मी एक सामान्य, फिरता वकील!
(१) खरं म्हणजे, प्रत्यक्ष वकिलीतच मला माझ्या कायदेशीर कामाची नीट फी घेता आली नाही तर आता मी अॉनलाईन वकिली करून काय फी घेणार? एकतर हे तंत्रज्ञान मला नवीन आहे. प्रत्यक्ष भेटीतून मी क्लायंटशी सल्लामसलत करतो. त्यासाठी कंपनी क्लायंटसनी बोलावले तर त्यांच्या कार्यालयात जातो. कारण माझे स्वतंत्र कार्यालय नाही की कसली आधुनिक यंत्रणा व माझा स्वतंत्र स्टाफ माझ्याकडे नाही! हातगाडीवर सामान घेऊन गल्ली बोळांतून फिरणाऱ्या कष्टकरी कामगाराप्रमाणे मी फिरता वकील आहे. पण वयानुसार आता फिरण्यावरही मर्यादा आल्या आहेत. मला अॉनलाईन वकिली जमत नाही आणि जमवायचीही नाही. फिरती वकिली करून पोटापाण्यापुरते पैसे मिळतात त्यात मी समाधानी आहे.
(२) आता अशा या फाटक्या वकिलाला लोक समाज माध्यमावर मोठमोठे प्रश्न कोणत्या आधारावर करतात हेच कळत नाही. बहुतेक मी कोणीतरी खूप ज्ञानी वकील आहे असा माझ्या काही फेसबुक पोस्टसमुळे काही लोकांचा गैरसमज होत असावा. पण ज्ञानी असणे म्हणजे पॉवरफुल असणे नव्हे हे त्यांना कसे समजावून सांगू?
(३) भारत हा अंदाजे १४० कोटी लोकांचा देश आहे. त्यात धार्मिक, जातीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व इतरही बरीच विविधता आहे, जी विविधता माणसा माणसांत फरक करते. हा फरक कधीकधी भेदाभेद करीत एकमेकांवर अन्याय करायला धजावतो. एवढया मोठ्या भारत देशात दररोज अनेक अन्यायकारक केसेस होत होतात. देशात दररोज बलात्कार किती होतात हे किती जणांना माहित आहे, सरकारला तरी याची संपूर्ण माहिती आहे का? असूच शकत नाही. कारण लज्जा, भीतीपोटी कित्येक केसेसची नोंदच होत नाही. लोक गप्प बसून अन्याय सहन करतात. मग त्याला भारताचे संविधान किंवा भारतातील कायदे काय करणार? तरीही अमूक अमूक अन्यायकारक गोष्ट झालीच का, तिथे कोण होते, मग असा अन्याय करणाऱ्यांना शिक्षा का झाली नाही असे प्रश्न काही मित्रमंडळी मला समाज माध्यमावर बिनधास्त करतात. जणूकाही मी अशा प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे व मला त्यांची संपूर्ण माहिती आहे. असा अंदाज ही मंडळी स्वकयासाने घेतातच कसा?
(४) मी तर एक सामान्य वकील आहे ज्याचे आकाशात उडण्याचे पंखच परिस्थितीमुळे छाटले गेलेत. अशा वकिलाकडून काही मित्र मंडळी अशा काही प्रकरणांवर उत्तराची अपेक्षा तरी कशी करतात? म्हणूनच असे उलट प्रश्न करणाऱ्या अशा काही लोकांना माझी ही जाहीर नम्र विनंती की, बाबांनो माझ्या फेसबुक पोस्टस या माझ्या स्वानुभवाच्या, माझ्या अल्प ज्ञानाच्या पोस्टस असतात. त्या तुम्ही वाचा. त्यातील काही आवडले तर घ्या. जे आवडणार नाही, जे पटणार नाही ते सोडून द्या. पण तुम्ही कृपया माझ्या ज्ञानाची, माझ्या वकिलीची उलटतपासणी घेऊ नका. कारण मी एक सामान्य, फिरता वकील आहे!
-ॲड.बी.एस.मोरे©१३.६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा