https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ८ जुलै, २०२०

नको ते मोठेपण!

नको ते मोठेपण!

(१) जगात एक तर सगळ्याच गोष्टी मोठ्या हव्या होत्या किंवा सगळ्याच गोष्टी छोट्या हव्या होत्या. म्हणजे सगळीकडे समानता निर्माण झाली असती व त्या समानतेतून जगात नेहमी  सुखशांती नांदली असती. जगात काही गोष्टी मोठ्या व काही गोष्टी छोट्या निर्माण करून निसर्गाने जगात असमानता व अशांतता निर्माण  केली असेच म्हणावे लागेल. जंगलामध्ये वाघ, सिंहासारखे प्रचंड ताकदीचे हिंस्त्र प्राणी निर्माण केले व त्यांचे खाद्य म्हणून ससे, हरणे, माकडे यासारखे अशक्त प्राणी निर्माण केले. निसर्गाने काय साधले असे करून? एकाला मोठे करून दुसऱ्याला छोटे करायचे. मग मोठा छोट्याला कसा आडवा पाडतोय ही गंमत लांबून बघत बसायची. काय म्हणावे या विचित्र खेळाला? कसा नमस्कार करायचा व कशी कृतज्ञता व्यक्त करायची अशा विचित्र निसर्गाविषयी?

(२) रामायणातील रावण विरूद्ध राम युद्ध घ्या किंवा महाभारतातील कौरव विरूद्ध पांडव युद्ध  घ्या. त्यातील पात्रे ही बाहुबळाने व बुद्धीबळाने किती मोठी! ती मोठी म्हणून तर त्यांच्यातील काही मोठ्यांचा अहंभाव मोठा, लोभ मोठा आणि या मोठेपणातून तर ती महायुद्धे घडली ना! त्यांना महान धर्मयुद्धे म्हणतात. पण त्या काळातील सर्वसामान्य जनता या मोठ्यांच्या संघर्षात उगाच भरडली गेली त्याचे काय? आज सुद्धा, अमेरिका, रशिया, चीन सारख्या  देशांतील मोठ्या लोकांची मोठी महत्वाकांक्षा जगाला तिसऱ्या महायुद्धात ओढण्याची भीती   निर्माण झाली आहे. मोठ्यांची मोठी खलबते चालतात आणि आपण सर्वसामान्य माणसे मात्र अर्धवट ज्ञानाच्या जोरावर एकमेकांच्या अंगावर बोरे फेकत बसतो.

(३) नीट विचार करा, आपण जसजसे वयाने मोठे होत गेलो तसतसा आपल्या बालपणीचा तो निर्मळ आनंद हरवत गेलो. आपले मन आपल्या लहानपणी निरागस होते. त्यात हल्ली आपल्या मनात रूजलेल्या अहंभावाचा लवलेश नव्हता. तो नव्हता म्हणून आपले बालपण खूप आनंदी होते. अहंभावाचे विष हे मोठे होण्याने वाढते. मोठेपणाची महत्वाकांक्षा व तसेच त्या महत्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी चाललेली स्पर्धा ही खरं तर अहंभावाचे विष पिण्याची स्पर्धा असते.

(४) आता कोरोना संदर्भात विचार करू. जर आपण कोरोना विषाणू सारखे सूक्ष्म असतो तर आपल्याला या कोरोनाने एवढे सतावले असते का? आपणही त्याच्याएवढेच सूक्ष्म असतो तर त्याला पकडणे आपल्याला सोपे गेले असते. तो आपल्या डोळ्यांना सहज दिसला असता. पण सूक्ष्मदर्शक यंत्रे जवळ असूनही कोरोनाला पकडणे आपल्याला कठीण जातेय. कारण आपण कोरोनापेक्षा खूप पटीने मोठे आहोत. हे मोठेपण अशाप्रकारे महागात पडते.

(५) मला मोठेपण आवडत नाही की मोठेपणा आवडत नाही. छोटा राहण्यातच मला मोठा आनंद मिळतो. म्हणून मला छोटी मुले, पैसा व सत्ता यांनी माझ्यासारखीच छोटी असणारी माणसे यांच्यात मिसळून त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारायला आवडते. मोठे उद्योगपती व मोठे राज्यकर्ते यांच्यापासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. काय जाणो, माझ्या स्वच्छंदी वागण्याने त्यांच्यातील अहंभाव दुखावला गेला तर ते माझी चटणी करतील अशी मला मनातून भीती वाटत असते.

(६) एकदा माझ्या मनात सहज आले की चला मोठ्या लोकांची खुर्ची कशी असते हे त्यात एकदा बसून बघावे. म्हणून एकदा मी ज्या एका सॉलिसिटर फर्ममध्ये सहाय्यक वकील म्हणून काम करीत होतो त्या फर्मचे भागीदार (मोठे  सॉलिसिटर) बाहेर गेले असताना हळूच त्यांच्या  आलिशान खुर्चीवर जाऊन बसलो. माझे दुर्दैव हे की ते सॉलिसिटर बाहेरून पटकन आले. मी त्यांच्या खुर्चीवर बसलोय हे त्यांनी बघितले आणि ते माझ्यावर असे भडकले की सांगायची सोय नाही. "इस खुर्ची पर बैठने की तुम्हारी हिंमतही कैसी हुई, इतना आसान है क्या ऐसी खुर्ची मिलना"? त्यांचे ते शब्द माझ्या कानात इतके टोचले की माणसाला इतकी अहंभावी, गर्विष्ठ बनविणारी असली खुर्चीच आयुष्यात मला नको, असे मी मनात ठरवले आणि त्या क्षणापासून मोठी खुर्ची मिळविण्याचा नाद व समाजात मोठेपणा मिरविण्याचे खूळ मी माझ्या  मनातून काढून टाकले.

-ॲड.बी.एस.मोरे©९.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा