https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १६ जुलै, २०२०

चिंध्या चिवडणारा माणूस!

चिंध्या चिवडणारा माणूस!

(१) माणूस बुद्धीमान आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने विश्वात विखुरलेल्या अनेक गोष्टींना चिवडत व त्या गोष्टींतील विविधता चोखत बसतो. विज्ञान, धर्म, तत्वज्ञान हे झाले मूलभूत चिवडणे आणि मग त्यावर आधारित तंत्रज्ञान, कला, क्रीडा,अर्थकारण, राजकारण व कायदा हे झाले चोखणे. या बौद्धिक उचापती करीत असताना माणूस शारीरिक धावपळही करीत असतो. या सर्व चिवडाचिवडीतून तो काय मिळवतो तर मिळकत म्हणजे स्थावर व जंगम मालमत्ता. मी माझ्या बुद्धीने आयुष्यभर अशाच चिंध्या चिवडत बसलो आणि शेवटी मिळकत काय मिळविली तर मुंबईपासून लांब असलेल्या डोंबिवलीत ५५० चौ. फूटाची एक वन बीएचके सदनिका आणि तीही एका जुन्या इमारतीत.

(२) माणसाची मिळकत स्थावर असो की जंगम त्या मिळकतीवरील माणसाची मालकी कोण ठरवणार तर माणसांनीच बनवलेले सरकार! बरं, मिळकत म्हणजे नुसती स्थावर व जंगम मालमत्ताच नसते तर त्यात माणसाचे शरीर व त्याचे मनही येते. माणसाच्या शरीरावर होणारे अत्याचार व बलात्कार व मनाचा होणारा छळ या गोष्टींपासून सुरक्षितता कोण देणार तर तेच सरकार जे माणसांनीच बनवलेले असते.

(३) निसर्गातील देव माणसाचे संरक्षण करतो की माणसाला जगण्याची प्रेरणा व लढण्याची शक्ती देऊन माणसालाच लढत जग म्हणतो? यासाठीच तर माणसांनी माणसांसाठी स्वतःचे स्वतंत्र सरकार बनवलेय ना! निसर्गातील देव दिसत नाही म्हणून मग हे आपलेच दिसणारे सरकार असाच काहीसा प्रकार! पण हे सरकार व या सरकारचे कायदे असतानाही माणसाची नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकी व त्याचे शरीर व मन सुरक्षित आहे का? तसे असते तर मालमत्तेच्या सीमावादावरून खून पडले नसते, शरीरावर अत्याचार, बलात्कार झाले नसते व मानवी मनाचा छळ झाला नसता. या गोष्टी तर चालूच आहेत.

(४) कारण या सरकारमध्ये शेवटी कोण आहेत तर माणसेच जी त्यांचा मूळ स्वार्थ, ढोंगीपणा, बावळटपणा, हिंसकपणा सोडत नाहीत. या मूळ मानवी स्वभावामुळे माणसांचे सरकार हे आतून पोखरलेले व अंतर्गत विश्वास, ताळमेळ नसलेले असते. ते माणसांना देऊन देऊन किती संरक्षण देणार? या सरकारने कितीही चांगले कायदे केले तरी सरकारमध्ये ताळमेळ नसेल तर या कायद्यांचा माणसांवर  वचक, धाक रहात नाही.

(५) निसर्गाचे विज्ञान त्यातील विविध पदार्थ व मूलभूत व्यवस्थेसह माणसाला नीट कळलेय का? तसे असते तर मग या विज्ञानाच्या बरोबर धर्म व तत्वज्ञान या गोष्टींची माणसाला गरज का भासते? त्यात तरी एकवाक्यता आहे का? तशी असती तर समाजात धार्मिक व तात्त्विक वादच निर्माण झाले नसते. खरं तर, निसर्गात असते वेगळेच आणि माणसे माणसांना दाखवतात भलतेच! असे भलतेच दाखवून अशा खोट्या गोष्टींवर समाजात निरर्थक चर्चा, वादविवाद व हाणामाऱ्या घडवून आणण्यात काही लोकांचा दुष्ट हेतू असतो. अशी दुष्ट माणसे सरकार मध्ये असतील तर मग सरकार नावाच्या व्यवस्थेला कीड लागली म्हणूनच समजा!

(६) मला एवढेच म्हणायचे आहे की, खरंच निसर्गातील नैसर्गिक गोष्टी एवढ्या अवघड, गुंतागुंतीच्या आहेत का? की त्या माणसानेच त्याच्या स्वार्थापोटी खूप अवघड, गुंतागुंतीच्या करून टाकल्यात? माणसाला सरळसाधे, सोपे जीवन जगता येत नाही का? विज्ञान, धर्म, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, अर्थकारण, राजकारण व कायदा या गोष्टी चिवडून नव्हे तर त्यांचा अक्षरशः बौद्धिक कीस पाडून शेवटी मी काय मिळवले तर ५५० चौ. फूटाची एक जुनी वन बीएचके सदनिका! यासाठीच का मी केला एवढा मोठा अट्टाहास?

(७) माझे सोडा, पण शेवटी ज्यांनी भरपूर पैसा, संपत्ती, सत्ता या गोष्टी मिळविल्यात त्यांच्या हातात तरी शेवटी काय राहणार आहे? या सर्व गोष्टींच्या मागे आयुष्यभर धावताना सरळसाधे जीवन जगण्यात जो आनंद आहे, जी शांती आहे ती त्यांनी गमावलीय का? भरपूर बौद्धिक कसरत करून मी मिळवलेले भरपूर ज्ञान काय किंवा सत्ता, संपत्तीच्या मागे धावून भरमसाट प्रमाणात मिळवलेल्या या गोष्टी काय, शेवटी या सर्व चिंध्याच! पण माणसाला चिंध्या चिवडत शेवटी हातात गाळ घेऊन मरण्यातच जर आनंद वाटत असेल तर त्याला तो महान निसर्ग तरी काय करणार!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.७.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा