https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २१ जुलै, २०२०

अती शहाणा त्याचा बैल रिकामा!

शिक्षणाने माणूस अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होतो का?

सद्या कोरोनाच्या भीतीमुळे सरकारने धार्मिक प्रार्थनास्थळे, देवस्थानांना कुलूप लावून त्यांचे लॉकडाऊन केले असले तरी त्यामुळे लोकांची देवावरील श्रद्धा बिलकुल कमी होणार नाही. उलट आता ती श्रद्धा जास्त वाढेल असे माझे मत आहे. खाजगी रूग्णालयातील लाखांच्या घरातील बिले बघितली आणि मग धर्माची चाड नसलेले विज्ञान किती मोकाट सुटू शकते याची जाणीव या कोरोनानेच मला करून दिली. एक कोरोना विषाणू जगातील वैज्ञानिक प्रगतीचे जर तीन तेरा वाजवू शकतो तर मग या विज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवणे ही सुद्धा एक मोठी अंधश्रद्धाच आहे असेच मी म्हणेन. शिक्षण कमी होते तेंव्हा किती आनंदी व शांत होतो मी! लहानपणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जायचो तेंव्हा निरागस भावनेने त्या सावळ्या विठ्ठल मूर्तीकडे बघत बसताना केवढा मोठा आधार वाटायचा मला त्या मूर्तीचा व केवढा मोठा आनंद व्हायचा मला त्या सुंदर मूर्तीकडे बघत बसण्याचा! कारण माझी त्यावेळी देवावरील श्रद्धा मजबूत होती. तिला कोणी भोके पाडली नव्हती. पण जसजसा मी मोठा होत गेलो व अधिक शिक्षण घेत गेलो तसतशी माझी देव श्रद्धा डळमळीत होऊ लागली. माझे मन अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होत गेले आणि अतीशहाणा होऊन मी देवालाच उलट प्रश्न विचारू लागलो. पुढे पुढे तर देवाचे अस्तित्वच नाकारत नास्तिकतेकडे झुकू लागलो. आणि मग हा कोरोना आला! या कोरोनाने माझे डोळे खाडकन उघडले. कुठे येऊन पोहोचलो होतो मी अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होऊन! देवालाच उलट प्रश्न करायला लागलो मी! आता मी मलाच प्रश्न करतोय की, निसर्ग विज्ञानात धर्म नावाची गोष्ट नाही काय? त्या निसर्गात देव नाही काय? विज्ञाननिष्ठ होणे म्हणजे अधार्मिक होणे काय? बुद्धीवादी होणे म्हणजे भावनेचा, देवावरील श्रध्देचा चोळामोळा करून टाकणे काय? निसर्गाचे वैज्ञानिक सत्य कळण्यासाठी मला नास्तिक होणे ही पूर्वअट आहे काय? आस्तिक राहून मी नैसर्गिक वागू शकत नाही काय? आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक वागणे म्हणजे तरी काय? नैसर्गिक वर्तनात जर नैतिकता येते तर मग धर्माचा भाग आलाच ना! म्हणजे निसर्गाच्या विज्ञानात धर्म आला. आता या धर्मात देव आणायचा की नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा व बुद्धीचा प्रश्न! नास्तिक लोक म्हणतील की नैतिक वागायला देवच कशाला हवाय? मग पुढे ते असेही म्हणतील की विज्ञानात धर्म कशाला हवाय? काहीजण तर असेही म्हणतील की, नास्तिक व्हायला हिंमत पाहिजे. पण या कोरोनाने हे सर्व प्रश्न माझ्यासाठी तरी निकालात निघाले आहेत. मला देवाची भीती वाटत नाही तर आधार वाटतो आणि मरतानाही हा आधार घेऊनच मला मरायचेय! भले नास्तिकांच्या दृष्टिकोनातून  हा आधार आभासी असेल. मला एवढे मात्र कळते की, मानवी बुद्धीचे व ज्या विज्ञानाच्या जोरावर ती उड्या मारते त्या विज्ञानाचे बऱ्याच गोष्टींवर बिलकुल नियंत्रण नाही. आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रियांचेच घ्या! आपल्या  बुद्धीला या अनैच्छिक क्रियांवर तिच्या ऐच्छिक इच्छाशक्तीच्या जोरावर किती नियंत्रण ठेवता येते? ही मानवी बुद्धी त्या पृथ्वीला उलटी का फिरवू शकत नाही? जन्म, जीवन, मृत्यू या जीवनचक्रावर या मानवी बुद्धीचे किती नियंत्रण आहे? निसर्गाच्या या विज्ञानावरच जर मानवी बुद्धीचे पूर्ण नियंत्रण नाही तर मग या बुद्धीला शेवटी शरणागती स्वीकारणे आलेच ना! आता नास्तिक निसर्गाच्या ताकदीला मानतील पण देवाला मानणार नाहीत. तो त्यांचा प्रश्न आहे. मला मात्र आता म्हातारपणी माझा हा असला अती बुद्धीवादाचा, अती विज्ञानवादाचा अर्थात अती शहाणपणाचा किडा डोक्यातून काढून टाकायचाय. मला आता पुन्हा लहान व्हायचेय व देवाला जवळ करायचेय! चिरंतन विश्रांती घेण्यासाठी मृत्यूशय्येवर जाताना ते विज्ञान, ते तत्वज्ञान, ती अतीशहाणी बुद्धी मला सोबतीला मुळीच नको! मला माझ्या श्रद्धेतला तो देवच बरोबर हवाय! शेवटी एक प्रश्न राहतोच की, शिक्षणाने माणूस अती बुद्धीवादी, अती विज्ञान वादी होतो का?

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा