मला पुन्हा लवकर उठायचंय!
बाळू उठ, शाळेला उशीर होईल असे आईचे शब्द ऐकत व पाठीवर आईच्या हलक्या हाताचा स्पर्श अनुभवत डोळे चोळत चोळत मला हळूच लवकर उठायचंय आणि सकाळच्या शाळेत जायचंय!
रविवारी व सुट्टीच्या दिवशी चाळीतल्या मित्रांना जमवून मैदानावर क्रिकेट खेळायला जायचंय आणि त्यासाठी मला पुन्हा लवकर उठायचंय!
तरूण झाल्यावरही आईचे तेच मायेचे शब्द पहाटे ऐकत मला काळजीने लवकर उठायचंय आणि सकाळचे लॉ कॉलेज घाईघाईतच मला गाठायचंय!
मला पुन्हा लवकर उठायचंय आणि धावतच नोकरीचे ते ठिकाण गाठायचंय! तिथे लिफ्टने हळूहळू वर अॉफीसमध्ये जाताना लिफ्टमध्येच अॉफीसमधल्या मुलीला चिडवायचंय आणि त्या मुलीकडून बॉसला तक्रारच करते तुझी असे लाडीकपणे पुन्हा म्हणून घ्यायचंय!
अॉफीसमध्ये काम करीत असताना मला पुन्हा चुकायचंय आणि बॉसने फायरिंग केली की त्याच्याकडे बघत फिदीफिदी हसायचंय आणि ही मजा घेण्यासाठी म्हणून मला पुन्हा लवकर उठायचंय!
सकाळचे कोर्ट गाठण्यासाठी मला पुन्हा ट्रेनच्या गर्दीत घुसायचंय आणि कोर्टात पोहोचायला उशीर झाला म्हणून सिनियर कडून रागावून घ्यायचंय आणि त्यासाठी मला पुन्हा लवकर उठायचंय!
मुलीच्या शाळेत पॕरेन्टस मिटिंगला मला हजर रहायचंय आणि त्यासाठी मला पुन्हा लवकर उठायचंय!
माझ्या वर्तमानाला मला पुन्हा भूतकाळात घेऊन जायचंय नाहीतर त्या भूतकाळालाच वर्तमानात घेऊन यायचंय आणि काहीही करून मला पुन्हा लवकर उठायचंय!
-ॲड.बी.एस.मोरे©११.७.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा