https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ३० जुलै, २०२०

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी वगैरे लिहित नसतो. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. घरात वहीत लिहून स्वतःच त्याकडे बघत बसण्यापेक्षा चारचौघात विचार जाण्यासाठी फेसबुक हे माध्यम छान व व्हॉटसअप पेक्षा मोठे वाटले म्हणून मी फेसबुकवर! पण यात अनेक प्रकारचे वाचक असल्याने गडबड ही होतेच अधूनमधून! पण त्या हनी ट्रॕप घटनेमुळे आता समाजमाध्यमावरच काय तर इतर कोणत्याही अॉनलाईन संभाषणात सावध राहिले पाहिजे हे मात्र नक्की! या घटनेनंतर मी फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारलेली काही खाती तपासली तर अनफ्रेंड करताना गायब झाली. म्हणजे ती फेक होती. वृत्तपत्रात लिखाण छान पण तिथे ओळख हवी, आतल्या गोटात उठबस हवी. पूर्वी मी लिहायचो तिकडे पण संपादक महाशय लिखाणातला मूळ आशयच कट करायचे आणि बऱ्याच वेळा लिखाणाला प्रतिसादच देत नसायचे. म्हणजे आपण ढ व ते हुशार असा काहीसा प्रकार. इथे फेसबुकवर तसे काही नसते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होऊ शकता. मी दुसऱ्यांचे लिखाण आवडले तर त्यांच्या नावानेच ज्ञान संवर्धनासाठी पोस्ट करतो. पण ती पोस्ट माझी नाही हे जाहीर करतो. पण ९०% लिखाण हे माझे स्वतःचे मूळ लिखाण असते व म्हणून ते माझ्या नावानेच प्रसिद्ध करतो. ज्ञान, चिंतन व मनन यातून मनात निर्माण होणाऱ्या वैविध्यपूर्ण विचारांमुळे व लिखाणाच्या आवडीमुळे, त्या छंदामुळे व तसेच लोकांबरोबर ज्ञान, विचार शेअर करण्यात मला स्वतःला आनंद मिळतो म्हणून मी इथे फेसबुकवर वाचकांच्या सोबत व्यक्त होत असतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा