https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २० जुलै, २०२०

विषाणूचा पाठलाग!

विषाणूचा पाठलाग (चेसिंग द व्हायरस)!

(१) बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाचे डार्विन या शास्त्रज्ञाने पुराव्यानिशी खूप छान विश्लेषण केले आहे. या नियमाला इंग्रजीत survival of the fittest म्हणतात. निसर्गाने पृथ्वीवर जीवन निर्माण केले आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसाने सद्या अलगीकरण व विलगीकरण या ज्या पद्धती  अंमलात आणल्या आहेत त्यातील अलगीकरण पद्धतीचा अवलंब करून निसर्गाने मानवेतर जीवन व मानवी जीवन यांचे अलगीकरण केले, पण विलगीकरण केले नाही. तसे केले असते तर काल गटारीला मांसाहारी माणसांना मटण खाताच आले नसते. निसर्गाने अलगीकरण तर केले पण बळी तो कानपिळी हा नियम दोन्ही जीवनांत समान ठेवला.

(२) काय समानता साधलीय बघा या निसर्गाने कायद्याच्या बाबतीत! पुन्हा गंमत अशी की, बळी तो कानपिळी या निसर्गाच्या कायद्याचा नियम समान पण बळाचे प्रकार वेगळे! म्हणजे मानवेतर प्राण्यांना शारीरिक बळ दिले पण त्यांना बौद्धिक बळात कमकुवत ठेवले आणि माणसांना बौद्धिक बळात सामर्थ्यशाली केले पण शारीरिक दृष्ट्या कमकुवत केले व तसे करून दोन्ही जीवनांत झेंगाट लावून दिले. बरं, निसर्ग इतकेच करून गप्प बसला नाही तर मानवेतर प्राण्यांच्या शारीरिक बळात पण त्याने दुजाभाव केला. वाघ, सिंहासारख्या प्राण्यांना हरणे, ससे या प्राण्यांपेक्षा इतके सशक्त केले की हरणे, ससे यांच्यासारख्या शरीराने अशक्त असलेल्या प्राण्यांनी त्यांचा आत्मविश्वास किंवा मनोबल वाढविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात ते कधीही यशस्वी शकणार नाहीत. एकटेच काय हे असे सगळे अशक्त प्राणी एकवटले तरी त्या अशक्त एकीचा वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र, सशक्त प्राण्यांना काही फरक पडणार नाही. बिचाऱ्या अशक्त प्राण्यांना हे सशक्त प्राणी शरीर (बाहु) बळाच्या बाबतीत चितपट करणार आणि त्यांना खाऊन टाकणार अशीच त्या डोकेबाज निसर्गाची अफलातून योजना!

(३) पण या सर्व बाहुबली प्राण्यांना पुरून उरली ती माणसाची तीक्ष्ण बुद्धी! निसर्गाने माणसाला असे बुद्धीबळ बहाल केले की त्याने भल्या भल्यांची वाट लावली. ज्या निसर्गाने हे असे बुद्धीबळ माणसाला प्रदान केले ते बुद्धीबळ नंतर निसर्गालाही भारी पडू लागले. मग निसर्ग व माणूस या दोघांतच मोठा खेळ सुरू झाला. मानवी बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी मग निसर्गाने काहीना काहीतरी आव्हाने निर्माण करायला सुरूवात केली. निसर्गाने अशी आव्हाने निर्माण करायची आणि मग मानवी बुद्धीने ती परतून लावायची असा तो जबरदस्त खेळ सुरू झाला. कोरोना विषाणूची सद्याची दहशत हा याच खेळाचा भाग आहे. माणसाच्या बुद्धीला घायकुतीला आणायचे निसर्गाचे केवढे मोठे हे षडयंत्र? माणसा माणसांमध्येच भांडणे लावून दिली निसर्गाने! अमेरिका चीनला दोष देतेय तर चीन अमेरिकेला भीक घालत नाही. तर मध्येच जागतिक आरोग्य संघटना रोज नवे नवे फतवे काढतेय!

(४) लोकमतच्या दिनांक १८ जुलै, २०२० च्या अंकात छापून आलेली एक बातमी मी वाचली. ही बातमी खूप छोटी आहे पण तिचा अर्थ खूप मोठा आहे. बातमी अशी आहे की, स्पेनच्या एका शेतात ८७ मिंक प्राण्यांना (जे सशासारखे दिसतात) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने स्पेनचे सरकार तिकडच्या ९२७०० मिंक प्राण्यांना कसलीही दयामाया न दाखवता ठार करणार आहे. आता ही प्रचंड मोठ्या प्रमाणातील प्राणी हिंसा होत असताना तिकडचे काय आणि इकडचे काय प्राणी मित्र काहीही करू शकणार नाहीत. कारण मानवी बुद्धी ही मानवेतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याने ती शेवटी मानवाचे अस्तित्व कसे टिकेल याचाच विचार करणार. आला ना शेवटी निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम पुढे! वासना व भावना यात संतुलन साधणाऱ्या बुद्धीला न्याय किंवा विवेकी बुद्धी म्हणतात. केला ना न्याय याच बुद्धीने मिंक प्राण्यांचा!

(५) कोरोना विषाणूचा हा असा पाठलाग सुरू आहे मानवी बुद्धीकडून! इंग्रजीत या मोहिमेचे "चेसिंग द व्हायरस" असे नामकरण केले गेले आहे. याच मोहिमे अंतर्गत आता पालिका कर्मचारी पोलीस बळ (बळी तो कानपिळी हा नियम आलाच ना शेवटी) सोबत घेऊन घरोघरी अँटीजेन चाचणी किटस घेऊन फिरणार व या विषाणूचा "चेसिंग द व्हायरस" या मोहिमे अंतर्गत जोरात पाठलाग करणार. समजा या अँटिजेन मशीनने चहा व खारीबटर खाऊन घरामध्ये लॉकडाऊन करून अगदी व्यवस्थित जगणाऱ्या माझ्या सारख्या ६४ वर्षाचे वय असलेल्या माणसाला चुकून कोरोनाग्रस्त म्हणून घोषित केले तर मग आमची रवानगी सरळ कुठे होणार तर त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये का तर ती अँटिजेन मशीन तशी सांगते म्हणून!

(६) हल्ली माणसाचा स्वतःपेक्षा अशा यंत्रांवरच विश्वास जास्त वाढलेला दिसतोय. म्हणून तर आता निवडणूकांत ईव्हीएम मशिनचा वापर अगदी डोळे झाकून केला जातो. आता तर ते अॉनलाईन शिक्षण, अॉनलाईन व्यवहार पुढे आलेत. माणूस आता हळूहळू यंत्रवत होऊ लागलाय. माणसाची नैसर्गिक बुद्धी हळूहळू यंत्राच्या कृत्रिम बुद्धीकडे गहाण पडू लागलीय.

(७) मी तर आता वयानुसार किंवा कदाचित त्या कोरोनामुळे सुद्धा मरण्याची शक्यता आहेच. पण मरताना या गोष्टी बघवत नाहीत की, लोक कोरोना झालेल्या माणसांना वाळीत टाकतात. इतकेच काय पण कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर त्या व्यक्तीचे फार जवळचे नातेवाईक सुध्दा त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मग त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार परस्पर सरकारी कर्मचाऱ्यांकडून किंवा स्वयंसेवी संस्थांकडून केला जातो. असे मृतदेह बेवारस होतात, पण अशा व्यक्तीने मागे ठेवलेल्या संपत्तीवरील वारसा हक्क मात्र ही नातेवाईक मंडळी सोडत नाहीत. कोरोनामुळे मृत झालेल्या व ज्याचा मृतदेह बेवारस ठरवला जातो अशा माणसाची संपत्ती सरकारजमा करायला मात्र ही नातेवाईक मंडळी तयार होत नाहीत. तो वारसा हक्क त्यांना हवाच असतो. खरंच, या कोरोनाने जगाची खरी रीत व सत्य परिस्थिती दाखवून दिली. माणसाला निसर्ग या काय गोष्टी दाखवून राहिलाय व का याचेच माझ्या बुद्धीला आश्चर्य वाटतेय!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.७.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा