https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २६ जून, २०२०

२७ जून वाढदिवस!

६४ व्या वयात पदार्पण करताना!

(१) आज २७ जून, २०२० माझा ६३ वा वाढदिवस. म्हणजे मी माझ्या आयुष्याची ६३ वर्षे पूर्ण करून ६४ व्या वर्षात पदार्पण केले. मी जर मोठा साधुसंत वगैरे झालो असतो तर लोकांनी माझा वाढदिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला असता. पण मला आयुष्यात ना साधुगिरी जमली ना गांधीगिरी ना दादागिरी! मी एक तुम्हा सर्वांसारखाच एक सर्वसामान्य माणूस! म्हणून तर मला सरळसाध्या जीवनाचा मस्त, मनमुराद आनंद घेता आला आणि तीच माझी आयुष्याची मजा!

(२) मला वकिलीत जास्त पैसे कमावता आले नाहीत व मग कमी पैशात वृध्दापकाळासाठी बचतही करता आली नाही. जेवढे पैसे कमावले तेवढे संसारात खर्च केले. कधी वाटलेच नव्हते की वृध्दापकाळात कोरोना सारखा बिकट काळ येईल व आपली पुंगी ताईट करील. म्हणून तर मी मेडिक्लेम सुध्दा काढला नाही. माझा एक सरळसाधा हिशोब की, मी किंवा माझी बायको आजारी पडलो तर मग सरळ के.ई.एम. किंवा जे.जे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणे तिथेच मरायचे. माझे आईवडील पण तिथेच मेलेत. पण माझ्या विवाहित लेकीला माझे हे असले वागणे जराही पसंत नाही. ती सारखी आम्हा नवरा बायकोच्या मागे मेडीक्लेम काढा म्हणून मागे लागलीय. एम.बी.ए. होऊन ती मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदावर आहे व त्याच दर्जाच्या मोठ्या कुटुंबात तिचा विवाह झाल्याने माझे हे असले वागणे तिला बिलकुल पसंत नाही. तिने मला आज फोनवरून सरळ सांगून टाकले की आमच्या दोघांचा मेडीक्लेम ती  काढणार म्हणजे काढणारच व त्याचे हप्तेही तीच भरणार. "तुम्ही नेहमी स्वतःचे खरे करीत आलात, आता यापुढे तुम्हाला माझे ऐकावेच लागेल" असे तिने मला फोनवरून बजावले. एकुलती एक मुलगी ती! माझ्या इच्छेप्रमाणे  उच्च शिक्षण घेऊन एम.बी.ए. झाली, करियर मध्ये मोठे यश मिळवले, तसेच छान जोडीदार मिळवला, मग आता तिचे थोडे ऐकलेच पाहिजे म्हणून मी मेडीक्लेमला तयार झालोय. पण मी इकडे काल माझ्या बायकोचे म्हणजे तिच्या आईचे मंगळसूत्र गुपचूप मोडून लॉकडाऊन काळात झालेले बाहेरचे कर्ज फेडलेय हे तिला आईकडून कळले तेंव्हा तिला खूपच वाईट वाटले. "माझे लग्न झाले असले तरी काय झाले, मी तुमचा मुलगाच आहे ना, मग तुम्ही मला पैसे मागायला संकोच का केला, कसला असला स्वाभिमान घेऊन बसलात स्वतःच्या मुलीबरोबर"! असे बरेच काही फोनवरून बोलून तिने आम्हा दोघांनाही निरूत्तर केले. मी जरी बचत करू शकलो नाही तरी मुलीचे हे शब्द म्हणजे मी माझ्या आयुष्यात मिळवलेली खूप मोठी संपत्ती आहे हेच सांगून जातात.

(३) गेल्या ६३ वर्षांच्या काळात माझ्या नुसत्या उच्च शिक्षणानेच नाही तर अनेक प्रकारच्या बऱ्या वाईट अनुभवांनी मला खूप काही शिकवले. नैराश्य आले तरी त्यावर मी माझ्या सकारात्मक विचारांनी मात केली. यात मला माझी बायको, मुलगी, नातेवाईक, काही मोजके मित्र यांनीच नव्हे तर माझ्या काही क्लायंटसनीही खूप मोठी साथ दिली. म्हणून तर बायको गृहिणी, वकिली क्षेत्रात आमचे कोणी आईवडील, बहीण भाऊ नसल्यामुळे या क्षेत्राच्या अंतर्भागाचे ज्ञान शून्य असताना व पिढीजात कौटुंबिक गरिबी असतानाही मी या आव्हानात्मक क्षेत्रात तग धरून राहू शकलो व साधा का असेना पण संसारही करू शकलो.

(४) आयुष्याच्या या अंतिम वळणावर पुन्हा कोरोना महामारीने खूप काही शिकवले. या कोरोना महामारीने जगात सर्वांपुढेच मोठे आव्हान निर्माण केले आहे. मग त्यातून माझी कशी सुटका होणार? मीही त्यात सापडलोय. पण तरीही नैराश्यावर मात करण्यात यशस्वी झालोय. माझे हे तिसरे फेसबुक खाते आहे. पहिल्या दोन खात्यांवर मी दररोज फेसबुक मित्रांचे वाढदिवस बघून त्यांना न चुकता दररोज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतो. पण मित्र संख्या वाढत गेली की मग ते दररोज शुभेच्छा देणे जमेनासे झाले. आता या तिसऱ्या फेसबुक खात्यावर मी कोणाचेही वाढदिवस बघत नाही आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही. कधीतरी चुकून होम पेजवर कोणाचा तरी वाढदिवस आहे हे कळले की मग तिथेच कमेंट मध्ये त्याला किंवा तिला शुभेच्छा देऊन मोकळा होतो. लग्नाच्या वाढदिवसांचेही तसेच झालेय. पण माझ्याकडून असे वर्तन घडत असतानाही आज मला फेसबुक मित्रांनी माझ्या खात्यावर व इनबॉक्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आणि मला लाजवले. कशा घेऊ मी तुमच्या शुभेच्छा? सद्याचा काळ तर कोरोना विषाणूच्या भीतीचा व कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूचा आहे. म्हणजे वाढदिवस बाजूला ठेवून दररोज आठवणींचा स्मृतिदिन करायचा हा काळ! आपण सर्वच जण सद्या फार बिकट परिस्थितीतून जात आहोत. काही लोकांची आर्थिक परिस्थिती तर खूपच नाजूक झाली आहे. काही घरांत उपासमार चालू आहे. अशा परिस्थितीत तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करणे मला जड जातेय. तरीही तुम्ही एवढया प्रेमाने मला शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणून तुमचे खूप खूप आभार व मनस्वी धन्यवाद!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.६.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा