कोरोना काळात गरीब वकिलांची परिस्थिती खूप नाजूक!
माणूस, मग वकील असो नाहीतर आणखी कोणी, कोरोना लॉकडाऊन मुळे तीन महिने घरी कोंडून राहिल्यावर कोणाचीही मानसिक स्थिती ठीक राहू शकत नाही. कोरोनाने निर्माण केलेली वैद्यकीय आणीबाणी व भारत-चीन सीमेवर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती या आणीबाणी सदृश्य गंभीर बाबी! आपल्या रोजच्या व्यवहारातील वादविवाद व त्यावर असलेले दिवाणी कायद्याचे तोडगे या गोष्टी अशा आणीबाणीत मोडू शकत नाहीत. कोरोना लॉकडाऊन काळात पोलीसांचा दंडुकाही भारी वजनाचा झाल्याने गुन्हेगार पण हल्ली घाबरून आहेत. त्यामुळे दिवाणी व फौजदारी अशी दोन्ही प्रकारची वकिली सद्या गॕसवर आहे. अशा परिस्थितीत वकिलांची मानसिक स्थिती कशी असेल याचाही लोकांनी जरा नीट विचार करावा. स्पर्धा तर सगळ्याच क्षेत्रात आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या जागा मजबूत करून बसलेले बोके आहेत. अशा बोक्यांची मोठी लॉबी असते. त्यात एखादा गरीब घराण्यातील माणूस बोक्यांच्या तोडीस तोड असलेले टॕलेंट घेऊन उतरला की मग बोक्यांची जळते. मग असे बोके एक होऊन अशा माणसाला वाळीत टाकतात. त्याला पुढे येऊ देत नाहीत. अशा विचित्र परिस्थितीमुळे असा माणूस खचतो. खूप निराश होतो. नैराश्येच्या गर्तेत गेल्यावर अशा माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात. सद्याच्या कोरोना लॉकडाऊन काळात संपूर्ण वकिली व्यवसायच गॕसवर आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मग त्यात गरीब घराण्यातून कायद्याचे शिक्षण घेऊन वकील झालेले नवोदित वकील सद्या कोणत्या परिस्थितीत जगत असतील याचा कोणी विचार केलाय का? वकिलांना पोट नसते काय? ज्यांचे आईवडील, नातेवाईक या क्षेत्रात पूर्वीपासून आहेत त्यांचा थोडा का असेना पण जम बसलेला असतो. पण ज्यांच्या पाठीशी अशी घराणेशाही उभी नाही अशा वकिलांची या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जी जीवघेणी धडपड चालू असते ती काय असते हे मला विचारा. या परिस्थितीतून मी गेलोय व जातोय. म्हणूनच या कोरोना लॉकडाऊनच्या काळात अशा गरीब वकिलांची स्थिती काय असेल याची लोकांनी कल्पना करावी एवढीच किमान अपेक्षा!
-ॲड.बी.एस.मोरे©१८.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा