बेभरवशाचे जीवन!
(१) कुठून आलात तुम्ही, कुठून आलो मी? आपण सगळेजण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी, कोणाच्या तरी घरी, कोणत्या तरी आईबापाच्या पोटी जन्मलो आहोत. हळूहळू या जगाची ओळख आपल्याला होत गेली, अनुभव मिळत गेले. आपण अजूनही जिवंत आहोत व कसे का असेना पण जगत आहोत यासाठी आपण निसर्गाचे व समाजाचे खूप आभार मानायला हवेत. आजूबाजूला जर आपल्याच समाजाने निर्माण केलेल्या शाळा नसत्या तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाळेत कसे घातले असते. आजूबाजूला दवाखानेच नसते तर आपण आजारी पडल्यावर आपण कुठे गेलो असतो? या समाजाचे खूप उपकार आहेत आपल्यावर ही गोष्ट विसरता कामा नये.
(२) पण आपले जीवन सरळसाधे, सरळसोपे नाही. ज्यावेळी निसर्गाने गुलाबाची निर्मिती काट्यांबरोबर केली तेंव्हाच निसर्गाने या जगात अर्थकारणाबरोबर राजकारण सुरू केले. काय म्हणावे या निसर्गाला! जीवन दिले म्हणून कृतज्ञ भावनेने निसर्गाचे आभार मानावेत तर याच जीवनात एकीकडून जगण्याचा आधार व दुसरीकडून मरण्याची भीती देऊन हे जीवन बेभरवशाचे करून टाकले.
(३) हा लेख लिहिण्यापूर्वीच सातारा, खंडाळा येथील कण्हेरी गावातून विनायक मामाचा फोन आला. हा विनायक मामा (विनायक धनवडे) आमच्या वरळीच्या घरी बरेच वर्षे राहिला. गावी शेती व मुंबईला गिरणी कामगार म्हणून नोकरी करीत असलेला हा मानलेला मामा आमच्या घरातलाच एक कुटुंब सदस्य होऊन गेला. तो आता ७५ वर्षाचा आहे. दोन वर्षापूर्वी चैत्र महिन्यात त्याच्या कण्हेरी गावच्या जत्रेला गेलो होतो. त्यावेळी तिथे त्याचा थोरला मुलगा संदीप व धाकटा मुलगा किरण हे दोघेही भेटले. संदीप हा साधारण ३५ वर्षाचा विवाहित मुलगा ज्याला चार वर्षाचा छोटा मुलगा आहे. ही दोन्हीही मुले विवाहित व स्वभावाने विनायक मामा सारखीच खूप गोड!
(४) माझी व माझ्या सोबत जत्रेला आलेल्या बळी या आतेभावाची या सर्वांनी खूप बडदास्त ठेवली. विनायक मामा बरोबर गावात, शेतात खूप फिरलो. जत्रेत खूप मजा केली. त्यावेळी विनायक मामाचा थोरला मुलगा संदीप याने घरात आम्हाला जेवण वाढले, रात्री जत्रेतले खेळ दाखवले. आज अचानक विनायक मामा गावाहून फोन करतात व दुःखद बातमी देतात की त्यांचा थोरला मुलगा संदीप गेला. ते ऐकून मला खूप धक्का बसला. कारण संदीप कोरोना मुळे नाहीतर त्याच्या किडनीला अचानक कसले तरी इन्फेक्शन झाल्याने व ते छातीपर्यंत वर चढून त्याचे छातीत पाणी साचल्याने व मग त्या पाण्याच्या दबावाने हार्ट अटॕक आल्याने संदीप आठच दिवसांत गेला. धाकटा भाऊ किरण याने मुंबईवरून गावी जाऊन लाखाच्या वर तिकडे खाजगी रूग्णालयात खर्च केला पण त्याला यश आले नाही. संदीप कायमचा निघून गेला.
(५) काय म्हणावे या अशा घटनांना? आश्चर्य हे की ७५ वर्षाच्या विनायक मामाच्या अंगावर पाच वर्षापूर्वी त्यांचाच एक बैल उधळतो, संपूर्ण बैलगाडी विनायक मामाच्या छातीवर उलटी होते, त्यांच्या बरगड्या मोडतात व एवढा मोठा शारीरिक आघात होऊनही विनायक मामा वाचतात व त्यांचा तरूण मुलगा अचानक काहीतरी होते व अचानक या जगाचा कायमचा निरोप घेतो. म्हातारा बाप जगतो व तरूण मुलगा जातो. केवढे मोठे हे दुःख आणि कसले हे निसर्गाचे विचित्र वागणे!
(६) माणूस चांगल्या भावनेने देवाला मानतो, त्याला शरण जातो. पण सत्य हेच आहे की नुसत्या चांगल्या भावनेने जगात चांगले होईलच याची काहीही खात्री नसते. या जगात काही वाईट गोष्टी याच निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा निर्माण केल्या आहेत त्यांची कीड कुठून तरी चांगल्या गोष्टींना लागते व चांगल्या गोष्टी अचानक सडून नष्ट पावतात. मग ते कष्टाने वाढवलेले शेतीतले उभे पीक असो किंवा आईवडिलांनी मोठ्या कष्टाने वाढवलेले मूल असो! काय म्हणावे निसर्गाच्या की देवाच्या या खेळाला? आपण देवाला चांगला, दयाळू असे आपल्या चांगल्या भावनेने मानून त्याची भक्ती करतो, प्रार्थना करतो आणि देव हा असा उलट वागतो. त्याचे हे उलट वागणे माणसाच्या समजण्याच्या पलिकडचे असते म्हणून मग माणूस देवाला सोडून नियतीला दोष देऊन मोकळा होतो. म्हणजे देवाला नियती भारी पडते?
(७) कुठून कळ दाबली जाते, कुठून चक्र फिरते आणि आपण या जगात जन्म घेतो. मग जीवन काय ते हळूहळू आपल्याला कळू लागते. तुम्ही कुठले, मी कुठला, पण आपली या जीवन चक्रात योगायोगाने ओळख होते, जगण्याचे विचार, व्यवहार यांची आपल्यात देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण होत असताना आपले कधीकधी खटकते, मग रूसवे, फुगवे होतात. पण आपण मनाने चांगले असतो. जगात जर आपल्या सारखे सगळे चांगले असते तर जगात आपल्याला सगळीकडे फक्त सहज सुंदर असे अर्थकारणच दिसले असते. पण नाही, त्या खोडकर निसर्गाने म्हणा नाहीतर देवाने म्हणा, गुलाबाची निर्मितीच मुळी काट्यांबरोबर केली. हेच ते काटे जे गुलाबाला सरळसाधे, सहज सुंदर अर्थकारण करू देत नाहीत. त्यांना टोचून त्रास द्यायचा एवढेच माहित. काट्यांच्या या उपद्रवी टोचण्यातून मग सुरू होते राजकारण!
(८) राजकारण ही अर्थकारणाला लागलेली कायमची कीड आणि ती कोणी लावलीय तर त्या महान निसर्गाने किंवा देवानेच! प्लेग घ्या, स्वाईन फ्लू घ्या नाहीतर सद्याचा कोरोना घ्या, या सर्व गोष्टी हे काटेच आहेत व मग हे काटे काढून टाकण्यासाठी वैद्यकशास्त्र व आरोग्य व्यवस्था! शेवटी या आरोग्य व्यवस्थेचा संबंध कशाशी आहे तर रोगजंतू, विषाणू या काट्यांशी आणि म्हणूनच आरोग्य व्यवस्था ही सुद्धा कडू राजकारणाचाच एक भाग होऊन गेलीय.
(९) अशा या डबल ढोलकी जीवनात म्हणजे गुलाब व काटे, अर्थकारण व राजकारण अशा दोन्ही गोष्टी समांतर असणाऱ्या जीवनात तुम्ही व मी जन्म घेतला आहे व असे हे जीवन आपण जगत आहोत. आपले हे जीवन बेभरवशाचे आहे. कोरोना हा काही एकमेव काटा नाही या जगात! पुढे कोरोनावर लस आली तरी हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही. कारण बाकीचे असंख्य काटे या जगात शिल्लक राहणार आहेत व निर्माणही होणार आहेत. आपण आता एकमेकांच्या संपर्कात आहोत. पुढच्या क्षणाचा आपला भरवसा नाही कारण आपले जीवन बेभरवशाचे आहे. तेंव्हा जमेल तेवढा आपला संपर्क व आपली वैचारिक, व्यावहारिक देवाणघेवाण आनंदी करूया! विनायक मामा यांच्या कण्हेरी गावच्या जत्रेतील लोकनाट्यात मीही सहभागी झालो होतो. त्यावेळी तमाशा कलावंतांबरोबर काढलेला फोटो या लेखाच्या सोबत जोडत आहे. शेवटी या जगातील आपले बेभरवशाचे जीवन एक तमाशाच बनून राहिले आहे ना!
-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा