https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ जुलै, २०२०

मोठ्यांच्या कळपात छोटे पाखरू!

मोठ्यांच्या कळपात छोटे पाखरू!

(१) सिनियर वकिलाच्या हाताखाली ज्यूनियर वकील म्हणून काम करीत असताना एका केसच्या निमित्ताने माझी मुंबईतील एका मोठ्या व्यापाऱ्याशी ओळख झाली. तो व्यापारी मोठा हौशी होता. क्लासिकल संगीताची त्यांना खूप आवड होती. ते व्यापारी स्वतः क्लासिकल गायक होते. एकदा त्यांनी मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलात त्याच्या संगीत मैफिलीत येण्याचे मला निमंत्रण दिले. त्या कार्यक्रमाचा पास मला दिला. माझे सिनियर वकील त्यावेळी त्यांच्या काही कामानिमित्त दिल्लीला जाणार होते तेंव्हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून बहुधा मला तो पास दिला असणार.

(२) मी आयुष्यात पंचतारांकित हॉटेलची पायरी चढली नव्हती. आता या कार्यक्रमाला जायचे म्हणजे अंगावर भारी कपडे हवेत. माझ्याकडे तर खूप साधे कपडे होते. माझ्या सिनियर वकिलाकडे कोर्टाच्या काळ्या कोटाबरोबर इतर वेगवेगळ्या रंगाचे भारी कोटस होते. भारी कार होती. माझ्याकडे कोर्टात घालायचा एकमेव काळा कोट होता. आता हा कोट घालून त्या कार्यक्रमाला जावे तर मोठी माणसे माझ्याकडे बघून हसतील. म्हणून काळा कोट घालण्याचा विचार सोडून दिला. मग घरातील इस्त्री केलेली पँट व शर्ट घालून घाबरतच त्या कार्यक्रमाला गेलो.

(३) लोकल ट्रेन व बसने प्रवास करीत मी त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या प्रवेश दारात पोहोचलो. पण त्या दारातच मला धडकी भरली. कारण सगळे लोक कारमधून उतरूनच त्या हॉटेलात प्रवेश करीत होते. प्रवेशद्वारातला तो मिशीवाला द्वारपाल माझ्यापेक्षा रूबाबदार दिसत होता. शेवटी त्या द्वारपालाला मी माझ्या जवळचा कार्यक्रमाचा पास दाखवला. त्याने मला वर पासून खाली पर्यंत असा न्याहाळला की मी आतून घामाघूम झालो. मग त्याने रूबाबात सांगितले की "जाव, उपर पहले मालेपे एक हॉल है उसमे यह कार्यक्रम है उसमे घूस जाव"!

(४) मग मी हळूहळू महागड्या गालिचावरून पायऱ्या चढू लागलो. त्यावेळी मी जणूकाही स्वर्गाच्या पायऱ्या चढत आहे असा भास होत होता. शेवटी हळूच त्या पहिल्या माळ्यावरील हॉलमध्ये घुसलो. आत मध्ये मोठमोठी माणसे म्हणजे श्रीमंत स्त्रिया व पुरूष भारी भारी कपडे अंगावर घालून बसली होती. मधोमध छोटेसे स्टेज होते. त्या स्टेजवर मला पास देणारे ते श्रीमंत व्यापारी त्यांच्या काही साथीदारांबरोबर हातात हार्मोनियम घेऊन बसले होते. हॉलमध्ये  माझ्यापेक्षा भारी कपडे व टाय घातलेले वेटर्स तिथे बसलेल्या लोकांना स्टार्टर नाष्टा देत फिरत होते. माझ्याकडे ते अशा नजरेने बघत होते की जणूकाही मी त्या मैफिलीत घुसलेला कोणी चोर तर नाही ना! मला तर तो व्यापारी सोडून कोणीच ओळखत नव्हते. तो व्यापारी तर लांब त्या स्टेजवर हातात हार्मोनियम घेऊन बसलेला.

(५) शेवटी मी हिंमत करून हळूच पुढे गेलो आणि त्या स्टेजजवळच जाऊन उभा राहिलो आणि त्या व्यापाऱ्याला अदबीने नमस्कार केला. नशीब त्या व्यापाऱ्याने मला ओळखले. त्या स्टेजवरूनच तो व्यापारी म्हणाला "अरे आव मोरे आव, इधर मेरे सामने बैठो"! (वयाने तो व्यापारी मोठा असल्याने व मी ज्यूनियर वकील असल्याने तो व्यापारी मला बिनधास्त अरे तुरेच करायचा, पण मला तेच आवडायचे कारण त्यात प्रेमाचे भाव जास्त होते). त्या व्यापाऱ्याचे ते शब्द त्या वेटर्सनी ऐकले आणि मग मात्र माझा रूबाब वाढला. त्या वेटर्सनी मला स्टेजसमोरच खुर्ची दिली व निरनिराळे पदार्थ माझ्यासमोर पुढे केले. आता यातले काय उचलायचे असा विचार करीत असतानाच तो व्यापारी मोठ्याने म्हणाला "अरे लेव मोरे लेव, जो मंगताय वो लेव, मेरा गाना सुनने के पहिले तुमको थोडा खानाही पडेगा"!

(६) मग इकडेतिकडे बघत त्यातले काही पदार्थ  लाजत लाजत उचलले व तोंडात टाकले. मग त्या व्यापाऱ्याची ती संगीत मैफिल सुरू झाली. ती जवळजवळ दोन तास चालली. पाठीमागून वाहव्वा, वाहव्वा असे आवाज येत होते. मला तर ते क्लासिकल संगीत बिलकुल समजत नव्हते. हिंदी चित्रपटातील जुनी गाणी व मराठी चित्रपटातील लावण्या गुणगुणणारा मी माणूस आयुष्यात पहिल्यांदाच ते तसले क्लासिकल संगीत ऐकत होतो. खरंच सांगतो की मला त्या संगीतातले काहीही कळत नव्हते. जाम बोअर झालो होतो. हळूच सटकावे तर तसे सटकताही  येत नव्हते. कारण त्या व्यापाऱ्याच्या समोरच माझी खुर्ची ठेवली होती. तो सन्मान (खरं तर तो सन्मान माझा नव्हताच मुळी, तो तर माझ्या सिनियर वकिलांचा सन्मान होता) मला जाम भारी पडला. कधी यातून सुटका होतेय असे होऊन गेले होते. शेवटी दोन तासांनी ती संगीत मैफिल संपली आणि सुटका झाली एकदाशी असे मी मनातल्या मनात पुटपुटलो. पण शेवटी त्या व्यापाऱ्याने हाक मारून मला म्हटलेच "क्या कैसा लगा मेरा गाना"? आता या प्रश्नाला  काय उत्तर देणार होतो मी! पण शेवटी तोंडावर खोटा आनंद दाखवत म्हणालोच "बहोत अच्छा गाया सर आपने"!

(७) मग मैफिलीत सामील झालेली ती सगळी श्रीमंत मंडळी हातात थाळ्या घेऊन फिरत तिथले पदार्थ घेऊन खाऊ लागली. ते वेगवेगळे भारी पदार्थ नुसते बघूनच माझे अर्धे पोट भरले. आता थाळी कशी घ्यायची व त्यात पदार्थ कसे टाकून घ्यायचे व उभ्यानेच कसे खायचे याचा विचार करीत असतानाच दोन मध्यमवयीन श्रीमंत स्त्रिया माझ्याजवळ आल्या. बहुतेक त्यांना माझी दया आली असावी. त्यांनी माझ्या हातात थाळी देऊन स्वतःहून माझ्या थाळीत पदार्थ टाकायला सुरूवात केली. त्या पदार्थांची ओळख करून देत त्या स्त्रिया माझी ओळख करून घेत होत्या. मी गरीब घरातला आहे हे कळल्यावर तर त्यांनी मला खूप मदत केली. नको नको म्हणत असताना माझ्या थाळीत बदामाचा गोड हलवा टाकला व मला उभे राहून खाता येत नाही ही माझी अडचण ओळखून त्यांनी एका डायनिंग टेबलची माझ्यासाठी सोय करून दिली. श्रीमंत माणसेही मनाने चांगली असतात हा माझा तो अनुभव होता. पण तरीही श्रीमंतांच्या कळपात मला अजूनही सहजपणे वावरता येत नाही. शेवटी त्या स्त्रियांचे व त्या व्यापाऱ्याचे खूप प्रेमाने आभार मानून मी त्या मैफिलीचा निरोप घेतला.

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा