https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ३० जून, २०२०

२०२० सालाची उदास आषाढी एकादशी!

आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!

मी पंढरपूरकर असल्याने पंढरपूरच्या अनेक वाऱ्या लहानपणापासून बघत आलो आहे. कार्तिकी एकादशीची वारी तर मोठी आहेच पण सर्वात मोठी वारी म्हणजे आषाढी एकादशीची वारी. लाखो वारकऱ्यांच्या भेटीने सजणारी ही सर्वात मोठी पंढरपूर यात्रा! पण आज १ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी असूनही सारे पंढरपूर ओस पडलेय, चंद्रभागा नदीचा परिसर ओसाड झालाय आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारी विठ्ठलाची महापूजा मास्क लावून होतेय, हे दृश्य आयुष्यात पहिल्यांदाच बघायला मिळतेय आणि या सर्वाला कारण काय तर कोरोनाचे महाभूत! कोरोनाचे महाभूत देवाला भारी पडतेय यावर विश्वासच बसत नाही. अशी उदास आषाढी एकादशी कधी बघायला मिळेल असे चुकूनही वाटले नव्हते. यालाही देवाची लीला म्हणूया व कोरोना लस लवकर बाजारात आणून कोरोनाचे महाभूत पळवून लाव अशी विठ्ठलाकडे प्रार्थना करूया! हरी विठ्ठल! हरी पांडुरंग!

-ॲड.बी.एस.मोरे©१.७.२०२०

सोमवार, २९ जून, २०२०

ओम् नमः शिवाय!

ओम् नमः शिवाय!

(१) देशाच्या राज्यघटनेचा आत्मा (मन) त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत स्पष्ट दिसतो तसा निसर्गाच्या भौतिक, रासायनिक व जैविक रचनेचा आत्मा (मन) त्या रचनेत स्पष्टपणे कुठेच दिसत नाही. निसर्गाचे शरीर दिसते, पण त्याचा आत्मा (मन) दिसत नाही. हीच तर खरी गोची आहे! तसे पाहिले तर मनुष्याला सुध्दा  स्वतःचे शरीर दिसते, पण त्याच्या डोक्याच्या कवटीतील त्याचा मेंदू त्याला कुठे दिसतो? समजा एखाद्या पेशंटच्या जिवंतपणीच त्याच्या कवटीचे अॉपरेशन करताना सर्जनने जर त्या पेशंटचा मेंदू तात्पुरता त्या कवटीबाहेर काढून ठेवला तर त्या मेंदूचे दर्शन त्या सर्जनला होईल, पण पेशंटला होणार नाही.

(२) स्वतःला न दिसणाऱ्या या मानवी मेंदूतच मनुष्याचा आत्मा (मन) असतो. पण मनुष्याला स्वतःचा मेंदूही दिसत नाही व त्यात असलेला स्वतःचा आत्माही (मन) दिसत नाही. तीच गोष्ट  निसर्गाची! आपल्याला निसर्ग दिसतो म्हणजे निसर्गाचे शरीर दिसते पण त्या शरीरातील निसर्गाचा मेंदू दिसत नाही. निसर्गाचा मेंदूच दिसत नाही मग निसर्गाचा आत्मा (मन) कसा दिसणार? माझ्या तर्कानुसार विशाल निसर्गात कुठेतरी निसर्गाचा मेंदू सूक्ष्म स्वरूपात असणार व त्या मेंदूलाच वैज्ञानिक देवांश(गॉड पार्टिकल) म्हणत असणार. वैज्ञानिकांना एकदा का हा देवांश (निसर्गाचा मेंदू) सापडला की मग त्यांना त्यात परमात्मा (निसर्गाचा आत्मा) सापडेल. निसर्गाच्या अशा सूक्ष्म मेंदूला व त्यातील सूक्ष्म आत्म्याला ईश्वर म्हणावे काय? कारण तर्काने तेच निसर्गाचे उगमस्थान धरावे लागेल.

(३) हिंदू धर्मात निर्गुण निराकार परमेश्वराची व या परमेश्वरातून निर्माण झालेल्या ब्रम्हा, विष्णू व महेश या गुणसंपन्न व आकार असलेल्या तीन प्रमुख देवांची संकल्पना आहे. ब्रम्हाकडून निर्मिती, विष्णूकडून निर्मितीचे व्यवस्थापन व महेशाकडून त्या निर्मितीचा लय अशी या तीन देवांची कार्य संकल्पना हिंदू धर्मात आहे. तसेच काहीजण निर्गुण, निराकार परमेश्वराला शिव असे म्हणतात. ईश्वर सत्य है, सत्यही शिव है, शिवही सुंदर है असे एक गीतही सत्यम् शिवम् सुंदरम् या जुन्या हिंदी चित्रपटात आहे. याच शिव संकल्पनेचा संबंध मी तर्काने देवांश (गॉड पार्टिकल) या वैज्ञानिक संकल्पनेशी लावला.

(४) पण या निर्गुण, निराकार शिवाची म्हणजे देवांशाची आराधना, प्रार्थना कशी करायची हा पेच निर्माण झाला. कारण हिंदू धर्मात महेश देवालाच शिवशंकर किंवा महादेव म्हणतात. आता न दिसणाऱ्या निर्गुण, निराकार शिवाची आराधना, प्रार्थना करण्यासाठी मन एकाग्र करायला जावे तर पटकन सगुण व आकार असलेल्या शिवशंकराचीच प्रतिमा (इमेज) समोर येते. हे बहुतेक शिव या नाम साधर्म्यामुळे होत असावे. पण तसे होते हे खरे!

(५) शिवाची आराधना, प्रार्थना करताना "ओम् नमः शिवाय" असे म्हटले जाते. माझ्या मते ओम् म्हणजे शिवाचे अंग किंवा शरीर जे सगुण साकार आहे व त्यालाच निसर्ग, विश्व किंवा सृष्टी म्हणायला हरकत नसावी. आता आपले शरीर व मन हे त्या ओम् म्हणजे निसर्गाचाच भाग आहे. त्या भागाचेच माध्यम घेऊन शिव या निसर्गाच्या देवांशाला आस्तिक म्हणजे कृतज्ञ भावनेने नमः म्हणत नमस्कार करायचा व आध्यात्मिक म्हणजे आत्मिक एकरूपतेच्या
भावनेने शिवाय म्हणत एकरूप (ध्यानस्थ) व्हायचे व अशाप्रकारे शिवाची ध्यानधारणा करायची.

(६) पण प्रश्न असा आहे की शिवाची (मुस्लिम धर्माप्रमाणे अल्लाची किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणे गॉडची) आराधना, प्रार्थना केल्याने मनाला एक मोठा मानसिक आधार, मानसिक शांती मिळत असली तरी त्यातून आपल्या शरीराला वेदना देणाऱ्या कोरोनासारख्या विषाणूवर औषध मिळत नाही. म्हणजे मनाची आध्यात्मिक शांती हा शारीरिक व्याधीवर उपाय होऊ शकत नाही. देवावर श्रध्दा असलेल्या धर्माचा उपयोग थोडे नैराश्य दूर करण्यासाठी, मानसिक शांतीसाठी होत असला तरी शारीरिक व्याधीवर मात करण्यासाठी शेवटी निसर्गाच्या (शिवांगाच्या) विज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो.

(७) पण मग निसर्गाचे म्हणजे शिवांगाचे नियम वैज्ञानिक/नैसर्गिक व प्रत्यक्ष शिवाचे म्हणजे निसर्गाच्या मेंदूचे व त्या मेंदूतील निसर्गाच्या आत्म्याचे नियम धार्मिक/आध्यात्मिक हे कसे? दोन्ही गोष्टी या सारख्याच हव्यात ना! मानसिक शांतीचा संबंध धर्माशी असला तरी शारीरिक आरोग्याचा संबंध विज्ञानाशी असतो ना आणि म्हणून तर कायद्याला विज्ञान व धर्म या दोन्ही  गोष्टींचा एकत्र विचार करावा लागतो.

(८) माझ्या मते, शिव (परमात्मा), अल्ला किंवा गॉड या सर्व संकल्पना निसर्गाच्या मेंदूशी अर्थात देवांश (गॉड पार्टिकल) या वैज्ञानिक संकल्पनेशी जोडायला हव्यात व त्या देवांशाला निसर्गाचे उगमस्थान नाही तर निसर्गाचा राजा समजायला हवे, जसे आपण आपल्या मेंदूला आपल्या शरीराचा राजा म्हणतो.

(९) आपले शरीर व मेंदू यांच्या कार्यप्रणालीत काही फरक आहे का? मग शिव (परमात्मा), अल्ला, गॉड आणि निसर्गाच्या कार्यप्रणालीत कसा फरक असेल? म्हणून आता निसर्ग व देव व तसेच विज्ञान व धर्म यांना एकत्र करण्याची वेळ आली  आहे. निसर्गाचे नियम व देवाचे आदेश या दोन गोष्टी वेगळ्या नसून त्या एकच आहेत. "ओम् नमः शिवाय" या ध्यानधारणेच्या मंत्रात निसर्ग व देव एक होतो म्हणून मी तो मंत्र म्हणतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.६.२०२०


पोलीस आमचे संरक्षक मित्र, पण?

पोलीस आमचे संरक्षक मित्र, पण?

आमच्या घरी पोलीसांची खाणावळ होती. त्यात गिरणी कामगारही होते. त्यामुळे पोलीसांच्या व्यथा व त्रास मला माहित आहे. काही पोलीस तर माझे मित्र आहेत. पण ९९% पोलीस चांगले असले आणि १% पोलीसांनी वाईट वर्तन केले तर अख्खे पोलीस खाते बदनाम होते. या १% लोकांच्या चुका नको का उघड्या पाडायला? वाईट गोष्टी सगळीकडे आहेत. आमच्या वकिली व्यवसायात काय किंवा वैद्यकीय व्यवसायात काय अशा गोष्टी या असतातच व त्यांना चेक करण्यासाठी तर कायदा असतो. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. वाईट ते वाईटच. त्याला वाईट म्हटल्याने चांगले कधी खराब होत नसते. पोलीसांनी माझ्या पोस्टचा गैरसमज करून घेऊ नये. पोलीस व लष्कर हे आमचे संरक्षक आहेत व त्यांना आम्ही नेहमीच आदराने सलाम करतो. जय हिंद!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.६.२०२०

रविवार, २८ जून, २०२०

नवोदित वकील संघटना

फक्त कोर्टात बसून वकिली चालते काय?

(१) माझ्या फेसबुक खात्यावर बरीच वकील मंडळी आहेत. काही ज्येष्ठ वकील आहेत तर काही कनिष्ठ! आजची पोस्ट ज्येष्ठ वकिलांसाठी नाही तर कनिष्ठ वकिलांसाठी आहे. मी १९८८ साली मार्च महिन्यात जेंव्हा वकिली सुरू केली तो काळ व आताचा काळ यात खूप फरक पडला आहे. माझ्या काळात आजच्या सारखी अॉनलाईन वकिली नव्हती. त्यामुळे आजच्या तरूण वकिलांबरोबर मी माझा जुना अनुभव शेअर करावा की नको या विचारात होतो. कारण न्यायदानातही आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर सुरू झाल्याने जुने ते आता सोने राहिले नाही. जुनी गोष्ट म्हणजे कालबाह्य झालेली भंगार गोष्ट असा प्रकार झालाय.

(२)  नवोदित वकील माझ्या बाबतीत काय विचार करतील याचा नीट अंदाज न घेता मी हा लेख लिहित आहे. नवोदित वकील म्हणजे वकील किंवा न्यायाधीश घराण्यातून आलेली तरूण वकील मंडळी नव्हेत. त्यांना वकिलीचे बाळकडू घरातूनच मिळालेले असते. माझा रोख आहे तो म्हणजे माझ्यासारख्या गरीब कष्टकरी कुटुंबात जन्म घेऊन मोठ्या मेहनतीने वकील झालेल्या नवोदित वकिलांकडे. अशा गरीब घराण्यातील नवोदित वकिलांची आज परिस्थिती काय आहे याची मला नीट माहिती नाही. ती परिस्थिती बदललेली आहे की ती माझ्या काळासारखीच आजही तशीच आहे हे मला माहित नाही. मी वकील होऊन जवळच्या कोर्टात पहिल्या दिवशी गेलो तेंव्हा वकिलीचा कसलाच प्रत्यक्ष अनुभव नसलेला मी पार भांबावून गेलो होतो. डोक्यात कायद्याचे ज्ञान ताजेतवाने होते. पण मला कोर्टात कोणीही ओळखत नव्हते. बायकोने व मी दोघांनी मिळून खरेदी केलेला नवीन काळा कोट जुन्या बॕगेत घालून मी त्या कोर्टात गेलो व कोर्टाच्या दारातच कायद्याची पुस्तके विकणाऱ्याकडून वकिलाची ती पांढरी गळपट्टी विकत घेतली. मग बार रूमच्या एका कोपऱ्यात एक मोठा आरसा होता त्याच्यासमोर उभा राहून मी ती गळपट्टी कशीबशी गळ्याला बांधली व पांढऱ्या शर्टावर काळा कोट चढवून हळूच एका कोपऱ्यात जाऊन बसलो. माझ्याकडे बघून तिथली वकील मंडळी हा कोणीतरी नवखा वकील दिसतोय याचा अंदाज बांधून माझ्याकडे बघत होती. त्यावेळी मला मराठी चित्रपटातले "कुण्या गावाचं आलं पाखरू" हे गाणं आठवलं आणि मी आणखीनच घाबरून गेलो.

(३) सांगायचे काय की, मी कोर्टात दररोज बाररूममध्ये बसत होतो व न्यायदान कसे चालते हे बघण्यासाठी प्रत्यक्ष कोर्टातही बसत होतो. पण मला कायद्याची कामे मिळत नव्हती व एक पैसाही मिळत नव्हता. दररोज रूबाबात कोर्टात जायचो व हात हलवीत परत यायचो. असे आठ दिवस चालले. मग हळूहळू काही तरूण वकिलांबरोबर बोलून माहिती घ्यायला सुरूवात केली तर कळले की माझ्यासारखे कोर्टात येऊन संध्याकाळी हात हलवीत घरी परत जाणारे बरेच गरीब वकील तिथे आहेत. त्यांना विचारले की, ते दुसरे काही तरूण वकील कसे बिझी दिसतात तर कळले की ती मोठ्यांची पोरं होती. चांगले बस्तान बसलेली सिनियर वकील मंडळी मात्र जाडजूड ब्रिफ्स घेऊन कामात छान बिझी होती.

(४) एके दिवशी हिंमत करून एका सिनियर वकिलाला गाठून विचारले की, "सर मी खूप गरिबीतून वकील झालोय, पण इथे दररोज येऊन मला कसले काम नाही की पैसा नाही, घरी बायको गृहिणी आहे व मुलीला ज्यूनियर के.जी. शाळेत घातलेय, माझे कसे व्हायचे, मी तुमची पुस्तके उचलीन, तुमचे डिक्टेशन घेईन, कोर्टातल्या तारखा घेईन, तुम्ही मला महिन्याचा पगार नाही पण माझ्या कामाचा काही मोबदला पैशात द्याल का"? त्या सिनियर वकिलांना माझी काय दया आली कोण जाणे पण त्यांनी मला दरमहा ५०० रू. मोबदला देऊ केला. तुम्हीच हिशोब करा की १९८८ सालचे ५०० रू. म्हणजे आता २०२० सालचे किती होतील? अशाप्रकारे दरमहा ५०० रूपयावर माझी वकिली सुरू झाली. इतर नवीन वकील मंडळी मात्र त्या दिवसापासून माझ्यावर जळू लागली. हा मागून आला आणि त्या फटकळ सिनियर वकिलाला याने पटवलेच कसे याचे कदाचित त्यांना आश्चर्य वाटले असावे.

(५) आता मी माझ्या वकिलीचा पूर्ण इतिहास इथे सांगत बसत नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, कोर्ट सुरू होण्यापूर्वी सकाळचे दोन तास त्या सिनियर वकिलांच्या अॉफीसमध्ये काम करायचे, मग कोर्टात जवळजवळ सात तास त्या सिनियरच्या तारखा घेत फिरायचे व मग कोर्ट सुटल्यावर त्या सिनियरच्या अॉफिस मध्ये पुन्हा तीन तास काम करायचे, म्हणजे दररोज बारा तास काम करायचे. शनिवारी तर ते अॉफिस चालू असायचेच पण रविवारी सुध्दा ते सिनियर वकील मला सकाळी तीन तास त्यांच्या अॉफिसात बोलवायचे. एवढी प्रचंड मेहनत करून महिन्याच्या शेवटी ते सिनियर वकील माझ्या हातात ५०० रूपये टेकवायचे. ती तसली कंबरडे मोडणारी मेहनत मी नेटाने तीन महिने केली. त्या तीन महिन्याची कमाई १५०० रूपये. ते सर्व पैसे घरखर्चात संपलेच पण वर बायकोने १००० रूपये कर्ज करून ठेवले. काय करणार होती ती बिच्चारी तेवढ्या तुटपुंज्या उत्पन्नात?

(६) मला कळून चुकले की, ही असली वकिली नक्कीच आपल्याला भिकेला लावेल. मग मात्र  मी ठरवले की नुसते कोर्टात येऊन, सिनियर वकिलाची तळी उचलून काही आपले पोट भरणार नाही व संसारही चालणार नाही. मी बिनधास्त त्या सिनियर वकिलांना रामराम केला व कोर्टाच्या बाहेर जे मोठे जग आहे त्या जगात उडी घेऊन त्या तीन महिन्याच्या माझ्या वकिली प्रॕक्टिसचे सोने केले. निरनिराळ्या सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यांच्या प्रमुखांची मी धाडस करून प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनाही त्या सिनियर वकिलांना जसे खरे सांगितले तशीच   खरी परिस्थिती सांगितली आणि तिथून सुरू झाली माझी स्वतःची स्वतंत्र वकिली. कोणाचे कसलेही पाठबळ नाही, वकिलीतले मार्गदर्शन नाही, पण तरीही वकील म्हणून मी माझे उत्पन्न थोडे थोडे का असेना पण विविध ठिकाणाहून सुरू केले आणि माझे उत्पन्न दरमहा १५०० रूपये केले आणि तेही कोणत्याही सिनियर वकिलाची हाजी हाजी न करता. मी नुसता कोर्टातच जाऊन बसलो असतो तर मी माझा संसार करीत माझ्या मुलीला एम.बी.ए. पर्यंत शिकवू शकलो असतो का याबद्दल मी साशंक आहे.

(७) मी त्यावेळी लॉयर्स कलेक्टिव्ह कडून प्रेरणा घेऊन ज्यूनियर वकिलांची एक संघटना काढली होती व बार कौन्सिलला पत्र लिहून  प्रत्येक कंपनीत लिगल अॉडिट अनिवार्य करा, मग तिथे ज्यूनियर वकिलांना काम मिळेल वगैरे मागण्या केल्या होत्या. पण बार कौन्सिल कडून मला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. माझे तर आजही असे म्हणणे आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला २४ तास पोलीसांचे स्थानिक  कायदेशीर सल्लागार म्हणून वकिलांची नेमणूक करायला हवी म्हणजे केसला कलमे कोणती लावायची इथून सुरूवात होईल. वकिलांएवढे कायद्याचे सखोल ज्ञान पोलीसांना असू शकत नाही. आय.पी.एस. परीक्षा काय किंवा राज्य पोलीस परीक्षा काय ती म्हणजे एलएल. बी. ची पदवी नव्हे. सरकारी वकील (पी.पी.) कोर्टाचे कामकाज पाहतील व प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगळे वकील पोलीसांचे दैनंदिन कायदेशीर सल्लागार राहतील. ही सूचना चुकीची कशी यावर आजच्या सक्रिय वकिलांनी मार्गदर्शन करावे.

(८) आणखी एक सूचना मी मागे जाहीरपणे केली होती की, सार्वजनिक रूग्णालये २४ तास चालू असतात, पोलीस स्टेशन्स २४ तास चालू असतात, मग सार्वजनिक न्याय देणारी कोर्टस २४ तास का चालू ठेवीत नाहीत? साठलेल्या केसेसचा भराभर निपटारा होईल, तारीख पे तारीख ही गोष्ट कालबाह्य होईल व सगळ्या वकिलांनाही २४ तास काम मिळेल. पण माझी ही सूचना सरकारच्या पचनी पडेल काय?

(९) आता शेवटचा मुद्दा हा की, सार्वजनिक रूग्णालयातील शिकाऊ डॉक्टर्सना काहीतरी स्टायपेंड मिळतेय की नाही की ते डॉक्टर्स जनतेची फुकट सेवा करतात? मग न्यायदान ही सुध्दा वैद्यकीय सेवेइतकीच उदात्त सेवा आहे हे मान्य करून नवोदित वकिलांना न्यायालयाचे मदतनीस अशी नेमणूक करून त्यांना दरमहा स्टायपेंड देण्यात काय गैर आहे? ही योजना फक्त गरीब कुटुंबातून मोठ्या कष्टाने वकील झालेल्या नवोदित वकिलांसाठीच असावी. आजच्या नवोदित वकील मित्रांनो तुम्ही अॉनलॉईन वकिलीचे मास्टर्स होऊन छान कमाई करीत असाल तर माझ्या या सूचना केराच्या टोपलीत टाका. पण जर तुमची आर्थिक परिस्थिती माझ्या त्याच सुरूवातीच्या काळासारखी आजही असेल तर मग नवोदित वकिलांची स्वतंत्र संघटना निर्माण करून माझ्या या लेखातील सूचनांचा बार कौन्सिल, कायदा मंत्रालय, मुख्यमंत्री व आपले पंतप्रधान या सर्वांकडे नेटाने पाठपुरावा करा. मला त्याकाळी जे जमले नाही ते तुम्ही आता साध्य करून दाखवा.

(१०) पाच वर्षाखालील प्रॕक्टिस असलेल्या नवोदित वकिलांनी राज्य स्तरावरच नव्हे तर देशपातळीवर अशी स्वतंत्र संघटना बांधावी कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांनी तसे करू नये असे जर प्रत्येक कोर्टाच्या बार असोसिएशला वाटत असेल तर सर्व बार असोसिएशनचे राज्य व देश पातळीवर एक फेडरेशन निर्माण व्हावे व या फेडरेशनने नवोदित वकिलांचा प्रश्न हातात घेऊन तो तातडीने सोडवावा. माझा हा लेख जर तुम्हा वकिलांना आवडला असेल तर या लेखाची छायाचित्रे घेऊन किंवा छापील प्रती काढून तुम्ही तुमच्या लेटरहेड वरून त्या प्रती बार कौन्सिल व सरकारकडे पाठवू शकता.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.६.२०२०

मन मोकळे करा!

मन मोकळे करा!

(१) झाकली मूठ सव्वा लाखाची अशी एक म्हण आहे. पण किती काळ तुम्ही मूठ झाकून ठेवणार? मनाची तगमग सुरू झाली, काही सुचेनासे झाले, परिस्थिती गंभीर झाली की आतल्या आत कुढत बसू नका. बिनधास्त मन मोकळे करा. काही लोक चेष्टा करतील तर करू द्या. तुमची वाईट वेळच तुमचे कोण हे सिद्ध करते. जे लोक तुमचे नसतात तेच तुमची चेष्टा करणार, तुम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या वाईट परिस्थितीत तुमची चेष्टा करणारी अशी वाईट माणसे तांदळातल्या खड्यासारखी बाजूला काढा आणि त्यांना लांब गटारात फेकून द्या. अशा माणसांसाठी तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक गटार तयार ठेवा जिथे अशा माणसांची रवानगी करता येईल. थोडक्यात अशा माणसांना तुमच्या आयुष्यातून कायमचे ब्लॉक करा. पुढे डोक्याला ताप नको. अशा चाळणीतून तुमच्यावर खास प्रेम करणारी माणसे नक्की पुढे येतील जी तुम्हाला आर्थिक नसला तरी मानसिक आधार नक्की देतील.

(२) आता गंमत बघा! माझी बायको, मी माझ्या पैशाने तिच्यासाठी केलेले मंगळसूत्र, कठीण प्रसंगी ते मोडण्यासाठी ती मला सांगते, आम्ही मंगळसूत्र मोडल्यावर कर्ज फिटले या आनंदात राहतोय आणि हे माहित नसलेल्या काही महाभागांना माझ्या बायकोचा कळवळा येतोय. म्हणे मी लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी अशी वैयक्तिक पोस्ट लिहिली. बायकोला हा किस्सा सांगितल्यावर तिने तर डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली की, असेही लोक फेसबुकवर असतात काय आणि ते स्वतःला तुमचे मित्र म्हणवतात. अहो तुम्ही अशा लोकांना ताबडतोब ब्लॉक करून का टाकत नाहीत. कशाला डोक्याला उगाच ताप करून घेता?

(३) आजच एका फेसबुक मित्राचा मला माझ्या व्हॉटसअपवर मेसेज आला. मेसेज काय हे त्या मित्राचे नाव गुप्त ठेऊन सांगतो. "साहेब, खूप बिकट परिस्थिती आलीय, तुमच्याजवळ मन मोकळे केले की बरे वाटते म्हणून सांगतोय. मला काल हे करायचे होते पण करता आले नाही"! कोण आहेत ही माणसे? का वाटतो त्यांना माझा विश्वास! फेसबुकचे जग म्हणे आभासी जग! अरे कोण म्हणते हे आभासी जग? या फेसबुकवर पण जिवंत माणसे आहेत. त्यांनाही मने आहेत. पण खुली होऊ शकत नाहीत. कारण याच फेसबुकवर काही लबाड, ढोंगी मंडळीही आहेत. ही माणसे आभासी जीवन जगत असतात. खोट्या प्रतिष्ठेचे यांना वेड असते. अशा माणसांनी फेसबुकला आभासी जग बनवलेय. मी माझे स्वतःचे सत्य कोणाची पर्वा न करता याच फेसबुकवर उघड केले व आभासी जगाचे रूपांतर सत्य जगात केले. तेंव्हा कुठे मला खरी माणसे याच फेसबुकवर भेटली. याच फेसबुक ने मला मनसे पक्षात बाळूकाका म्हणून ओळख मिळवून दिली. कित्येक मनसैनिक वैयक्तिक पातळीवर माझ्या जवळ आले आणि माझे मित्र  झाले. इतरही लोक माझ्या जवळ आले.

(४) कोणाला जर माझे बिनधास्त मनमोकळे लिखाण आवडत नसेल किंवा पटत नसेल तर त्यांनी मला लगेच ब्लॉक करावे, पण उगाच करायच्या म्हणून काहीतरी कमेंटस करीत बसू नये. त्यांना उत्तर देत बसायचे, वाद वाढवायचा या गोष्टी मला आता ६४ व्या वयात करायच्या नाहीत. मी काय लिहितो, माझी जीवनशैली कशी आहे, माझी विचारधारा काय आहे हे कळायला जास्तीतजास्त माझ्या पाच पोस्टस पुरेशा आहेत. त्याचा एकदा अंदाज आला व त्या गोष्टी पटूच शकत नाही हे एकदा का कळले की मग लांबण लावायची गरजच काय? उगाच वेळ व शक्ती कशाला वाया घालवायची बरे! पटकन मला ब्लॉक करून टाकणे हेच चांगले की नाही. माझे लिखाण ज्यांना आवडते तेच माझ्या बरोबर राहतील ना!

(५) आता एवढे तिखट लिहिण्याचे कारण म्हणजे इथे माणसांचा जीव चाललाय, काही लोक नैराश्येतून आत्महत्या करताहेत आणि मी माझे सत्य लिहून "घाबरू नका, मी लढतोय, तुम्ही पण लढा, आज मंगळसूत्र होते म्हणून मोडले, उद्या नाही म्हणून रडत बसणार नाही, मी वकील आहे वगैरेची बिलकुल पर्वा न करता पोटासाठी याही वयात हातगाडी चालवीन, अंग मेहनतीचे काम करीन पण आत्महत्येचा जराही विचार मनात येऊ देणार नाही, खड्ड्यात गेली ती प्रतिष्ठा, जगणे महत्वाचे" असे सांगून, लिहून आपण सर्वजण एकाच बोटीतून प्रवास करीत आहोत, आपण सर्वच जण समदुःखी आहोत, असा सकारात्मक संदेश देतोय. पण ही गोष्ट समजून न घेता काही महाभाग मी लोकांना माझ्या पोस्टसमधून नकारात्मक संदेश देतोय असे मलाच उलट शिकवत आहेत.

(६) माझे हे असे जाहीरपणे मन मोकळे करणे काही लोकांना आवडत नाही. अशी काही माणसे मलाच सुनावतात की मी माझ्या दुःखाचे जाहीर प्रदर्शन करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतोय. काय विचित्र बुद्धी आहे यांची! एखाद्या माणसाचे आयुष्य माहित नाही, त्याने आयुष्यात काय खस्ता खाल्ल्यात हे माहित नाही आणि तरीपण त्या माणसाच्या काही पोस्टसवरून त्या पोस्टसचा अर्थ नीट समजून न घेता खुशाल स्वतःचे जजमेंट काढून त्याच्या उभ्या आयुष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचे व त्या माणसाचा पुरता निकाल लावायचा या मानसिकतेला काय म्हणावे? मित्रांनो, मोकळे व्हा म्हणजे वाईट व चांगली माणसे कळतील!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.६.२०२०

शनिवार, २७ जून, २०२०

कोरोनील औषध चाचणी!

रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाची चाचणी करा!

मी वैद्यक शास्त्रातील कोणत्या पॕथीचा समर्थक नाही जसा मी तत्त्वज्ञानातील कोणत्या लॉजीचा समर्थक नाही. कारण कोणतीही पॕथी किंवा लॉजी परिपूर्ण नाही. हे तर जगातील सार्वत्रिक सत्य आहे. मग वैद्यक शास्त्रात ॲलोपॕथीचाच एवढा उदो उदो का? ही ॲलोपॕथी जर एवढी परफेक्ट असती तर तिला कोरोनावर लस शोधून काढायला एवढा वेळ लागलाच नसता. भारतीय वैद्यक शास्त्राचा मूलाधार आयुर्वेद आहे. पण इंग्रज आले आणि त्यांनी नुसत्या आयुर्वेदालाच नाही तर भारतीय संस्कृतीलाच इंग्रजाळून टाकले. या परकीय लोकांनी इथे भारतात ज्या सुखसोयी निर्माण केल्या (ज्याचा काही लोक खूप उदो उदो करतात) त्या त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी निर्माण केल्या. त्यामागे हाच विचार होता की ते जणूकाही भारतात कायम राज्य करणार आहेत. इंग्रज लोकांनी नुसत्या भारतीय साधनसंपत्तीचीच लयलूट केली नाही तर प्राचीन भारतीय शास्त्रांचीही, त्या ज्ञानाचीही लयलूट केली. आयुर्वेदीय ग्रंथ इंग्रजांनी नुसते चाळले नाहीत तर पळवले सुध्दा नसतील का? त्यातील ज्ञान त्यांनी चोरले नसेल का? तेच ज्ञान नव्या स्वरूपात म्हणजे ॲलोपॕथी, होमिओपॕथी मध्ये त्यांनी रूपांतरीत केले नसेल का? इथली बहुसंख्य भारतीय जनता पूर्वीपासून अडाणी ठेवली गेली. भारतातील काही विशिष्ट उच्च वर्गाने खरे ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचू दिले नाही. तेच काम इंग्रजांनीही इथल्या विशिष्ट वर्गाला हाताशी धरून केले नसेल का? म्हणून तर इंग्रज निघून गेल्यावरही भारतात आयुर्वेदात प्रगती झाली नाही. इंग्रजांनी आयुर्वेदाच्या चिंध्या केल्यावर भारतात शिल्लक राहिलेले आयुर्वेदाचे ज्ञान हे कच्च्या स्वरूपातच राहिले असावे. भारतीयांना इंग्रजाळून टाकल्यावर हेच इंग्रज जे अमेरिकेतही पोहोचले होते त्यांनी ॲलोपॕथीला पुढे आणले. कच्चा माल शुध्द (रिफाईन्ड) करून नवीन स्वरूपात आणला की नुसता चकाकतच नाही तर अधिक गुणकारी होतो. म्हणून रिफाईन्ड ॲलोपॕथी जगाने डोक्यावर घेतली. तिच्यातून ॲलोपॕथीची औषधनिर्मिती करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या निर्माण झाल्या व त्या जगभर सुसाट फोफावल्या. याच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अंतर्गत हितसंबंध जगातील रोगराईच्या निर्मूलनात व त्यातून भरपूर श्रीमंत होण्यात गुंतलेले आहेत. रामदेव बाबांनी कोरोना विषाणूवरील कोरोनील औषध निर्माण करताना वैद्यकीय संशोधन चाचणी प्रक्रियेचे काही तांत्रिक नियम पाळले नसतीलही (नक्की माहित नाही) पण ते जर एवढे ठामपणे या औषधाचा दावा करीत आहेत तर मग आयुर्वेद संशोधन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारा भारत सरकारचा जो आयुष विभाग आहे त्याने रामदेव बाबाचे हे कोरोनील औषध ताब्यात घेऊन स्वतः त्यावर चाचणी का करू नये? ती यशस्वी झाली तर जगात भारताचे केवढे नाव होईल! आणि समजा चाचणी अयशस्वी झाली तर त्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे? आपली मागची चांद्रयान मोहीम फसली म्हणून जगाने आपली चेष्टा केली काय? उलट आपल्या प्रयत्नांना त्यांनी दादच दिली ना! मग रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाचे फार तर तसे होईल. पण प्रयत्नच करायचे नाहीत व प्रयत्न करणाऱ्याची चेष्टा करायची ही कोणती मानसिकता? एक फोटो समाजमाध्यमावर फिरतोय त्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पसाहेब हे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना भेटायला येतात तेंव्हा पहिला प्रश्न विचारतात की "कुठे आहेत रामदेव बाबा"? या फोटोतून आपण जगात आपलेच हसे करून घेतोय की नाही? अहो, या कोरोना काळात राजकारण थोडे बाजूला ठेऊन गांभीर्याने वागा ना! रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाची पूर्ण वैद्यकीय चाचणी होऊन त्याचे निष्कर्ष बाहेर आलेच पाहिजेत. आयुर्वेदाला ॲलोपॕथीशी स्पर्धा करण्याची संधी मिळालीच पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.६.२०२०

शुक्रवार, २६ जून, २०२०

२७ जून वाढदिवस!

६४ व्या वयात पदार्पण करताना!

(१) आज २७ जून, २०२० माझा ६३ वा वाढदिवस. म्हणजे मी माझ्या आयुष्याची ६३ वर्षे पूर्ण करून ६४ व्या वर्षात पदार्पण केले. मी जर मोठा साधुसंत वगैरे झालो असतो तर लोकांनी माझा वाढदिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला असता. पण मला आयुष्यात ना साधुगिरी जमली ना गांधीगिरी ना दादागिरी! मी एक तुम्हा सर्वांसारखाच एक सर्वसामान्य माणूस! म्हणून तर मला सरळसाध्या जीवनाचा मस्त, मनमुराद आनंद घेता आला आणि तीच माझी आयुष्याची मजा!

(२) मला वकिलीत जास्त पैसे कमावता आले नाहीत व मग कमी पैशात वृध्दापकाळासाठी बचतही करता आली नाही. जेवढे पैसे कमावले तेवढे संसारात खर्च केले. कधी वाटलेच नव्हते की वृध्दापकाळात कोरोना सारखा बिकट काळ येईल व आपली पुंगी ताईट करील. म्हणून तर मी मेडिक्लेम सुध्दा काढला नाही. माझा एक सरळसाधा हिशोब की, मी किंवा माझी बायको आजारी पडलो तर मग सरळ के.ई.एम. किंवा जे.जे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणे तिथेच मरायचे. माझे आईवडील पण तिथेच मेलेत. पण माझ्या विवाहित लेकीला माझे हे असले वागणे जराही पसंत नाही. ती सारखी आम्हा नवरा बायकोच्या मागे मेडीक्लेम काढा म्हणून मागे लागलीय. एम.बी.ए. होऊन ती मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदावर आहे व त्याच दर्जाच्या मोठ्या कुटुंबात तिचा विवाह झाल्याने माझे हे असले वागणे तिला बिलकुल पसंत नाही. तिने मला आज फोनवरून सरळ सांगून टाकले की आमच्या दोघांचा मेडीक्लेम ती  काढणार म्हणजे काढणारच व त्याचे हप्तेही तीच भरणार. "तुम्ही नेहमी स्वतःचे खरे करीत आलात, आता यापुढे तुम्हाला माझे ऐकावेच लागेल" असे तिने मला फोनवरून बजावले. एकुलती एक मुलगी ती! माझ्या इच्छेप्रमाणे  उच्च शिक्षण घेऊन एम.बी.ए. झाली, करियर मध्ये मोठे यश मिळवले, तसेच छान जोडीदार मिळवला, मग आता तिचे थोडे ऐकलेच पाहिजे म्हणून मी मेडीक्लेमला तयार झालोय. पण मी इकडे काल माझ्या बायकोचे म्हणजे तिच्या आईचे मंगळसूत्र गुपचूप मोडून लॉकडाऊन काळात झालेले बाहेरचे कर्ज फेडलेय हे तिला आईकडून कळले तेंव्हा तिला खूपच वाईट वाटले. "माझे लग्न झाले असले तरी काय झाले, मी तुमचा मुलगाच आहे ना, मग तुम्ही मला पैसे मागायला संकोच का केला, कसला असला स्वाभिमान घेऊन बसलात स्वतःच्या मुलीबरोबर"! असे बरेच काही फोनवरून बोलून तिने आम्हा दोघांनाही निरूत्तर केले. मी जरी बचत करू शकलो नाही तरी मुलीचे हे शब्द म्हणजे मी माझ्या आयुष्यात मिळवलेली खूप मोठी संपत्ती आहे हेच सांगून जातात.

(३) गेल्या ६३ वर्षांच्या काळात माझ्या नुसत्या उच्च शिक्षणानेच नाही तर अनेक प्रकारच्या बऱ्या वाईट अनुभवांनी मला खूप काही शिकवले. नैराश्य आले तरी त्यावर मी माझ्या सकारात्मक विचारांनी मात केली. यात मला माझी बायको, मुलगी, नातेवाईक, काही मोजके मित्र यांनीच नव्हे तर माझ्या काही क्लायंटसनीही खूप मोठी साथ दिली. म्हणून तर बायको गृहिणी, वकिली क्षेत्रात आमचे कोणी आईवडील, बहीण भाऊ नसल्यामुळे या क्षेत्राच्या अंतर्भागाचे ज्ञान शून्य असताना व पिढीजात कौटुंबिक गरिबी असतानाही मी या आव्हानात्मक क्षेत्रात तग धरून राहू शकलो व साधा का असेना पण संसारही करू शकलो.

(४) आयुष्याच्या या अंतिम वळणावर पुन्हा कोरोना महामारीने खूप काही शिकवले. या कोरोना महामारीने जगात सर्वांपुढेच मोठे आव्हान निर्माण केले आहे. मग त्यातून माझी कशी सुटका होणार? मीही त्यात सापडलोय. पण तरीही नैराश्यावर मात करण्यात यशस्वी झालोय. माझे हे तिसरे फेसबुक खाते आहे. पहिल्या दोन खात्यांवर मी दररोज फेसबुक मित्रांचे वाढदिवस बघून त्यांना न चुकता दररोज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतो. पण मित्र संख्या वाढत गेली की मग ते दररोज शुभेच्छा देणे जमेनासे झाले. आता या तिसऱ्या फेसबुक खात्यावर मी कोणाचेही वाढदिवस बघत नाही आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही. कधीतरी चुकून होम पेजवर कोणाचा तरी वाढदिवस आहे हे कळले की मग तिथेच कमेंट मध्ये त्याला किंवा तिला शुभेच्छा देऊन मोकळा होतो. लग्नाच्या वाढदिवसांचेही तसेच झालेय. पण माझ्याकडून असे वर्तन घडत असतानाही आज मला फेसबुक मित्रांनी माझ्या खात्यावर व इनबॉक्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आणि मला लाजवले. कशा घेऊ मी तुमच्या शुभेच्छा? सद्याचा काळ तर कोरोना विषाणूच्या भीतीचा व कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूचा आहे. म्हणजे वाढदिवस बाजूला ठेवून दररोज आठवणींचा स्मृतिदिन करायचा हा काळ! आपण सर्वच जण सद्या फार बिकट परिस्थितीतून जात आहोत. काही लोकांची आर्थिक परिस्थिती तर खूपच नाजूक झाली आहे. काही घरांत उपासमार चालू आहे. अशा परिस्थितीत तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करणे मला जड जातेय. तरीही तुम्ही एवढया प्रेमाने मला शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणून तुमचे खूप खूप आभार व मनस्वी धन्यवाद!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.६.२०२०


गुरुवार, २५ जून, २०२०

पुस्तके रद्दीत!

माझ्या पुस्तकांची जागा आता रद्दीत!

विविध विषयांवरील हजारो पुस्तके जमवली, वाचली व शेवटी रद्दीत देऊन टाकली. आता घरात साठलेल्या पुस्तकांची आणखी रद्दी बाहेर काढण्याच्या विचारात आहे. या सर्व पुस्तकांची जागा आता रद्दीतच! एक कोरोना विषाणू जगाला खेळवतोय, नाचवतोय, पण त्याला रोखण्याचा मंत्र किंवा तंत्र जर एकाही पुस्तकात नसेल तर काय करायची ही खंडीभर पुस्तके जवळ ठेवून? मुंबईच्या लोकल्स म्हणे १२ अॉगष्ट पर्यंत बंद ठेवणार! कोणी काढला हा १२ अॉगष्टचा मुहूर्त? मार्च २०२० पासून बंद  ठेवलेल्या लोकल्स आता अॉगष्ट २०२० च्या मुहूर्ताची वाट बघत बसणार. जवळजवळ सहा महिने मुंबईचे व्यवहार ठप्प! सरकारने काय सहा महिने लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू फुकट पुरवल्यात? काय नियोजन आहे या लॉकडाऊनचे हे त्या सरकारमध्ये बसून बंदचे आदेशांवर आदेश काढणाऱ्या मंत्र्यांना व अधिकाऱ्यांनाच ठाऊक! सहा महिने नोकरी, धंदा, व्यवसायाशिवाय घरी बसून रहायचे! बापरे, हे काय चाललंय? घरी रहा, कोरोना पासून सुरक्षित रहा आणि उपासमारीने घरातच सुरक्षित मरा, असाच याचा अर्थ होतो ना! सरकारकडे लोकांना जगवण्यासाठी ना अन्न ना लोकांना वाचवण्यासाठी कोरोनाचे औषध, मग कोणत्या आशेने या सरकारकडे बघत रहायचे? मी फक्त महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार विषयीच हे बोलत नाही. जगातील सरकार नावाच्या संपूर्ण व्यवस्थेविषयीच मी हे हतबल मनाने बोलत आहे. कोरोनासारखा एक विषाणू जर जगाला इतका हतबल करू शकतो तर मग मनुष्याच्या इतर प्रगतीला काय अर्थ उरतो? कोरोनाची ही गोष्ट खरोखरच चमत्कारिक आहे! बिहारमध्ये ८० च्या वर लोक वीज पडून मेले अशी बातमी आलीय. मरणाचे संकट जर असे सगळ्या मार्गांनी येत असेल तर मग कोरोनाला घाबरून घरी किती दिवस बसवणार सरकार उपाशी लोकांना? ज्या पुस्तकांवर मी आयुष्यभर जिवापाड प्रेम केले ती सर्व पुस्तके अगदी देवधर्माची पुस्तके सुध्दा आता कोरोना महामारीने रद्दीत जाणार यात बरेच काही आले!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.६.२०२०

बुधवार, २४ जून, २०२०

अडगळ!

अडगळ!

बाळा गाऊ कशी अंगाई या १९७७ सालच्या मराठी चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले व आशा काळे यांच्यावर चित्रित झालेले "संसार मांडते मी" हे गाणे मला फार आवडते. लग्न झाल्यावर मग नवरा बायकोचा संसार सुरू होतो व त्यानंतर घर घेण्यापासून त्या घरात संसाराला लागणाऱ्या एकेक वस्तू आणण्यास सुरूवात होते. त्या संसारोपयोगी वस्तू खरेदी करून घरात आणताना नवरा व बायकोची एकमेकांबरोबर भावनिक जवळीक निर्माण होत असताना त्या वस्तूंबरोबर सुध्दा भावनिक जवळीक निर्माण होत असते. त्या वस्तूंची घरात योग्य ठिकाणी नीट मांडणी करीत असताना नवऱ्यापेक्षा बायकोची लगबग खूप मोठी असते. नवरा बायकोचे वय वाढत जाते तसे त्यांच्या संसाराचेही वय वाढत जाते. मग हळूहळू सुरूवातीला हौसेने आणलेल्या घरातील संसारोपयोगी वस्तू जुन्या होत जातात. पण वय वाढल्याने जशी नवरा बायकोतील भावनिक जवळीक घट्ट होत जाते तशी त्या दोघांची संसारासाठी दोघांनी मिळून घरात आणलेल्या वस्तूंशीही भावनिक जवळीक घट्ट होत जाते. पण पुढे मुले मोठी होतात. चांगली कमावती होतात. मग त्यांना घरात नवीन बदल करण्याची इच्छा होते. कारण त्यांच्या तरूण रक्ताला नाविन्याची ओढ असते. मग ती मुले आईवडिलांना म्हणतात की, "घरातील वस्तू आता खूप जुन्या झाल्यात, आम्ही आमच्या खर्चाने नवीन आणतो, घराच्या लाद्या जुन्या स्टाईलच्या खडबडीत आहेत, आम्ही आमच्या खर्चाने नवीन चकचकीत लाद्या बसवतो". खरं तर या गोष्टी वृध्द झालेल्या नवरा बायकोला पटत नाहीत. एकेक वस्तू गोळा करताना त्यांनी स्वतःचा जीव त्यात ओतलेला असतो आणि आता ही मुले त्यांच्या या सर्व गोष्टी भंगारात काढायला निघालेली असतात. एकांत मिळाला की मग अशी नवरा बायको हळूच कुजबुजतात "या मुलांना आपण संसारासाठी खरेदी केलेल्या वस्तू आता जुनाट वाटू लागल्यात, आता त्यांना या वस्तूंची अडगळ वाटू लागलीय, काय जाणो उद्या आपलीही यांना अडगळ वाटेल"! मग माझ्यासारखा कडक बाप कडाडतो "काही गरज नाही नवीन वस्तूंची, नवीन लाद्यांची, त्या गुळगुळीत लाद्यांवर म्हातारपणी घसरून पडून आम्हाला आमचे हातपाय मोडून घ्यायचे नाहीत कोणाला काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःची घरे घेऊन त्या घरांत करावेत, आमचे हे घर आमच्या वस्तूं सह आहे तसेच राहूद्या"! वृध्द बायकोला तिच्या वृध्द नवऱ्याचा कडकपणा मनातून सुखावतो. पण तिकडून मुलांची मने दुखावली गेली म्हणून ती माऊली आतून रडतही असते. हे उदाहरण आहे माझ्या वडिलांचे व माझ्या आईचे! मी कमावता झाल्यावर असेच काही बदल वरळी बी.डी.डी. चाळीतल्या छोट्या घरात करायला घेतले होते तेंव्हा माझे वडील माझ्यावर असेच कडाडले होते. मी कर्जाच्या हप्त्यावर घरात ब्लॕक अँड व्हाईट टी.व्ही. आणायचे ठरवले तेंव्हा वडील माझ्यावर खूप भडकले होते. आमच्या घरात फार जुनी लोखंडी खाट होती. ती खूप मजबूत होती. माझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी ती आणली होती. तिला ते अधूनमधून हिरवा अॉईल पेंट द्यायचे. ती खाट ठेवायला त्यांनी सुताराकडून जाडजूड चार मोठे ठोकळे तयार करून घेतले होते. त्या ठोकळ्यांवर ती लोखंडी खाट ठेवल्याने तिची उंची वाढवली गेली होती जेणेकरून घरातील पेट्या, बिछाने वगैरे सामान त्या खाटेखाली ठेवता येईल. घरात कोण पाहुणे मंडळी आली तर त्यांना ते सामान दिसू नये म्हणून आईने त्या खाटेच्या मापाचा एक पडदा शिवून घेतला होता व त्या खाटेला लावला होता. माझ्या आईवडिलांचा त्या जुन्या  लोखंडी खाटेवर फार जीव होतो. ती लोखंडी  खाट होतीच तशी मजबूत! तसेच मी व आई दोघांनी मिळून नळबाजारातून (त्याला मुंबईत चोर बाजार म्हणतात) एक मस्त लाकडी कपाट आणले होते. त्या कपाटाला पुढून मोठी उभी काच होती. त्या काचेत बघून घरातील आम्हा  सगळ्यांचे भांग काढणे व्हायचे. त्या कपाटाला छान कप्पे होते. ते कप्पे आम्ही बहीण भावांनी वाटून घेतले होते. त्यांचा उपयोग प्रत्येकाचे कपडे व शाळेतील पुस्तके ठेवण्यासाठी केला जायचा. माझ्या ठराविक दोन कप्प्यांना कोणी हात लावला की मी घरात जाम चिडायचो. मग आई मला शांत करायची. अधूनमधून माझे वडीलही ओरडायचे "त्या बाळूच्या कप्प्यांना हात का लावता तुम्ही" असे माझ्या बाजूने बोलायचे. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या त्या जुन्या वस्तू वरळीच्या त्या जुन्या घरासह शेवट पर्यंत जपल्या. पण २००९ साली वडील वारले. घराच्या वाटण्या चार भावंडात करायचे ठरले. आणि मग त्या घरातील तो संसार विस्कटला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर संसारातील त्या जुन्या वस्तूंची आता विल्हेवाट लागणार म्हणून माझ्या  आईची तळमळ तिच्या डोळ्यांत मला दिसत होती. "नवरा गेला, उभा संसार मोडला, बाबांनो आता तुम्हाला काय करायचे ते करा, माझा नवरा जिवंत असता तर तुमच्या एकाचेही त्याने काही चालू दिले नसते, आता मी एकटी पडलेय माझे काय चालणार" असेच भाव मला माझ्या आईच्या डोळ्यांत दिसत होते. पण माझाही नाइलाज होता. मीच पुढाकार घेतला आणि चार भावंडात त्या चार वाटण्या केल्या. कारण मला चार भांवडांत पुढे जराही वाद वाढू द्यायचे नव्हते. सर्व भांवडांची व माझ्या आईची संमती  घेऊनच मी त्या चार वाटण्या केल्या. पण त्या वाटणीने सगळ्यांचीच मने दुखावणारी एक गोष्ट झाली आणि ती म्हणजे माझ्या आईचा जीव तिच्या नवऱ्याच्या ज्या घरात होता, त्या घरात संसारासाठी तिने जमवलेल्या ज्या जुन्या वस्तूंत होता, त्या सगळ्याच गोष्टी उध्वस्त झाल्या. माझ्या आईने तिच्या नवऱ्याबरोबर (माझ्या वडिलांबरोबर) मांडलेला संसार अशा रितीने मोडला गेला. तिने संसार मांडला आणि शेवटी नवऱ्याच्या (माझ्या वडिलांच्या) मृत्यूने तो मोडला! म्हणून "संसार मांडते मी" हे गाणे मला खूप भावूक करते. आता इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. आम्ही नवरा बायको आता वृध्द झालो आहोत. आम्ही संसारासाठी जमवलेल्या वस्तूंही आमच्या घरासह आता जुन्या झाल्यात. माझी आर्थिक आवक कमी झालीय. मुलगी लग्न होऊन सासरी गेलीय. मुलगी कसली आमचा तो मुलगाच आहे. मग आमची ही मुलगी कधीतरी आमचे जुने घर नव्याने सजवू असे म्हणेल, त्यासाठी ती तिचा पैसाही स्वखुशीने देऊ करील. पण मी ते होऊ देणार नाही. माझ्या वडिलांसारखाच मी स्वाभिमानी आहे. मुलीचे पैसे घ्यायचे तर नाहीतच पण आम्ही नवरा बायकोने संसारात जमवलेल्या वस्तू त्या जुन्या झाल्या म्हणून आम्ही जिवंत असताना भंगारात जाऊ देणे आम्हाला आवडणार नाही. जुन्या झाल्या तरी त्या व्यवस्थित काम देतात ना हे महत्वाचे! आमच्या दोघांचेही हृदय या घरात, या जुन्या वस्तूंत गुंतलेले आहे. मग आम्हाला त्यांची अडगळ कशी वाटेल? जेंव्हा आमच्या दोघांपैकी एकजण अगोदर वर जाईल तेंव्हा आमचा संसार मोडेल. मग घर काय व त्या घरात संसारासाठी आम्ही गोळा केलेल्या वस्तू काय, मागे राहणाऱ्या आमच्या पैकी एकाला त्याचे काहीच वाटणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी! मांडलेला संसार पुढे निसर्गाकडून मोडलाही जातो हे सत्य कटू असले तरी ते स्वीकारावेच लागणार!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.६.२०२०

Religious Differentia!

RELIGIOUS DIFFERENTIA!

All religions seem to have been outcome of regional influences. The territorial diversity seems to have been responsible for widespread religious diversity all over world and hence no religion from among all religions is found to be universal truth of whole world. Followers of each religion try to praise their own religion and criticize other religions thereby creating religious hatred and enmity all over world. If God is one for all, how could he allow this?

-Adv.B.S.More©25.6.2020

देवांश!

देवांश (गॉड पार्टिकल)!

(१) देवांश (गॉड पार्टिकल) ही अशी तर्कशुद्ध संकल्पना आहे की तिच्यावर वैज्ञानिकांचा अभ्यास सुरू आहे. तिची सत्य, असत्यता पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग केले गेले, पण त्यात वैज्ञानिकांना अपयश आले. वैज्ञानिकांना देवांश (गॉड पार्टिकल) शोधण्यात आलेले अपयश म्हणजे निसर्गात देवांश नाहीच असे अनुमान काढणे हे पूर्णतया चुकीचे! या मुद्यावर नास्तिकांशी माझे कायम मतभेद राहतील.

(२) माझ्या वैयक्तिक संकल्पनेतून निसर्ग म्हणा, विश्व म्हणा नाहीतर सृष्टी म्हणा ते एक विशाल शरीर आहे. पण या शरीराला कुठेतरी केंद्रबिंदू आहेच या मतावर मी ठाम आहे. तो केंद्रबिंदू निश्चितच अतिसूक्ष्म आहे. तोच देवांश (इंग्रजीत गॉड पार्टिकल)! निसर्गाचा हा केंद्रबिंदू म्हणजे देवांश हे एक भौतिक अणुकेंद्र, रासायनिक शक्तीकेंद्र व मानसिक क्रियाकेंद्र आहे. अर्थात भौतिक, रासायनिक व मानसिक असे देवांशाचे तीन भाग आहेत.

(३) यातील मानसिक भाग हा भौतिक वासना, आध्यात्मिक भावना व बुद्धी या तीन गोष्टींनी युक्त आहे. देवांशाचा मानसिक भाग हाच निसर्गाला क्रियाशील ठेवणारा प्रमुख भाग आहे. पण या मानसिक भागातील जो बुद्धीचा भाग आहे तो भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या फक्त दोनच मानसिक गोष्टींवर नव्हे तर भौतिक वस्तुमान असलेले विविध अणू व रासायनिक शक्ती तथा गुणधर्म असलेली विविध द्रव्ये या इतर दोन शारीरिक गोष्टींवरही लक्ष ठेऊन या सर्वच मानसिक व शारीरिक गोष्टींना नैसर्गिक हालचाल करण्यास उद्युक्त करतो व त्या हालचाली नियंत्रित करतो.

(४) देवांशाबद्दलचा माझा हा तर्क अंधश्रध्द नसून तो वैज्ञानिक आहे यावर मी ठाम आहे. निसर्गातील देवांश (गॉड पार्टिकल) शोधण्याचे वैज्ञानिक कार्य पुढे कित्येक हजारो वर्षे चालूच राहील. या देवांशाचा वैज्ञानिक शोध लागेपर्यंत मानव जगातील अनेक धर्म या देवांशाबद्दल अनेक कल्पना करतील ज्या कल्पनांना अनेक अंधश्रध्दा चिकटून राहतील.

(५) मी या देवांशालाच देव म्हणतो. मानतो नाही तर त्याचे निसर्गात अस्तित्व आहे म्हणून म्हणतो. या देवापुढे नतमस्तक होण्याची माझी आस्तिकता व या देवाशी एकरूप होण्याची माझी आध्यात्मिकता ही या देवांशाशी जोडली गेली आहे. निसर्गातील देवांशात असलेले बुद्धीकेंद्र व माझी स्वतःची बुद्धी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क आहे हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. मी निसर्गालाच गुरू मानतो बाकी कोणालाही नाही याचे कारण म्हणजे निसर्ग बुद्धी ते माझी बुद्धी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क आहे यावर माझा असलेला ठाम विश्वास!

(६) निसर्गात बुद्धीला सर्वोच्च स्थान असण्याचे कारण म्हणजे बुद्धीकडे असलेली व्यवस्थापन व नियंत्रण शक्ती! मानवी मेंदूत असलेली बुद्धी हे मनुष्याला निसर्गाकडून अर्थात निसर्गातील देवांशाकडून (थोडक्यात देवाकडून) मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. तसे पाहिले तर नुसती बुद्धीच काय पण मनुष्य जीवन, त्या जीवनाला निर्माण करणारी आई वडील रूपी माध्यमे, त्या जीवनाला जगवणारी हवा, पाणी, अन्न रूपी साधने, त्या जीवनाला रोगांपासून, शत्रूंपासून वाचवणारी औषधे, शस्त्रे रूपी साधने या सर्वच गोष्टी ही निसर्गातील देवांशाकडून (देवाकडून) मनुष्याला मिळालेली वरदानेच आहेत.

(७) पण मनुष्याने कधीही स्वतःच्या बुद्धीचा गर्व करता कामा नये. स्वतःच्या बुद्धीचा टेंभा मिरवताना मनुष्याने त्याच्या बुद्धीचा उगम निसर्गात (माझ्या मते निसर्गातील देवात) आहे हे विसरता कामा नये. खरं तर सगळ्यांच गोष्टींचा उगम निसर्गात (निसर्गातील देवात) आहे. मग ती निसर्गातून निर्माण होणारी अनेक प्रकारची आव्हाने असोत की निसर्गाने बुद्धीसह बहाल केलेली अनेक साधने (वरदाने) असोत.

(८) माझ्या मते, बुद्धी हे एक अत्यंत शक्तीशाली नैसर्गिक साधनच आहे. त्या साधनाचा मनुष्याने नीट उपयोग केला पाहिजे. बुद्धीला निसर्गातील प्रश्न निसर्गातच व समाजातील प्रश्न समाजातच सोडविणे जमले पाहिजे. नैसर्गिक व सामाजिक प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे निसर्गात व समाजातच आहेत. त्यांचा शोध निसर्गात व समाजातच घेणे बुद्धीला जमले पाहिजे. त्यासाठी बुद्धीने खूप प्रयत्न केले पाहिजेत. यालाच बौद्धिक कष्ट म्हणतात जे शारीरिक कष्टापेक्षा श्रेष्ठ असतात. बुद्धी श्रेष्ठ म्हणून बौध्दिक कष्टही श्रेष्ठ  हे मान्य करायलाच हवे. कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर जर बुद्धीमुळेच मिळते तर मग बुद्धी श्रेष्ठ नव्हे काय?

(९) बौद्धिक कष्ट केल्याने कठीण प्रश्नांची उत्तरे मिळतात व यालाच प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. पण बुद्धी श्रेष्ठ म्हणून कोणीही स्वतःच्या बुद्धीचा गर्व करू नये. कारण शेवटी बुद्धी हे निसर्गाचेच (माझ्या मते निसर्गातील देवांशाचे) वरदान आहे. म्हणून बुद्धीने नेहमी निसर्गाशी (निसर्गातील देवांशाशी) कृतज्ञ राहिले पाहिजे. निसर्गाशी/देवांशाशी कृतज्ञ राहणे, त्याच्यापुढे आदराने नतमस्तक होणे, त्याच्याशी सर्वार्थाने एकरूप होणे म्हणजे त्याच्यापुढे शरणागत होऊन भीक मागणे नव्हे. अशी भीक मागणे हा स्वतःच्या बुद्धीचाच नव्हे तर निसर्गाचा/देवांशाचाही अपमान आहे. माझी आस्तिकता ही अशी वैज्ञानिक आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२४.६.२०२०

सोमवार, २२ जून, २०२०

आषाढ प्रारंभ दिनी अत्रे!

आषाढ मास प्रारंभ दिनी अत्रे!

रविवार, दिनांक २१ जून २०२० च्या लोकसत्ता वृत्तपत्रात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या मराठा वृत्तपत्रात दिनांक २२ जून १९६० रोजी आषाढ मास प्रारंभ दिनानिमित्त "आषाढस्य प्रथम दिवसे" हा जो लेख लिहिला होता तो पुन्हा प्रसिद्ध झालाय. त्या लेखातील खालील दोन निवडक गोष्टी मला आवडल्या त्या वाचकांसाठी सादर!

(१) नैतिकता, बौध्दिकता व सुंदरता ही प्राचीन भारतीय संस्कृतीची तीन रूपे अनुक्रमे वाल्मिकींच्या रामायणात, व्यासांच्या महाभारतात व कालिदासांच्या शाकुंतलात आढळतात! 

(२) भाषा ही पार्वती तर तिच्यातून मिळणारा ज्ञानार्थ हा परमेश्वर!

आचार्य प्र.के.अत्रे यांच्यासारखा अभ्यासकच प्राचीन भारतीय संस्कृतीची अशी थोडक्यात मांडणी करू शकतो व त्यांच्यासारखा साहित्यिकच भाषेला पार्वती व तिच्यातून मिळणाऱ्या ज्ञानार्थाला परमेश्वराची उपमा देऊ शकतो. खरंच आचार्य अत्रे ग्रेटच होते!

-ॲड.बी.एस.मोरे, संकलक

रविवार, २१ जून, २०२०

पुंगी ताईट व्यायाम!

अनलॉक २ मधील चालण्याचा पुंगी ताईट व्यायाम!

तीन महिन्यानंतर इमारतीच्या खाली उतरून आज रविवार, दिनांक २१ जून २०२० रोजी संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान डोंबिवली स्टेशन  पर्यंत चालण्याचा व्यायाम केला. रस्त्यावर व रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट व भयाण शांतता आढळली. त्यातच तोंडावर मास्क लावून चालत असताना रस्त्यावरील कुत्री अंगावर भुंकत होती. त्यामुळे चालताना शरीर मोकळे होत असले तरी हळूहळू या व्यायामाचे रूपांतर  पुंगी ताईट व्यायामात झाले. पुढे कोणी पोलीस तर हटकणार नाही ना याची भीती होतीच. रात्री  जागून दुपार नंतर उशिरा उठणारा मी माणूस असल्याने सकाळ, दुपारचा व्यायाम शक्य नाही. बघूया उद्यापासून थोडे लवकर उठून कमीतकमी संध्याकाळी ६ ला असे पाय मोकळे करणे जमतेय का?

खरं म्हणजे,फक्त  डॉक्टर, पोलीस व सरकारी खात्यातील इतर लोकांनाच अत्यावश्यक सेवक समजून लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायची परवानगी देणे हे चुकीचे आहे. वकिलांचा सुद्धा अत्यावश्यक सेवक वर्गात समावेश केला गेला पाहिजे. समजा कुठे घरगुती हिंसाचार वगैरे गोष्टी घडल्या तर लोक डॉक्टरकडे जाणार की वकिलाकडे? मग वकील अशा क्लायंटला घेऊन मध्यरात्री सुध्दा पोलीस स्टेशनला जाऊ शकतो की नाही? जरा कायदा नीट समजून घ्या हो!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०

फादर्स डे!

आज फादर्स डे निमित्त माझ्या वडिलांना ही भावांजली!

(१) कठीण आहे मला माझ्या वडिलांविषयी शब्दांत व्यक्त होणे, पण तरीही कसाबसा व्यक्त होतोय. सातवीपर्यंत शिकलेले माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघ या मान्यताप्राप्त कामगार युनियनचे पुढारी झाले व काँग्रेसचे तत्कालीन मोठमोठे नेते इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, संगमा, वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.  त्यांच्याबरोबर लहानपणी मी श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील बंगल्यावर व तरूण पणी श्री. वसंतदादा पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर गेलो होतो. मी इयत्ता सातवीत असताना दिल्लीला यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यात गिरणी कामगारांच्या बैठकीत त्या लहान वयातही धाडसाने छोटे भाषण केले होते व ते ऐकून यशवंतराव चव्हाणांनी मला जवळ ओढून घेतले होते. माझ्या वडिलांचे इंदिरा गांधी यांच्याबरोबरही फोटो होते. हे सर्व फोटोंचे पुढे काय झाले, ते कसे गहाळ झाले, माझ्या वडिलांच्या या मौल्यवान आठवणी कुठे आणि कशा अदृश्य झाल्या हे मला कळत नाही. या सर्व आठवणी वरळी बी.डी.डी. चाळीतील माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून मी १९८५ साली डोंबिवली गाठली व डोंबिवलीला पत्नी व मुलीसह वेगळा राहू लागलो. याचे कारण म्हणजे वरळीची १०×१२ फूटाची ती खोली खूप छोटी होती व त्या एवढ्या लहान खोलीत माझा धाकटा भाऊ, धाकटी भावजय यांचे कुटुंब, माझे आईवडील व पुन्हा माझे कुटुंब यांना एकत्र राहणे केवळ अशक्य होते.

(२) तरीही आईवडिलांना मी सोडले नव्हते. तिथे दर आठवड्याला जाऊन त्यांची नुसती वरवर चौकशी नाही तर थोरला मुलगा म्हणून काळजी घेणे हे कर्तव्य मी पार पाडीत होतो. माझे वडील खूप स्वाभिमानी असल्याने त्यांच्या औषधांचा खर्च ते स्वतःच करायचे. मी फक्त आईच्याच औषधपाण्याचा खर्च करायचो. धाकटा भाऊ व भावजय आईवडिलांसोबतच राहत असल्याने त्यांच्या जेवणाची व सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते सर्व जुने फोटो मी माझ्याबरोबर डोंबिवलीला घेऊन आलो नाही. उत्तर भारत सफरीचे वडिलांबरोबरचे माझे खूप फोटो होते. पण ते सर्व गहाळ झाले आहेत. त्यामुळे या लेखासोबत ते फोटो मी दाखवू शकत नाही.

(३) घरात माझ्या वडिलांनी त्यांच्या चारही मुलांना म्हणजे मी थोरला मुलगा, दोन धाकट्या बहिणी व एक सर्वात धाकटा भाऊ या सर्वांना शिक्षण घेण्याची संधी दिली. पण इतर तीनही भावंडे एस.एस.सी. च्या पुढे शिकलीच नाहीत. मी मात्र सातवी पी.एस.सी.ला (प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट) व अकरावी एस.एस.सी. ला (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन पुढे राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली व बी.कॉम.(अॉनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. एवढे उच्च शिक्षण पूर्ण केले व पुढे स्वतःच्या हिंमतीवर वकील झालो.

(४) माझ्या वडिलांना माझ्या शिक्षणाचा, माझ्या धाडसाचा खूप अभिमान होता. पुढारी असल्याने ते ज्या मिल मध्ये नोकरीला होते त्या व्हिक्टोरिया मिलमध्ये त्यांचा दबदबा होता. त्या मिलचे जनरल मॕनेजर सोनाळकर साहेब यांच्यापर्यंत त्यांची उठबस होती. माझ्या वडिलांनी मला एकदा सोनाळकर साहेबांच्या कॕबिनमध्ये रूबाबात नेले होते. तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष वसंतराव होशिंग, जनरल सेक्रेटरी भाई भोसले, संघाचे नंतरचे अध्यक्ष व शालिनीताई पाटील यांचे बंधू मनोहर फाळके यांच्याकडेही मला माझे वडील कौतुकाने घेऊन गेले होते. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांच्याकडेही माहिमला ज्योती सदन बंगल्यावर व नंतर मलबार हिल येथील मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. लहानपणीचा श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावरील माझ्या छोट्या भाषणाचा किस्सा तर वर सांगितलाच आहे.

(५) असे हे माझे वाघासारखे वडील २००९ साली के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आम्हाला कायमचे सोडून गेले त्यावेळी मी खऱ्या अर्थाने निराधार झालो. कारण मी महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री व नंतर काँग्रेसचे खासदार असलेले बॕ. ए. आर. अंतुले यांच्याविरूध्द सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यामुळे  टी.व्ही. वर माझे सारखे नाव येऊ लागले होते. त्यातून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर असलेली काळजी, "बाळू, मला न विचारता तू एकट्यानेच एवढे मोठे धाडस का केलेस, आता ही रिट याचिका पुन्हा मागे घेता येईल का" हे मला माझ्या काळजीने सांगणे व नंतर मी न्यूमोनियाने खूप आजारी पडलो तेंव्हा माझ्या काळजीने कासावीस होणे या सर्व गोष्टी माझ्या वडिलांच्या मृत्यूबरोबर संपल्या होत्या.

(६) असा पाठिंबा देणारी एकही व्यक्ती जगात शिल्लक राहिली नव्हती व आताही अशी एकही व्यक्ती या जगात नाही हे मी जाहीरपणे सांगत आहे. आज माझी पत्नी माझ्या सोबत आहे, माझी मुलगीही माझ्यामागे पाठबळ म्हणून उभी आहे. पण माझ्या वडिलांची बरोबरी कोणच करू शकत नाही. माझे वडील हा माझा फार मोठा आधार होतो. तो आधार संपला आणि मी कमकुवत झालो. वकिली सुरू ठेवली पण राजकारणाचा नाद सोडून दिला.  

(७) या लेखासोबत डावीकडे आहेत ते माझे वडील व उजवीकडे आहे तो मी त्यांचा मुलगा. आज फादर्स डे निमित्त एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०

शनिवार, २० जून, २०२०

चाळीतला सीमावाद!

चाळीतला सीमावाद!

माझा जन्म १९५७ चा, म्हणजे १९६२ साली भारत व चीन यांच्यात सीमावादातून जे युद्ध झाले त्यावेळी मी जेमतेम पाच वर्षाचा होतो. पहिली इयत्तेत सुध्दा प्रवेश न घेतलेल्या मला त्या बाल वयात काय माहित असणार भारत काय, चीन काय? पण मुंबईत वरळी बी.डी.डी. चाळीत असलेली आमची खोली व समोरची खोली यांच्यात एक अलिखित सीमारेषा आहे हे मात्र कळत होते. मुंबईत वरळी, डिलाईल रोड, नायगाव याठिकाणी बी.डी.डी. चाळी आहेत. प्रत्येक चाळीला तळ मजला धरून एकूण चार मजले. चाळीच्या प्रत्येक मजल्यावर १०×१२ फूटाच्या एकूण २० खोल्या. म्हणजे चार मजल्यावर एकूण ८० खोल्या. एकाच चाळीत राहणाऱ्या या ८० खोल्यांत गिरणी कामगारांची ८० कुटुंबे संसार करायची. अर्थात सरकारी भाडेतत्वावरील त्या छोट्या खोल्या हीच चाळीत राहणाऱ्या सर्व गिरणी कामगारांची स्थावर मिळकत होती व मिलमधून मिळणारा पगार हेच त्या सर्वांचे आर्थिक उत्पन्न होते. म्हणजे सगळ्या कुटुंबाची परिस्थिती सारखी होती. पण तरीही त्यांच्यात अधूनमधून छोटे सीमावाद चालू असायचे. प्रत्येक भाडेकरूने स्वतःचे सामान म्हणजे चिनपाट (सार्वजनिक संडास करण्यासाठी लागणारा पत्र्याचा छोटा डबा किंवा प्लॅस्टिकची छोटी बादली), कपडे वाळू घालण्यासाठी लागणारा स्टूल, कपडे वाळू घालण्यासाठी आवश्यक असलेल्या दोऱ्या इत्यादी गोष्टी स्वतःच्याच अंगण भागात ठेवणे हा नियम होता. दोन खोल्यांमधील अंगण भागाचे म्हणजे वटणाचे (corridor) एका सीमारेषेने दोन भाग केलेले होते. अलिकडच्या खोलीचे सामान अलिकडच्या अंगण भागात, तर पलिकडच्या खोलीचे सामान पलिकडच्या अंगण भागात आणि मध्ये अंगण सीमारेषा अशी ती व्यवस्था होती. गणपती, नवरात्र, दिवाळी सारख्या सणात रांगोळी, आकाश कंदील, पणत्या वगैरे गोष्टी प्रत्येकाने स्वतःच्या अंगणातच लावणे हाही नियम होता. दोन अंगण भागांमधील सीमारेषा ओलांडून कोणीही दुसऱ्याच्या अंगण भागात अतिक्रमण करायचे नाही हे ठरलेले होते. हे सर्व एकमेकांच्या सहकार्याने अगदी व्यवस्थित चालायचे. आम्ही लहान मुले मात्र  या सीमारेषा ओलांडून एकमेकांच्या खोल्यांत घुसून धुडघूस घालायचो. पण आमचे सगळ्या खोल्यांत स्वागतच व्हायचे. इतकेच नव्हे तर आमच्या आया एकमेकींच्या खोल्यांत जाऊन बिनधास्त गप्पा मारीत बसायच्या. इतकेच नव्हे तर घरी केलेल्या मोदक, लाडू, करंजी, मच्छी, मटण वगैरे खाद्य पदार्थांचीही मुक्त देवाणघेवाण व्हायची. कोणाकडे बारसे, लग्नकार्य असले तर मजल्यावर (माळ्यावर) राहणारे शेजारी एकमेकांच्या मदतीला धावायचे. पण तरीही सीमारेषा या होत्याच. अधूनमधून क्षुल्लक सीमावाद व्हायचे, धुसफूस व्हायची, छोटी  भांडणे व्हायची, पण पुन्हा सर्वजण एक व्हायचे. हळूहळू वय व शिक्षण वाढत गेले तसे आर्थिक व्यवहाराचा व राजकीय सीमावादाचा हा पसारा फार मोठा आहे हे मला कळू लागले. आमची चाळ एकच पण त्या चाळीतील ८० खोल्यांच्या सीमा वेगवेगळ्या, तशी पृथ्वी एकच पण या पृथ्वीवरील विविध देशांच्या सीमा वेगवेगळ्या हे हळूहळू कळू लागले. आता तर हेही कळलेय की या जगात कोणतीही व्यक्ती व कोणताही देश आत्मनिर्भर नाही. सगळेजण एकमेकांवर अवलंबून आहेत. आमच्या आया जशा एकमेकींना मोदक, लाडू, करंज्या, मच्छी, मटण द्यायच्या तसे जगातील देश एकमेकांशी आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण करतात. तरीही त्यांच्यात अधूनमधून सीमावाद उफाळून येतोच. मग त्यांच्यात छोटी, मोठी युद्धे होतात. युद्ध ज्वराने सगळे वातावरण तापते. पण नंतर ही युद्धे संपतात, नव्हे ती संपवावीच लागतात. कोण युद्धात जिंकतो तर कोण हारतो. मग जिंकणारा देश व हरणारा देश यांच्यात तहाचे करार होतात. त्या देशांत आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होतात. जगात हे असेच चालू आहे आणि असेच चालू राहणार आहे. हे सर्व नीट समजून घ्यायला मला बी.डी.डी.चाळीतील त्या सीमारेषा व ते छोटे सीमावाद अजूनही मदत करतात. लहानपणीच्या या अनुभवाचा मी माझ्या वकिलीतही उपयोग करतो हे विशेष!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०

सार्थक झाले!

आज माझ्या फेसबुक लिखाणाचे खरे सार्थक झाले!

आज शनिवार, दिनांक २० जून, २०२० हा माझा सार्थक दिन! आज मी खूश आहे, आनंदी आहे. कारण गेली पाच वर्षे फेसबुकवर मी जे सातत्याने लिखाण करतोय त्याचे सार्थक झाले. माझे हे तिसरे फेसबुक खाते. पहिल्या दोन फेसबुक खात्यांवर प्रत्येकी ५००० मित्र व तेवढेच अनुयायी म्हणजे जवळजवळ एकूण २०००० लोकांना मी माझ्या ज्ञान, अनुभव व विचार यांनी आकर्षित केले. पण त्या आकर्षक करणाऱ्या मित्र, अनुयायी संख्येवर मी खूष नव्हतोच! मला जे हवे ते त्या रेकॉर्ड ब्रेक संख्येतून मला मिळतच नव्हते. म्हणून माझे सर्व लिखाण व्यर्थ गेले या भावनेतून मी ती दोन्ही फेसबुक खाती बंद करून टाकली. तरीही अजून एकदा प्रयत्न करून बघू व मी जे लिहितोय ते बरोबर आहे का याची पुन्हा एकदा चाचपणी करू या विचाराने मी हे सद्याचे तिसरे फेसबुक खाते उघडले. पहिले खाते मी ठरवून  राजकारणापासून अलिप्त ठेवले होते, दुसरे खाते मी काही अंशी राजकारणाला जोडले व आता पुन्हा हे तिसरे खाते राजकारणापासून मी ठरवून अलिप्त केले. पण आजपर्यंत मला जे हवे होते ते मला माझ्या फेसबुक लिखाणातून मिळतच नव्हते. काय हवे होते मला? पैसा, सत्ता, प्रतिष्ठा? बिलकुल नाही. पण मला जे हवे होते ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या एका गावातील २२ वर्षाच्या एका मराठी शेतकरी तरूणाने मला देऊन टाकले. काय दिले त्याने मला तर त्याने प्रत्यक्ष फोन करून मला तो जे मनापासून बोलला ते ऐकून मी स्वतःच चाट पडलो. त्या तरूणाने मला सांगितले की, माझे विचार तो दररोज नुसते वाचतच नाही तर त्या विचारांचे मोबाईलने स्क्रीन शॉटस घेऊन त्यांची तो अधूनमधून उजळणी करतो. माझ्या विचारांनी त्याच्या जीवनात बदल झाला. त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. तो आता १४ वी ला आहे व "कायदा हा माझा श्वास" हा फेसबुक वरील माझा लेख त्याने वाचल्याने ग्रॅज्यूएट झाल्यावर कायद्याचे पुढील शिक्षण घेण्याचे त्याने ठरवले आहे व त्यासाठी तो पंढरपूर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. तसेच माझ्या विचारांतून त्याला अगोदरच कायद्याचे मूलभूत शिक्षण प्राप्त झाले आहे व होत आहे. त्याची आई चार वर्षापूर्वी वारली. वडील आहेत व तोच थोरला असल्याने धाकटया भावंडांची आता त्याच्यावर जबाबदारी आहे. तरीही माझ्या विचारांमुळे त्याला सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे व त्यामुळेच आता त्याला या सर्व जबाबदाऱ्यांची भीती वाटेनाशी झाली आहे. हे सर्व त्याच्या तोंडून प्रत्यक्षात ऐकताना मला एकच जाणीव झाली की माझ्या फेसबुक लिखाणाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले. हजारो लोकांतून मी एका तरूणाला योग्य दिशा देऊ शकलो आणि त्यातच मी जिंकलो, हीच ती माझी जाणीव! ही जाणीव मी त्या तरूणालाही "तूच माझा खरा शिष्य" असे लिहून शेअर करीत आहे, कारण माझा खरा शिष्य तोच आहे हे त्याने आज सिद्ध केले आहे. ही माझी स्वतःची आत्मप्रौढी नसून हा माझ्या जीवनाचा १००% सत्य अनुभव आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०

शुक्रवार, १९ जून, २०२०

गुळाला मुंगळे स्वार्थाचे

गुळाला चिकटलेले मुंगळे गूळ संपला की गायब होतात!

शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय या गोष्टी पुढे पुढे सरकत असताना अनेक मुले, मुली, पुरूष, स्त्रिया अभ्यास, कामाच्या निमित्ताने आयुष्यात आल्या व जवळून संपर्कात राहण्याचा स्वार्थ जसजसा संपत गेला तसतशा हळूहळू गायब होत गेल्या. शालांत परीक्षापूर्व निरोप समारंभ अनुभवल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिल्यावर जे निरोप समारंभ झाले त्यांचाही अनुभव मी घेतला आहे. त्या समारंभात कौतुकास्पद दोन शब्द ऐकताना आनंद होत असला तरी आता आपल्याला या सर्व सहकाऱ्यांना सोडून जायचे हे लक्षात आले की मनात खूप दुःख व्हायचे. पण वाटायचे की हा निरोप तात्पुरता आहे. जरी दुसऱ्या कंपनीत कामाला गेलो तरी पहिल्या कंपनीच्या सहकाऱ्यांबरोबरचे मैत्री संबंध चालू राहतील. पण हळूहळू जुने फोन कमी व्हायचे आणि मग मीही नवीन कंपनीच्या कामात नव्या सहकाऱ्यांबरोबर नवीन संबंधात बिझी होऊन जायचो. हल्लीची समाज माध्यमे त्यावेळी नव्हती. पण या समाज माध्यमांनी संपर्काचे जाळे वाढवले असले तरी माणसाचा स्वभाव तोच राहिलाय. लिंकडइन म्हणून असेच एक समाज माध्यम आहे. त्यावर उच्च शिक्षित व्यावसायिक व नोकरदार मंडळी भरपूर आढळली. अशाच एका उच्च शिक्षिताचे खाते भरपूर कनेक्शन्सने भरलेले पाहिले. त्याला मी विचारले की, "अरे तुझ्या लिंकडइन खात्यावर तुला किती मोठमोठी माणसे ओळखतात". तर तो म्हणाला "काही नाही रे, सुरूवातीला नोकरी शोधताना काढलेले ते खाते आहे, चांगली नोकरी मिळून पाच वर्षे झाली, ते खाते बंद केले नाही म्हणून तसेच धूळ खात पडलेय, त्या खात्यावरील कोणाशीही माझा आता संबंध नाही"! हे ऐकून मी चाटच झालो. काय माणसे असतात जगात! मतलब निकल गया तो पहचानते नही. अशीच मतलबी माणसे स्वार्थ संपला की निरोप घेताना स्टे कनेक्टेड म्हणजे संपर्कात रहा असा औपचारिक सल्ला देतात आणि मग तीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर निघून जातात. मी मात्र वेड्यासारखा अशा लोकांना फोन करायचो. मग काहीतरी औपचारिक बोलणे फोनवर व्हायचे व तिकडून रिस्पॉन्स तुटक आहे ही जाणीव व्हायची. मग समोरून फोन यायचे बंद व्हायचे. मग मीच त्यांना सारखा फोन का करायचा, असे एकतर्फी मागे लागणे काय कामाचे हे कळून चुकल्यावर मीही मग अशा लोकांचा नाद सोडून द्यायचो. असे संबंध कमी कमी होत गेले. पण तरीही पंधरा दिवसांपूर्वी मनात सहज आले की चला आपण या जुन्या कंपनी सहकाऱ्यांना फेसबुकवर तरी शोधून काढू. म्हणून काही जुनी नावे आठवली तशी फेसबुक सर्चवर टाकून दिली. पण त्यांच्या पैकी मला कोणीच फेसबुकवर आढळले नाही. कुठे असतील ही सर्व मंडळी याचा पत्ता लागणे आता शक्य नाही. या सर्वांना व मला जवळ करणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे कंपनी नोकरी आणि तोच त्यांचा व माझा एकत्र येण्याचा व काही काळ एकत्र राहण्याचा स्वार्थ होता. नोकरी संपली, स्वार्थ संपला, सर्व माणसे गायब! आयुष्यात असाच अनुभव घेत गेलो व मग पुढे त्याची सवय होत गेली. हे असे का होत असावे याचा बारकाईने विचार केला असता हे लक्षात आले की माणसांना जवळ आणणारी व त्यांचे संबंध टिकविणारी या जगात असलेली मुख्य गोष्ट म्हणजे स्वार्थ! हा स्वार्थ म्हणजे गूळाच्या ढेपी सारखा असतो. या ढेपीला माणसे मुंगळ्या सारखी चिकटतात व ढेपीचा गूळ संपला की हे मुंगळे गायब होतात!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०

गुरुवार, १८ जून, २०२०

कायदा माझा श्वास!

कायदा हा माझा श्वास!

(१) प्रत्येकाला नैसर्गिक जीवन जगण्याचा, तसेच नैसर्गिक मरण्याचा मूलभूत नैसर्गिक अधिकार आहे. आत्महत्या काय किंवा खून काय, हे दोन्हीही अनैसर्गिक मृत्यूचे प्रकार होत आणि म्हणून या दोन्ही मृत्यूची पोलीस चौकशी ही होतेच! आत्महत्येचे कारण काय, ती स्वतःच्या इच्छेने केलीय की तिला इतर कोणी जबाबदार आहे म्हणजे आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलेय का याची पोलीस चौकशी होते. तसेच खून कोणी केला याची खूनाच्या हेतूसह पोलीस चौकशी होते. या चौकशीत जर कोणी दोषी आढळले तर मग अशा गुन्हेगाराला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला किंवा खून करणाऱ्याला फौजदारी कायद्यानुसार कडक शिक्षा होते! कारण प्रत्येकाला नैसर्गिक जीवन जगण्याचा व तसेच नैसर्गिक मरण्याचा मूलभूत नैसर्गिक अधिकार आहे. पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे मरणे हे संवेदनशील आहे कारण अन्नसाखळीत मनुष्याला निसर्गाने त्याच्या उत्क्रांती प्रक्रियेतून सर्वोच्च पातळीवर आणून ठेवलेय.

(२) नैसर्गिक मरणापेक्षा नैसर्गिक जगण्याचा विषय हा मनुष्यासाठी खूप मोठा विषय आहे. माणसाचे नैसर्गिक जगणे हे इतर प्राण्यांच्या नैसर्गिक जगण्यापेक्षा खूप वेगळे आहे. त्याच्या जगण्याला माया, प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च भावनांची व देव, धर्मासारख्या आध्यात्मिक भावनांची जोड आहे. म्हणूनच माणसाचे नैसर्गिक जगणे हे दिवाणी कायद्याने जास्त व फौजदारी कायद्याने कमी नियंत्रित आहे. अनैसर्गिक जगण्याच्या प्रकारात बलात्कारासारख्या अनैसर्गिक लैंगिकतेचा प्रकार येतो व म्हणूनच बलात्कार हा फौजदारी कायद्यानुसार गुन्हा आहे व अशा गुन्ह्यासाठी फौजदारी कायद्यात कडक शिक्षा आहे.

(३) माणसाचे नैसर्गिक जगणे हे फक्त मनुष्य समाजापुरतेच मर्यादित नाही. निसर्गात जे इतर प्राणीमात्र, वनस्पती आहेत त्यांच्या नैसर्गिक जगण्यात मनुष्याने किती लुडबूड करावी व एकंदरीतच नैसर्गिक पर्यावरणाशी मनुष्याने कसे जुळवून घ्यावे हा मोठा विषय माणसाच्या नैसर्गिक जगण्यात येतो. या सर्व नैसर्गिक गोष्टींचा समावेश कायद्याच्या दिवाणी व फौजदारी या दोन प्रमुख शाखांत केला गेला आहे. माणसाचे इतर माणसांबरोबरचे उच्च पातळीवरील नैसर्गिक जगणे म्हणजे काय हा दिवाणी कायद्याचा फार मोठा विशेष भाग आहे.

(४) माणूस हे काही कृत्रिम यंत्र नाही. तो पण एक नैसर्गिक प्राणी आहे. या नैसर्गिक प्राण्याचे नैसर्गिक जगणे व नैसर्गिक मरणे म्हणजे काय हे जर नीट समजून घ्यायचे असेल तर हिमालय पर्वताची उंची, सागराची खोली व पृथ्वीची रूंदी असलेल्या दिवाणी व फौजदारी कायद्यांचा नुसता वरवर नाही तर सखोल अभ्यास करा. कायदा हे माझे फक्त पैसे कमावण्याचे साधन नाही तर तो माझा श्वास आहे, जो श्वास मी प्रत्येक क्षणाला आत घेतो व बाहेर सोडतो. माझे शरीर, माझे मन, माझे जीवन (तन, मन, जीवन) संपूर्णपणे कायद्याने व्यापलेले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.६.२०२०

बुधवार, १७ जून, २०२०

कोरोना काळातील वकिली!

कोरोना काळात गरीब वकिलांची परिस्थिती खूप नाजूक!

माणूस, मग वकील असो नाहीतर आणखी कोणी, कोरोना लॉकडाऊन मुळे तीन महिने घरी कोंडून राहिल्यावर कोणाचीही मानसिक स्थिती ठीक राहू शकत नाही. कोरोनाने निर्माण केलेली वैद्यकीय आणीबाणी व भारत-चीन सीमेवर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती या आणीबाणी सदृश्य गंभीर बाबी! आपल्या  रोजच्या व्यवहारातील वादविवाद व त्यावर असलेले दिवाणी कायद्याचे तोडगे या गोष्टी अशा आणीबाणीत मोडू शकत नाहीत. कोरोना लॉकडाऊन काळात पोलीसांचा दंडुकाही भारी वजनाचा झाल्याने गुन्हेगार पण हल्ली घाबरून आहेत. त्यामुळे दिवाणी व फौजदारी अशी दोन्ही प्रकारची वकिली सद्या गॕसवर आहे. अशा परिस्थितीत वकिलांची मानसिक स्थिती कशी असेल याचाही लोकांनी जरा नीट विचार करावा. स्पर्धा तर सगळ्याच क्षेत्रात आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या जागा मजबूत करून बसलेले बोके आहेत. अशा बोक्यांची मोठी लॉबी असते. त्यात एखादा गरीब घराण्यातील माणूस बोक्यांच्या तोडीस तोड असलेले टॕलेंट घेऊन उतरला की मग बोक्यांची जळते. मग असे बोके एक होऊन अशा माणसाला वाळीत टाकतात. त्याला पुढे येऊ देत नाहीत. अशा विचित्र परिस्थितीमुळे असा माणूस खचतो. खूप निराश होतो. नैराश्येच्या गर्तेत गेल्यावर अशा माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात. सद्याच्या कोरोना लॉकडाऊन काळात संपूर्ण वकिली व्यवसायच गॕसवर आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मग त्यात गरीब घराण्यातून कायद्याचे शिक्षण घेऊन वकील झालेले नवोदित वकील सद्या कोणत्या परिस्थितीत जगत असतील याचा कोणी विचार केलाय का? वकिलांना पोट नसते काय? ज्यांचे आईवडील, नातेवाईक या क्षेत्रात पूर्वीपासून आहेत त्यांचा थोडा का असेना पण जम बसलेला असतो. पण ज्यांच्या पाठीशी अशी घराणेशाही उभी नाही अशा वकिलांची या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जी जीवघेणी धडपड चालू असते ती काय असते हे मला विचारा. या परिस्थितीतून मी गेलोय व जातोय. म्हणूनच या कोरोना लॉकडाऊनच्या काळात अशा गरीब वकिलांची स्थिती काय असेल याची लोकांनी कल्पना करावी एवढीच किमान अपेक्षा!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.६.२०२०

माझा स्वाभिमानी बाप!

माझा स्वाभिमानी बाप!

हृदयात ब्लॉक्स निघूनही माझ्या बापाने शेवट पर्यंत हृदयाचे अॉपरेशन टाळले. घाबरून नव्हे तर मुलाला (म्हणजे मला) खर्चात पाडायचे नाही म्हणून. माझा बाप एकटाच मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलच्या दारात जायचा व रक्त पातळ करणाऱ्या कसल्या त्या गोळ्या घेऊन यायचा. मला एकांतात म्हणायचा "बाळू, याच गोळ्यांवर मी जगणार, तुला तुझ्या वकिलीतून एकच मुलगी असलेला तुझा छोटा संसार नीट चालवता येत नाही आणि तू माझे अॉपरेशन काय करणार"? माझा बाप पुन्हा म्हणायचा "अरे, करमाळा तालुक्यातील साडे गावातून फाटक्या चड्डीवर मुंबईत आलेला मी माणूस स्वतःच्या हिंमतीवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा पुढारी झालो पण मला छक्केपंजे करता आले नाहीत म्हणून पैशाने गरीबच राहिलो पण तरीही जगण्यासाठी तुझ्यावर अवलंबून राहिलो नाही, अधूनमधून उसने म्हणून तुझ्याकडून घेतलेले पैसे तुला परत करून टाकलेत, मग मी माझ्या हृदयाच्या अॉपरेशनचा खर्च तुझ्यावर टाकीलच कसा, आयुष्यभर स्वाभिमानाने जगलोय आणि स्वाभिमानाने मरणार"! असा माझा स्वाभिमानी बाप शेवटी के.ई.एम. हॉस्पिटलमध्येच मेला. छातीत दुखू लागले की एकटाच के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये अॕडमिट व्हायचा व नंतर त्याची खबर आमच्या पर्यंत उशिरा यायची. मरायच्या काही दिवस अगोदर के.ई.एम. हॉस्पिटलच्या हृदय विकार वार्डात ॲडमिट झालेल्या माझ्या बापाला बघायला मी गेलो तर खाट मिळाली नाही म्हणून माझा बाप त्या वार्डात खालीच गादीवर झोपला होता. पण स्वतःचे दुःख लपवून मलाच तू कसा आहेस वगैरे चौकशी करू लागला. जुन्या के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोर त्याच हॉस्पिटलची हृदय विकारावर इलाज करणारी एक इमारत आहे. त्याच इमारतीतील एका वार्डात माझा बाप ॲडमिट होता. तिथे मोठमोठी उंदरे इकडून तिकडे फिरत होती. ते दृश्य मला बघवत नव्हते. पण माझा स्वाभिमानी बाप त्या वातावरणातही बिनधास्त होता. अशा बापाचा मी मुलगा आहे. त्याचेच रक्त माझ्या अंगात आहे. मग मी कोरोनाला काय घाबरणार! बायको, मुलीला माझ्या स्वाभिमानी बापाची हीच कथा सांगून त्यांना म्हणालोय की, मला कोरोना झालाच तर जमले तर जिथे गरीब मरतात त्याच पालिकेच्या किंवा शासनाच्या रूग्णालयात मला अॕडमिट करा, माझ्यावर खर्च करायचा नाही, भरपूर जगलोय मी, आता पुन्हा पैसे खर्च करून मला जगवायचा प्रयत्न करायचा नाही"! कोरोनाच्या निमित्ताने माझ्या स्वाभिमानी बापाची आठवण हेच आता माझ्यासाठी अमृत आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.६.२०२०

कोरोना उदार झाला!

कोरोना उदार झाला!

जगाचे अर्थकारण व राजकारण कोण ठरवतेय भांडवलवादी अमेरिका की साम्यवादी चीन? हा या जगात जगायचे कसे या मूलभूत वादाचा  दृश्य परिणाम आहे. एवढे धर्म या जगात पण एकाही धर्माला या वादावर उत्तर सापडले नाही. धर्माची तत्वे व त्यातला देवही मला डिजिटल दुनियेसारखा आता आभासी वाटू लागलाय. निसर्ग व त्या निसर्गातील मानवाचे सत्य या आभासापासून फार वेगळे आहे. किती सुखी व शांत होतो मी लहानपणी! मी सुखी व शांत होतो कारण माझे आईवडील सुध्दा त्या सुवर्ण काळात गरिबीतही सुखी व शांत होते. आजार संकटाची कसली खिचखिच नव्हती की वाद संघर्षाची कसली खिचपिच नव्हती. सुवर्ण युगातील सुंदर गाणी ऐकत, सुंदर चित्रपट बघत कष्ट करतानाही माझे आईवडील अगदी आनंदी दिसायचे व गरीब म्हणून फी माफीवर शिक्षण घेणारा मीही आनंदाने शिक्षण घेत होतो. पण कोणाच्या तरी डोक्यात उदारीकरणाचे व जागतिकीकरणाचे खूळ घुसले व अमेरिका आणि रशिया (त्यावेळचे मोठे सोव्हिएट युनियन) यांच्यातील अणुस्पर्धेचे राजकीय शीतयुध्द संपून आर्थिक स्पर्धेतून जगात नवीन अर्थयुद्ध सुरू झाले. जागतिक अर्थयुद्धाचाच वाईट परिणाम आज जग अनुभवत आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध हे जागतिक अर्थयुद्धच आहे. दोन हत्ती लढतात तेंव्हा झाडे उन्मळून पडतात तशी जगातील इतर छोट्या मोठ्या देशांची स्थिती सद्या झाली आहे. यात आपला भारत देश कुठे आहे यावर मोठमोठे अर्थ तज्ज्ञ भाष्य करतील. कारण मी अर्थतज्ज्ञ नाही. मला माझ्या कॉमन सेन्सने जेवढे कळते तेवढेच मी बोलतो, लिहितो. प्रश्न हा आहे की, अर्थयुद्धाचे रूपांतर पुढे विध्वंसक राजकीय युद्धात होते जसे दिवाणी वाद वेळीच मिटले नाहीत तर अशा वादांचे रूपांतर पुढे फौजदारी गुन्ह्यांत होते. हे एक दुष्टचक्र आहे. कोरोना हा याच दुष्ट चक्रातून निर्माण झालेला भयंकर किडा आहे असे मला वाटते. माझा हा कयास कितपत खरा यावरही मोठमोठे तज्ज्ञ भाष्य करतील. मी तसा तज्ज्ञ नसल्याने मी हे माझ्या कॉमन सेन्सने बोलतोय. कसली प्रगती आणि कसला विकास केलाय माणसाने? मुंबईत एका बाजूने उध्वस्त कापड गिरण्यांच्या जागांवर उंच उंच इमारती उभ्या केल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूने समोरच ती धारावी झोपडपट्टी आहे तशीच रडत बसलीय. माणूस निसर्गाला असा फॉलो करतोय काय! म्हणजे निसर्गाने एकीकडून हिमालयासारखे उंच पर्वत निर्माण केले व दुसरीकडून खोल पाण्याचे मोठमोठे सागर निर्माण केले. उंच उंच इमारती म्हणजे हिमालय पर्वत व धारावी झोपडपट्टी म्हणजे हिंदी महासागर अशी कल्पना करतोय. हा माझा आभास आहे की सत्य आहे यावरही मोठमोठे तज्ज्ञ भाष्य करतील. मी तर एक सामान्य माणूस, मग मी माझ्या कॉमन सेन्सनेच बोलणार ना! या उतार वयात माझी सुख शांती लोभी माणसांनी हिरावून घेतलीय असेच माझ्या कॉमन सेन्सला वाटतेय!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.६.२०२०

मंगळवार, १६ जून, २०२०

कोरोनात चहा चपाती?

कोरोनाचे भान ठेवा व मग मला चहा चपाती मागा!

कोरोना लॉकडाऊन काळात माणूस समाज माध्यमातून काही गंमतीच्या, आवडीच्या, आनंदाच्या गोष्टी शेअर करतो याचा अर्थ असा नव्हे की तो कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे सावरलाय. उलटसुलट बातम्यांनी तो अगोदरच गांगरून गेलाय. सद्या कोणाचीही प्रतिकार शक्ती कितीही मजबूत असली तरी अशी व्यक्ती पैलवान बनून कोरोनाशी लढण्यासाठी तयार आहे असे नव्हे. हा कोरोना विषाणू जगाला नवीन असल्याने आपले शरीर या शत्रूला नीट ओळखू शकलेले नाही. त्यामुळे चांगले आरोग्य असलेल्या व्यक्तीचे शरीरही या कोविड-१९ विषाणूमुळे गडबडून जाऊ शकते. अशा गंभीर परिस्थितीत काही दिवसांपूर्वी चहा चपातीचा एक फोटो मी फेसबुकवर टाकला होता म्हणून  एकजण फारच लाडात येऊन "मला चहापाती कधी देणार" म्हणून मागे लागलाय. विनोद म्हणून एखादे वेळी ठीक. पण चहा चपातीची मागणी त्याच्याकडून सारखीच येऊ लागल्याने नाइलाजास्तव मला त्यास खालील मेसेज पाठवावा लागला. अती झाले तर मला त्यास ब्लॉक करावे लागणार हे निश्चित!

"अहो कसली चहा चपाती घेऊन बसलाय कोरोना लॉकडाऊन मध्ये? इथे मी माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे जाणे बंद केलेय आणि दुसरीकडे जाण्याचे काय घेऊन बसलात. कोरोना हद्दपार झाल्याशिवाय बाहेर कुठे चहा चपाती खायची नाही व स्वतःच्या घरातही कोणाला चहा चपाती खायला बोलवायचे नाही. सक्त नियम म्हणजे नियम"! 🙏🙏

सद्य परिस्थितीचे गांभीर्य सर्वांनीच समजून घ्यावे, ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.६.२०२०

तृप्ती व समाधान

तृप्ती व समाधान यात फरक काय?

(१) मराठी शब्दकोश चाळला तर तृप्ती व समाधान हे समानार्थी शब्द दिसतात. तृप्ती किंवा समाधान म्हणजे मनाची शांती, संतोष हाच समान अर्थ दोन्ही शब्दांचा दिलेला आहे. पण माझ्या मते या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. माझ्या मते सुरूवातीला असमाधान, मग समाधान (इंग्रजीत कम्फर्ट) व समाधानाच्या पुढे जो चैनीचा (इंग्रजीत लक्झरी) प्रवास सुरू होतो त्या चैनीचा कळस (इंग्रजीत क्लाइमॕक्स) म्हणजे तृप्ती!

(२) तृप्तीच्या मागे धावणारा माणूस हावरट, लोभी (इंग्रजीत ग्रीडि) असतो. लोभी माणूस एखाद्या गोष्टीची तृप्ती करण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो. त्या गोष्टीने तो पछाडला, घेरला (इंग्रजीत अॉब्सेशन) जाऊन त्याला त्या गोष्टीचा मंत्रचळ (इंग्रजीत अॉब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसअॉर्डर) लागतो.

(३) पण निसर्ग व्यवस्था अशी आहे की निसर्ग कोणालाच असा तृप्तीचा कळस किंवा बिंदू गाठू देत नाही आणि बळेच गाठला तरी त्या कळसावर जास्त काळ राहू देत नाही. असा कळस गाठणे म्हणजे हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर गाठण्यासारखे असते. पण एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलेला गिर्यारोहक त्या उंच शिखरावर किती काळ राहू शकतो? निसर्ग त्याला तिथे जास्त काळ राहूच देणार नाही. कारण निसर्गाची व्यवस्थाच तशी आहे.

(४) तृप्तीचा कळस किंवा सर्वोच्च बिंदू म्हणजे उदासीनतेचा, विरक्तीचा बिंदू! तिथे माणूस हा माणूसच राहत नाही. त्या बिंदूवर तो पूर्णपणे विरघळून जाऊन त्याचे पाणी पाणी (इंग्रजीत सॕच्युरेशन) होते. मग एव्हरेस्ट शिखर जिंकून उपयोग काय? तिथे पुढे काय हा प्रश्न निर्माण होतो कारण तृप्तीच्या त्या कळसावर पुढे काहीच राहत नाही.

(५) माझ्या मते जीवनात तृप्ती पेक्षा समाधान हीच महत्वाची गोष्ट आहे. समाधानाची भावना म्हणजे सुख व शांती या दोन्ही गोष्टींची मध्यम भावना! ही भावनाच जीवनाचा निर्मळ आनंद देते. गडगंज पैसा व संपत्तीच्या मागे लागलेली माणसे कधीच समाधानी राहू शकत नाहीत. कारण त्यांना तृप्तीचे वेड लागलेले असते.

(६) समाधानी माणसाची चाल व तृप्तीच्या मागे लागलेल्या माणसाची चाल नीट बघा. समाधानी माणूस हत्तीच्या पावलांनी डुलत डुलत चालतो तर तृप्तीच्या मागे लागलेला माणूस सारखा कुत्र्यासारखा धावत असतो. जगातील मोठी अर्थसत्ता बळकावून बसलेली मूठभर श्रीमंत माणसे एवढा पैसा, संपत्ती जवळ असूनही आणखी श्रीमंत होण्यासाठी कुत्र्यासारखी धावत असतात. स्वतः तर तशी धावतातच पण गरीब कष्टकरी कामगारांनाही त्यांच्या पाठीमागे धावायला भाग पाडतात. मला या अतीश्रीमंत माणसांची खरंच कीव येते!

(७) अतीश्रीमंत माणसांना अर्थशास्त्राचा "कमी होणारी सीमांत उपयोगिता" हा प्रसिद्ध नैसर्गिक कायदा (इंग्रजीत ज्याला लॉ अॉफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतात) लागू नसतो काय? तो नक्कीच असतो! पण ही माणसे अनैसर्गिक वागतात व जगात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी जास्तीत जास्त वाढवून एक अनैसर्गिक पोकळी निर्माण करतात.

(८) देव कधी कोणाला दिसला नाही, दिसणार नाही! आपणच निसर्गातील देवाला समजून घ्यावे लागते. याबाबतीतले कल्पनारंजन ठीक नव्हे. तुम्ही देवळात जाऊन देवाच्या मूर्तीपुढे एकटक किती बघत रहाल? असे सारखे एकटक बघत राहिल्याने तुम्ही आध्यात्मिक तृप्ती गाठू शकाल का? बिलकुल नाही! मग काय करायचे तर देवाचे थोडे ध्यान करायचे व ध्यान धारणेतून तृप्तीच्या नादी न लागता थोडेसे आध्यात्मिक समाधान मिळाले की मग देवाची ध्यान धारणा सोडून द्यायची. नाहीतर देवाचा मंत्रचळ होऊन वेड लागायची पाळी येते. नास्तिक लोक या आध्यात्मिक प्रश्नापासून मुक्त असतात. पण ते इतर गोष्टींत तृप्ती मिळविण्यासाठी धडपडू लागले तर तेही वेडे होऊन जातात.

(९) जीवनात समाधान महत्वाचे, तृप्ती नव्हे! याच समाधानी भावनेने मी जगलो. पोटापुरता पैसा मिळविला व नेटका संसारही केला. आता माझ्या बँकेत शिल्लक नाही म्हणून मी दुःखी नाही कारण मी माझी बौद्धिक शक्ती व माझे ज्ञान भांडवल थोडे जरी इकडेतिकडे वळवले तरी वृध्दावस्थेतही मला कसलेही पेन्शन वगैरे नसताना माझ्या पोटापुरता पैसा मला जरूर मिळणार याची पूर्ण खात्री आहे.

(१०) कोरोनाच्या व रूग्णालयीन खर्चाच्या  भीतीने लोक गांगरून गेले असताना मी मात्र निर्धास्त आहे. आजच बायकोला सांगून टाकलेय की "हे बघ, तुला किंवा मला किंवा दोघांनाही तो कोरोना विषाणू चिकटला तर मुलीला व जावयाला खर्चात टाकायचे नाही, सरळ पालिकेच्या किंवा सरकारी रूग्णालयात जायचे व तिथे त्यांनी अॕडमिट करून घेतले नाही तर तिथेच गेटवर तडफडून मरायचे पण लाखो रूपयांची बिले आकारणाऱ्या खाजगी रूग्णालयात जायचे नाही व कोणाला खर्चात पाडायचे नाही, तू साठीला आलीस व मी साठी पार केलीय म्हणजे आपण भरपूर जगलोय, देवाचे आभार मान व मरतानाही देवाविषयी कृतज्ञता व्यक्त कर"! मी हा असा समाधानी भावनेने जगलोय, जगतोय व त्याच समाधानी भावनेने मरणार! माझे आईवडील हे याच भावनेने जगले व मेले व मीही तसाच जगलो, जगतोय आणि मरणार. बायकोनेही माझे हे असे जगणे स्वीकारले आहे व आत्मसात केले आहे हे विशेष!

(११) माणसाने समाधानी भावनेने जगावे व कायम अतृप्त राहून मरावे अशीच देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची म्हणा रचना आहे. अतृप्त आत्मा म्हणे भूत होतो. असल्या थोतांडावर मी कधीही विश्वास ठेवला नाही व ठेवणारही नाही. तृप्ती व समाधान यातील फरक शोधता शोधता हा लेख एवढा कसा वाढला हे कळलेच नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.६.२०२०


सोमवार, १५ जून, २०२०

कोणाला हवाय असला पैसा...

कोणाला हवा आहे असला पैसा आणि असली प्रसिद्धी?

केवळ पैसे कमावण्यासाठी म्हणून मी ज्ञानाचा भांडवल म्हणून वापर केला नाही व करणार नाही. किमान गरजा भागविण्याएवढा पैसा मला वकिलीतून मिळतो. माझ्या फक्त १% ज्ञानातून मी पोटापुरते पैसे मिळवून समाधानी राहतो. पैशासाठी बाकीचे ९९% ज्ञान वापरले असते तर गडगंज श्रीमंत झालो असतो. नुसते नशीबच नाही तर पैसे कमावण्याची वृत्तीही असावी लागते माणसात! मी शिकलो, ज्ञान घेतले ते मी माझ्या मानसिक समाधानासाठी. ते समाधान आयुष्यात मी भरपूर मिळविलेय. त्या ज्ञानातील काही भाग माझ्याकडून सहजपणे फुकट वाटला जातो आणि त्यातही मानसिक समाधानाचाच भाग आहे. पैसा, संपत्ती या गोष्टींना मी आयुष्यात नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. माझ्या ज्ञानसाधनेचा संबंध माझ्या  अर्थकारणासाठी मी फक्त माझ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी जोडलाय, चैनीसाठी नव्हे. ही माझी आत्मप्रौढी नव्हे तर सत्य कथन आहे. कारण काहीजण मी पुस्तके काढावीत, यू ट्युब वर व्याख्याने द्यावीत व त्यातून पैसा मिळवावा असे सुचवतात. पण या गोष्टी करण्यात मला बिलकुल रस नाही. कारण गेल्या पाच वर्षात समाजमाध्यमावर लिहिलेल्या विचारांची, लेखांची कमीतकमी १०० पुस्तके तर नक्कीच छापून झाली असती. परंतु एकही माय का लाल पुढे आला नाही की मी पुढाकार घेऊन तुमच्या ज्ञान विचारांचे प्रकाशन करतो म्हणून. नुसते वरवर वाचन करायचे, कधीतरी लाईक करायचे व एखादी प्रतिक्रिया द्यायची. असे दर्दी लोकही बोटावर मोजण्याइतकेच! म्हणून मी एकच फेसबुक खाते कायम ठेवीत नाही. सद्या चालू असलेले माझे हे तिसरे फेसबुक खाते आहे. माझा गुगलवर ब्लॉगही आहे पण तिकडे कोणीही पोहोचत नाही. स्वतंत्र फेसबुक पेजही आहे. पण ब्लॉग, पेजची मार्केटिंग करायला मलाच उलट पैसे मागितले जातात. गंमत ही की मी वकिलीतूनच नीट पैसे कमवत नाही मग या लेखप्रपंचातून असले मार्केटिंगचे धंदे करून काय पैसे कमवणार? आणि कोणाला हवा आहे असला पैसा आणि असली प्रसिद्धी ? मी लहान राहण्यातच माझे स्वर्गसुख आहे.🙏

-ॲड.बी.एस.मोरे©१५.६.२०२०