांनी मिळून घरात आणलेल्या वस्तूंशीही भावनिक जवळीक घट्ट होत जाते. पण पुढे मुले मोठी होतात. चांगली कमावती होतात. मग त्यांना घरात नवीन बदल करण्याची इच्छा होते. कारण त्यांच्या तरूण रक्ताला नाविन्याची ओढ असते. मग ती मुले आईवडिलांना म्हणतात की, "घरातील वस्तू आता खूप जुन्या झाल्यात, आम्ही आमच्या खर्चाने नवीन आणतो, घराच्या लाद्या जुन्या स्टाईलच्या खडबडीत आहेत, आम्ही आमच्या खर्चाने नवीन चकचकीत लाद्या बसवतो". खरं तर या गोष्टी वृध्द झालेल्या नवरा बायकोला पटत नाहीत. एकेक वस्तू गोळा करताना त्यांनी स्वतःचा जीव त्यात ओतलेला असतो आणि आता ही मुले त्यांच्या या सर्व गोष्टी भंगारात काढायला निघालेली असतात. एकांत मिळाला की मग अशी नवरा बायको हळूच कुजबुजतात "या मुलांना आपण संसारासाठी खरेदी केलेल्या वस्तू आता जुनाट वाटू लागल्यात, आता त्यांना या वस्तूंची अडगळ वाटू लागलीय, काय जाणो उद्या आपलीही यांना अडगळ वाटेल"! मग माझ्यासारखा कडक बाप कडाडतो "काही गरज नाही नवीन वस्तूंची, नवीन लाद्यांची, त्या गुळगुळीत लाद्यांवर म्हातारपणी घसरून पडून आम्हाला आमचे हातपाय मोडून घ्यायचे नाहीत कोणाला काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःची घरे घेऊन त्या घरांत करावेत, आमचे हे घर आमच्या वस्तूं सह आहे तसेच राहूद्या"! वृध्द बायकोला तिच्या वृध्द नवऱ्याचा कडकपणा मनातून सुखावतो. पण तिकडून मुलांची मने दुखावली गेली म्हणून ती माऊली आतून रडतही असते. हे उदाहरण आहे माझ्या वडिलांचे व माझ्या आईचे! मी कमावता झाल्यावर असेच काही बदल वरळी बी.डी.डी. चाळीतल्या छोट्या घरात करायला घेतले होते तेंव्हा माझे वडील माझ्यावर असेच कडाडले होते. मी कर्जाच्या हप्त्यावर घरात ब्लॕक अँड व्हाईट टी.व्ही. आणायचे ठरवले तेंव्हा वडील माझ्यावर खूप भडकले होते. आमच्या घरात फार जुनी लोखंडी खाट होती. ती खूप मजबूत होती. माझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी ती आणली होती. तिला ते अधूनमधून हिरवा अॉईल पेंट द्यायचे. ती खाट ठेवायला त्यांनी सुताराकडून जाडजूड चार मोठे ठोकळे तयार करून घेतले होते. त्या ठोकळ्यांवर ती लोखंडी खाट ठेवल्याने तिची उंची वाढवली गेली होती जेणेकरून घरातील पेट्या, बिछाने वगैरे सामान त्या खाटेखाली ठेवता येईल. घरात कोण पाहुणे मंडळी आली तर त्यांना ते सामान दिसू नये म्हणून आईने त्या खाटेच्या मापाचा एक पडदा शिवून घेतला होता व त्या खाटेला लावला होता. माझ्या आईवडिलांचा त्या जुन्या लोखंडी खाटेवर फार जीव होतो. ती लोखंडी खाट होतीच तशी मजबूत! तसेच मी व आई दोघांनी मिळून नळबाजारातून (त्याला मुंबईत चोर बाजार म्हणतात) एक मस्त लाकडी कपाट आणले होते. त्या कपाटाला पुढून मोठी उभी काच होती. त्या काचेत बघून घरातील आम्हा सगळ्यांचे भांग काढणे व्हायचे. त्या कपाटाला छान कप्पे होते. ते कप्पे आम्ही बहीण भावांनी वाटून घेतले होते. त्यांचा उपयोग प्रत्येकाचे कपडे व शाळेतील पुस्तके ठेवण्यासाठी केला जायचा. माझ्या ठराविक दोन कप्प्यांना कोणी हात लावला की मी घरात जाम चिडायचो. मग आई मला शांत करायची. अधूनमधून माझे वडीलही ओरडायचे "त्या बाळूच्या कप्प्यांना हात का लावता तुम्ही" असे माझ्या बाजूने बोलायचे. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या त्या जुन्या वस्तू वरळीच्या त्या जुन्या घरासह शेवट पर्यंत जपल्या. पण २००९ साली वडील वारले. घराच्या वाटण्या चार भावंडात करायचे ठरले. आणि मग त्या घरातील तो संसार विस्कटला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर संसारातील त्या जुन्या वस्तूंची आता विल्हेवाट लागणार म्हणून माझ्या आईची तळमळ तिच्या डोळ्यांत मला दिसत होती. "नवरा गेला, उभा संसार मोडला, बाबांनो आता तुम्हाला काय करायचे ते करा, माझा नवरा जिवंत असता तर तुमच्या एकाचेही त्याने काही चालू दिले नसते, आता मी एकटी पडलेय माझे काय चालणार" असेच भाव मला माझ्या आईच्या डोळ्यांत दिसत होते. पण माझाही नाइलाज होता. मीच पुढाकार घेतला आणि चार भावंडात त्या चार वाटण्या केल्या. कारण मला चार भांवडांत पुढे जराही वाद वाढू द्यायचे नव्हते. सर्व भांवडांची व माझ्या आईची संमती घेऊनच मी त्या चार वाटण्या केल्या. पण त्या वाटणीने सगळ्यांचीच मने दुखावणारी एक गोष्ट झाली आणि ती म्हणजे माझ्या आईचा जीव तिच्या नवऱ्याच्या ज्या घरात होता, त्या घरात संसारासाठी तिने जमवलेल्या ज्या जुन्या वस्तूंत होता, त्या सगळ्याच गोष्टी उध्वस्त झाल्या. माझ्या आईने तिच्या नवऱ्याबरोबर (माझ्या वडिलांबरोबर) मांडलेला संसार अशा रितीने मोडला गेला. तिने संसार मांडला आणि शेवटी नवऱ्याच्या (माझ्या वडिलांच्या) मृत्यूने तो मोडला! म्हणून "संसार मांडते मी" हे गाणे मला खूप भावूक करते. आता इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. आम्ही नवरा बायको आता वृध्द झालो आहोत. आम्ही संसारासाठी जमवलेल्या वस्तूंही आमच्या घरासह आता जुन्या झाल्यात. माझी आर्थिक आवक कमी झालीय. मुलगी लग्न होऊन सासरी गेलीय. मुलगी कसली आमचा तो मुलगाच आहे. मग आमची ही मुलगी कधीतरी आमचे जुने घर नव्याने सजवू असे म्हणेल, त्यासाठी ती तिचा पैसाही स्वखुशीने देऊ करील. पण मी ते होऊ देणार नाही. माझ्या वडिलांसारखाच मी स्वाभिमानी आहे. मुलीचे पैसे घ्यायचे तर नाहीतच पण आम्ही नवरा बायकोने संसारात जमवलेल्या वस्तू त्या जुन्या झाल्या म्हणून आम्ही जिवंत असताना भंगारात जाऊ देणे आम्हाला आवडणार नाही. जुन्या झाल्या तरी त्या व्यवस्थित काम देतात ना हे महत्वाचे! आमच्या दोघांचेही हृदय या घरात, या जुन्या वस्तूंत गुंतलेले आहे. मग आम्हाला त्यांची अडगळ कशी वाटेल? जेंव्हा आमच्या दोघांपैकी एकजण अगोदर वर जाईल तेंव्हा आमचा संसार मोडेल. मग घर काय व त्या घरात संसारासाठी आम्ही गोळा केलेल्या वस्तू काय, मागे राहणाऱ्या आमच्या पैकी एकाला त्याचे काहीच वाटणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी! मांडलेला संसार पुढे निसर्गाकडून मोडलाही जातो हे सत्य कटू असले तरी ते स्वीकारावेच लागणार!
-ॲड.बी.एस.मोरे©२५.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा