https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २० जुलै, २०२०

देवा, विश्व शांती!

देवा, विश्व शांती!

(१) खरं तर, देवश्रद्ध आस्तिकाकडून एवढी ईश्वर प्रार्थना पुरेशी आहे. देवा या शब्दात  जगातील सर्व देव आले, विश्व या शब्दात विश्व आले किंवा निसर्ग आला व शांती या शब्दात मनाचे मोठे समाधान आले, परमोच्च आनंद आला. वैश्विक शांती मध्ये स्वतःची शांतीही आली.

(२) पण विश्वात किंवा निसर्गात देव आहे ही फक्त श्रध्दा आहे व श्रध्दा ही फक्त भावनिक असते. ही भावना प्रत्यक्षात उतरण्यासाठी म्हणजेच श्रध्देचे रूपांतर विश्वासात होण्यासाठी देव हा प्रत्यक्षात दिसला पाहिजे.

(३) आता न दिसणाऱ्या देवापुढे विश्व शांतीची केलेली प्रार्थना ही सुध्दा मानवी मनाची चांगली भावना आहे. पण या भावनेचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत होण्यासाठी देवाशी प्रत्यक्षात संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे. तसा संपर्क निर्माण झाल्याशिवाय विश्व शांती, कल्याण योजनेत देवाने काय मदत केली पाहिजे व तुम्हाला या योजनेत काय योगदान द्यायला हवे यावर देव व तुम्ही असे दोघांना समोरासमोर बसून नीट चर्चा कशी करता येईल? पण तसे काहीच करता येत नसल्याने देव श्रध्दा व देव प्रार्थना हवेत विरून जातात.

(४) देवाची व विश्व शांती, कल्याणाची भावना अशी हवेत विरून गेल्यावर मात्र निसर्गाची प्रत्यक्ष जाणीव (जी वासनिक व भावनिक अशी संमिश्र असते) व स्वतःची बुद्धी या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. नैसर्गिक जाणिवांशी बुद्धीची मैत्री हाच मानवी जीवनाचा व मानवी प्रगतीचा पाया आहे.

(५) पृथ्वीभोवती हवेचे जे वातावरण आहे ते वजनाने हलके आहे. पण या वातावरणाला चिकटलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमीन व पाणी या दोन गोष्टी वजनाने जड आहेत. या गोष्टी एकमेकांना चिकटलेल्या आहेत.

(६) आपल्या हलक्या फुलक्या मनाची तुलना हवेशी तर आपल्या जड शरीराची तुलना जमीन, पाणी यांच्याशी करता येईल. याच विचाराने प्रेम, करूणा यासारख्या आपल्या पूरक नैसर्गिक भावनांची तुलना हवेशी तर तहान, भूक, लैंगिकता यासारख्या आपल्या मूलभूत नैसर्गिक वासनांची तुलना जमीन, पाणी यांच्याशी करता येईल.

(७) हवा, मन व मनातील भावना या तिन्ही गोष्टी वजनाने हलक्या असल्या तरी त्यांची प्रत्यक्षात जाणीव होते म्हणजे त्या प्रत्यक्षात अनुभवता येतात. कारण त्या जड असलेल्या भौतिक वासनांना चिकटलेल्या असतात. पण देवाच्या भावनिक श्रध्देचे रूपांतर मात्र प्रत्यक्ष जाणिवेत व अनुभवात होत नाही. त्यामुळे तिथे बुद्धीचे काहीच चालत नाही. देवश्रद्धेच्या भावनेत प्रत्यक्ष जाणीव, अनुभव नसल्याने या भावनेशी बुद्धीची मैत्री होऊ शकत नाही.

(८) प्रेम, करूणा या नैसर्गिक भावनांची प्रत्यक्ष जाणीव होत असल्याने, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत असल्याने या भावनांशी बुद्धीला मैत्री करता येते. बुद्धीला नुसती मूलभूत वासनांशी मैत्री करून चालत नाही तर पूरक भावनांशीही मैत्री करावी लागते व या मैत्रीतून वासना व भावना यांच्यात योग्य संतुलन साधावे लागते. असे संतुलन साधता येणाऱ्या बुद्धीला विवेकी किंवा न्याय बुद्धी म्हणतात.

(९) प्रेम, करूणा या भावनांना भूक, लैंगिकता या वासनांचे भौतिक जडत्व प्राप्त झालेले आहे. पण तसे भौतिक जडत्व देवावरील भावनिक श्रद्धेला प्राप्त होऊ शकत नाही आणि जिथे असे भौतिक जडत्व नाही म्हणजे जिथे फक्त आणि फक्त आध्यात्मिक भावना आहे तिथे बुद्धीचे काम नाही. म्हणून कितीही घोळ घोळ घोळले तरी बुद्धीला केवळ भावनेवर आधारित असलेली देव श्रद्धा पटणे ही गोष्ट शक्यच नाही. म्हणून देवाला व देवाच्या विश्व शांतीच्या निव्वळ  भावनिक प्रार्थनेला फक्त भावनेवर म्हणजे फक्त हवेवर सोडून देऊन बुद्धी त्यापासून स्वतःला मोकळी करून घेते व तिच्या नैसर्गिक कामाला लागते.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा