https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १० जुलै, २०२०

देवाला माना, पण कर्मकांडे सोडा!

देवाला माना, पण देवाची कर्मकांडे सोडा?

(१) निरीक्षण, तर्क(गृहीत), परीक्षण व अनुमान या विज्ञानाच्या चार पायऱ्या पार पाडल्यानंतरच निसर्गाचे सत्य कळते. आपण जेंव्हा निसर्गाचे म्हणजे आपल्या आजूबाजूला पसरलेल्या सृष्टी किंवा विश्वाचे निरीक्षण करतो तेंव्हा त्या सृष्टीत आपल्याला पदार्थ व त्या पदार्थांची हालचाल जाणवते. मग या निरीक्षणातून त्या पदार्थांच्या  हालचालीमागे काय तथ्य किंवा सत्य असावे याविषयी कुतूहल निर्माण होते. ते तथ्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मग आपल्या तार्किक बुद्धीनुसार आपण त्या तथ्याविषयी अंदाजे एखादा तर्क काढतो. पण नुसत्या तर्कावर तथ्य कळत नाही म्हणून मग आपण त्या तर्कानुसार पदार्थांच्या हालचालीचे परीक्षण करतो. त्या परीक्षणातून आपल्याला काय कळते तर निसर्गाची प्रक्रिया व ही नैसर्गिक प्रक्रिया हेच सत्याचे अनुमान असते, तथ्याचा निष्कर्ष असतो. पण तरीही निसर्गाच्या मागे व निसर्गातील पदार्थांची हालचाल घडवणाऱ्या  नैसर्गिक प्रक्रियेमागे कोणते तरी खूप बुद्धीमान व खूप शक्तीमान केंद्र कार्यरत असावे हा तर्क राहतोच. हा तर्क निसर्गाची होणारी पद्धतशीर हालचाल व त्यामागील प्रमाणबद्ध नैसर्गिक प्रक्रिया किंवा पद्धत यांच्या निरीक्षणावरच आधारित असतो. पण निरीक्षण व या शक्ती केंद्राबाबतचा तर्क या दोन पायऱ्यांच्या पुढे वैज्ञानिक गाडी सरकत नाही. म्हणजे या तर्काचे परीक्षणच करता येत नाही, मग अनुमान किंवा निष्कर्ष कुठून काढणार? त्यामुळे निसर्गातील शक्ती केंद्राचे किंवा देवाचे अस्तित्व हे तर्काच्या पुढे जातच नाही.

(२) नंतर प्रश्न असा निर्माण होतो की देवाच्या तर्काला किंवा संकल्पनेला पुराव्याने सिद्ध केलेल्या अनुमानाशिवाय खरे कसे मानायचे? केवळ तार्किक अंदाजावर निसर्गात देव आहे असे मानून चालायचे तर मग देवाचे कोणते एक स्वरूप किंवा प्रारूप समोर ठेवायचे. निसर्गात दैवी शक्ती केंद्र किंवा देवांश (गॉड पार्टिकल) एकच आहे हा तर्क अंदाजाने खरा धरावा तर मग असा एकमेव देव समोर कुठून आणायचा? केवळ निसर्ग तुकड्या तुकड्यांत विखुरलाय म्हणून देवालाही तुकड्या तुकड्यांत बघत त्या तुकड्यांच्या पाया पडायचे का?

(३) म्हणून आस्तिक होऊन निसर्गातील देवाचे अस्तित्व तर्काने किंवा अंदाजाने मानायचे तर समोर देवाचे कोणतेही स्वरूप किंवा प्रारूप न ठेवता ते मानावे लागेल. मग देवाला होणारा आपला नमस्कार हा अधांतरी करावा लागेल व प्रार्थनाही हवेत करावी लागेल. या नमस्काराला व अशा प्रार्थनेला मग कसलीही व्रतवैकल्ये, कर्मकांंडे चिकटवणे चुकीचेच होणार. "जगात शांती नांदो ईश्वरा", या ईश्वर प्रार्थनेने जगात शांती नांदत नाही हे माहीत झाल्यावरही पुन्हा पुन्हा ती प्रार्थना म्हणणे हे निरर्थक कर्मकांडच होय! अशा कर्मकांडात गुंतून राहणे हे चुकीचे आहे.

(४) विज्ञानाच्या अभ्यासातून व प्रयोगांतून एक महत्त्वाची गोष्ट कळलीय आणि ती म्हणजे मनुष्याचा जन्म पृथ्वीच्या वातावरणात होतो, जन्मल्यावर मनुष्य त्याचे जीवन याच पृथ्वीच्या वातावरणात जगतो व शेवटी त्याच्या जीवनाचा शेवट याच पृथ्वीच्या वातावरणात मृत्यूने होतो. म्हणजे शेवटी जन्मणे, जगणे व मरणे हे सर्व काही इथेच पृथ्वीच्या वातावरणात होत असते. याचा अर्थ काय तर मनुष्य व ब्रम्हांडात अंदाजे असलेला सूक्ष्म आकारातील देव यांच्यातील संपर्काचे माध्यम कोणते तर पृथ्वीच! त्यानंतर दुसरे माध्यम कोणते तर मनुष्याचे शरीर व त्या शरीराच्या मेंदूत असलेले मन! याच मनातील नैसर्गिक वासना व भावना यांचे योग्य नियोजन व नियंत्रण करणाऱ्या बुद्धीला ईश्वर संपर्काचे माध्यम मानले की तीच बुद्धी म्हणते की तर्क आहे म्हणून अंदाजाने देवाला माना पण त्याची निरर्थक कर्मकांडे सोडा! बुद्धी पुढे असेही म्हणते की नुसते देवाचे नित्य स्मरण व प्रार्थना  करून काही जीवनात शांती मिळत नसते तर बुद्धीने नीट विचार करून बुद्धीच्या विवेकी कृतीनेच शांती मिळत असते. म्हणून बुद्धीचा विवेकी मार्ग हाच ईश्वरी शांतीचा मार्ग! बुद्धीच्या विवेकात ईश्वराचे दर्शन व अनुभूती घ्यायला हवी अशी बुद्धी सांगते. अंदाजाने देवाला माना पण देवाची कर्मकांडे सोडा, असेच आस्तिक पण वैज्ञानिक बुद्धी सांगते.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा